प्रवि‍ण परदेशी यांनी स्वीकारली आयुक्तपदाची सुत्रे
महा एमटीबी   13-May-2019मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवि‍ण परदेशी यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. महानगरपालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्याकडून परदेशी यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.

 

परदेशी यांना भारतीय प्रशासकीय सेवेचा तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे. १९९३ साली ते लातूरचे जिल्हाधिकारी असताना विनाशकारी भूकंपाच्या आपत्तीनंतर त्यांनी पुनर्वसनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. जागतिक बँकेच्या पुनर्वसन कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी ३० गावे आणि एक लाखाहून अधिक घरांचे सक्षम पुनर्वसन केले. त्यांची ही कामगिरी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २००१ मधील कच्छ (गुजरात) भूकंपावेळी पुनर्वसन कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पुन्हा जबाबदारी दिली होती.

 

अजोय मेहता स्वीकारली मुख्य सचिव पदाची सूत्रे

 

आयुक्तपदाची सूत्रे परदेशी यांच्याकडे दिल्यानंतर अजोय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव यु. पी. एस. मदान यांच्याकडून मेहता यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव मेहता यांनी लगेचच कामाला सुरुवात करत दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले. एप्रिल २०१५ पासून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अत्यंत महत्त्वाच्या विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. १९९२-९३ मध्ये नाशिकला महापालिका आयुक्त असताना त्यांनी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat