मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांच्या चौकशीची मागणी
महा एमटीबी   12-May-2019


 


मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या साहित्याच्या पंढरीची होत असलेली बदनामी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘वादाच्या भोवऱ्यात साहित्याची पंढरी’ ही ग्रंथालयातील अनेक भ्रष्ट प्रकरणे उघडकीस आणणारी लेखमाला प्रकाशित केली होती. मात्र, अद्याप या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. ही बाब पवारांच्या निदर्शनास आणण्यासाठी डॉ. गजानन देसाई, सुधीर हेगिष्टे, अनिल गलगली, डॉ. कृष्णा नाईक, धनंजय रामकृष्ण शिंदे आदींनी पत्राद्वारे विनंती केली आहे.

 

या पत्रात नमूद केल्यानुसार, १२० वर्षे जुन्या असलेल्या या संस्थेला जवळपास संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. पवार यांच्यासह दि. ३ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत विविध बाबींवर सखोल चर्चा झाली होती. त्या बैठकीत पवार यांनी संस्थेचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांना संबंधित प्रश्नांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मोकाशी यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रश्नांना उत्तरे दिले नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

 

विश्वास मोकाशी आणि माजी प्रमुख कार्यवाह कृष्णकांत शिंदे यांच्याविरोधात गिरगाव येथील न्यायालयात ‘कलम ४२०’ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. यामुळे ग्रंथालयाची बदनामी होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. न्यायालयाचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत मोकाशी यांना पदमुक्त करणे गरजेचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणी विश्वास मोकाशी यांना पदमुक्त करत त्यांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पत्राद्वारे पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat