‘झोपडीतली कला’ जगाच्या कॅन्व्हासवर !
महा एमटीबी   14-May-2019


जगाला आदिम वारली चित्रशैलीची ओळख करून देणारे पद्मश्री जीव्या सोमा मशे यांचे गेल्यावर्षी दि.१५ मे रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने समृद्ध चित्रभाषेचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले. मी याच विद्यापीठाचा एक स्नातक असल्याचा मला अभिमान आहे. भारतीय आदिवासी कलेतील हा अग्रणी तब्बल ६६ वर्षे चित्रकलेच्या आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झळकत होता. ११०० वर्षांची दीर्घ परंपरा असणार्‍या आदिम कलेचे सर्जनशील स्वरूप त्यांनी जगासमोर आणले. १९७५ साली दिल्लीत भरविण्यात आलेल्या कलामहोत्सवात ही कला प्रथम प्रकाशात आली. भास्कर कुलकर्णी आणि पुपुल जयकर यांनी त्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यापूर्वी मुंबईतील ‘पंडोल आर्ट गॅलरी’त वारली चित्रकलेचे पहिले प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तेथूनच वारली चित्रसंस्कृतीचे आणि मशे परिवाराचे नशीब पालटले. एका दुर्लक्षित जमातीतील कलेला व वारली जमातीला मशे यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. आदिवासी पाड्यांवर झोपडीच्या चार भिंतीतली बंदिस्त कला त्यांच्या प्रयत्नांनी जगाच्या कॅन्व्हासवर पोहोचली !

 

दि. २५ डिसेंबर, १९३४ रोजी डहाणू तालुक्यातील कलंबिपाडा येथे त्यांचा जन्म झाला. डहाणूजवळ गंजाड गावात राहणार्‍या जीव्या यांचे आईवडील तो लहान असतानाच वारले. घरातील महिलांनीच त्यांचा सांभाळ करून मोठे केले. घरातील व आजूबाजूच्या स्त्रिया झोपडीच्या भिंतीवर चित्रे रंगवत. ती पाहून आवड व हौस म्हणून छोटा जीव्या चित्र काढण्यात रंगून जात असे. फक्त सुवासिनींनीच वारली चित्रे काढण्याची वारली जमातीत प्रथा होती. वयाच्या १३ व्या वर्षी जीव्याने ती मोडून मोठीच क्रांती केली. वारली चित्रे रेखाटणारा तो पहिला पुरुष आणि पुढे वारली कलेचा अग्रदूत ठरला. तरुणपणात त्याने सावकाराकडे दरमहा ६० रुपये पगारावर नोकरी केली. मात्र, कलानिर्मिती सुरूच ठेवल्याने व त्यात सातत्य राखल्याने मशे यांना लोकप्रियता मिळाली. देशातील अनेक राज्यांसह परदेशात ही कला पोहोचवून मशे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार बनले. पण त्यांची साधी राहणी अखेरपर्यंत बदलली नाही. पारंपरिक वारली चित्रांसोबत त्यांनी प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, फुलं, फळं यांनाही आपल्या कलाकृतीमध्ये स्थान दिले. दुर्गम भागातील उपेक्षित कला मशे यांच्या प्रयत्नांनी सातासमुद्रापार पोहोचली. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण आदिम संस्कृतीचे विविध पदर उलगडले.

 

जीव्या सोमा मशे यांचा १९७६ साली ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने प्रथम सन्मान झाला. त्यानंतर देशभरातील अनेक कलादालनात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली. त्यांनी शेकडो आदिवासी मुलांना वारली कला शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची दोन मुले सदाशिव आणि बाळू तसेच नातवंडे विजय, किशोर, प्रवीण, विवाहित नाती असा सारा मशे परिवार वारली कलेत पारंगत आहे. मशे यांना फ्रान्स, इंग्लंड,जर्मनी, जपान, इटली, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांमध्ये निमंत्रित करून त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला. बेल्जियमच्या राणीने मशे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले. जपानच्या ‘मिथिला म्युझियम’चे संचालक होसेगावा यांनी प्रदर्शन आयोजित केले. मशे यांची अनेक चित्रे तेथे कायमस्वरूपी मांडण्यात आली आहेत. २००९ साली नेदरलँडचे राजे प्रिन्स क्लाउस यांनी मशे यांना सन्मानित केले.

 

मशे यांनी आपल्या चित्रांमधून आदिवासी जमातीचे जीवन, चालीरिती जगापुढे आणल्या. त्यातून वारली चित्रकला जगन्मान्य ठरली. शहरी कलाप्रेमींनी मनापासून स्वीकारली. मशे यांनी आयुष्यभर त्यांच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार वारली चित्रांतून सातत्याने प्रकट केला. शेती, भातलावणी, कोळ्यांचे जाळे, मुंग्यांचे वारूळ, दैनंदिन जीवनातील प्रसंग, आदिवासी जमातीच्या चालीरीती, सण- समारंभ, लग्नसोहळा, प्रथा-परंपरा हे सारे विषय त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चित्रबद्ध केले. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार, काही रेषा, बिंदू आणि इतर संकेतचिन्हे यांच्या माध्यमातून त्यांनी जगाशी संवाद साधला. वारली चित्रांनी सजणार्‍या मशे यांच्या घराच्या भिंती अनेक पुरस्कारांनी सजल्या आहेत. ‘शिल्पगुरु पुरस्कार,’ ‘बिरसा मुंडा पुरस्कार,’ ‘आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार,’ ‘तुलसी पुरस्कार’ यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. नाशिक कलानिकेतन संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. कलेविषयी प्रचंड आस्था, प्रामाणिक प्रयत्न, सातत्याने कलासाधना यासाठी मशे यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती फकरुद्दीन अली यांनी साडेतीन एकर जमीन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सरकारी लालफीत आणि अतिक्रमण यात अडकलेली जमीन मिळायला ३६ वर्षे वाट पाहावी लागली. जेव्हा ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला तेव्हा या विषयी चर्चा होऊन चक्रे फिरली. त्यातील सुमारे पावणेदोन एकर जमीन मिळाली. त्यावर वारली कलेचे संग्रहालय उभे करण्यात आले आहे. मशे यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. संपूर्ण आयुष्यात अलिप्तपणे वावरणार्‍या मशे यांची कला कायमच माणूस, त्याचे जगणे या भोवती फिरत राहिली. या कलाधर्मीने निर्माण केलेला खूप मोठा खजिना चित्ररूपाने पुढच्या पिढ्यांना आनंद देत राहील. वारली चित्रशैली जीवंत ठेवणार्‍या जीव्या सोमा मशे यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली !

 

नाशिकमध्ये व्हावे वारली कलासंग्रहालय !

 

वारली कलेचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असले तरी, पद्मश्री जीव्या सोमा मशे यांच्या नावाने नाशिकमध्ये आदिवासी वारली कलासंग्रहालय उभे राहावे. त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. ठाणे, पुणे येथे अशी संग्रहालये आहेत. त्याप्रमाणे नाशिकला दानशूर कलाप्रेमींनी एखाद्या बंगल्यातली जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली, तर उत्तर महाराष्ट्रातील पहिले वारली कलासंग्रहालय निर्माण करता येईल. तेथे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन व वारली संस्कृतीचे दर्शन घडविणे शक्य होईल. त्यासाठी गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची ! याचप्रमाणे शासनाने स्वतंत्र आदिवासी कलासंचालनालयाची स्थापना करणे गरजेचे आहे. राज्याचे कलासंचालनालय मुंबईत आहे त्याच धर्तीवर आदिवासी कलांच्या सर्वांगीण विकासासाठी, वारली व इतर जमातीतील कलाकारांच्या उन्नतीकरिता त्याची निर्मिती करावी. त्यासाठी आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांनी पुढाकार घ्यायला हवा.

 

- संजय देवधर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat