संघ संस्कारामुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य : डॉ. अशोकराव कुकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2019
Total Views |

 :

 


मुंबई : “जेव्हा समाज संघटितरीत्या उभा राहतो तेव्हा संकटावर मात करण्याची हिंमत मिळते. रा. स्व. संघामध्ये संघटित होण्याचे सगळेच अनुभव घेतल्याने ते गुण आमच्यातही आले. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी समाजजीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात स्वयंसेवक जातील तिथे तिथे संघटन करण्याचा मंत्र दिला होता. डॉक्टरांच्या संघटनशास्त्राचा, संघटनसंस्काराचा अवलंब केल्यानेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला,” असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले. लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे (काका) यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण पुरस्कार,’ तर डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना एसएनडीटी महिला विद्यापीठाने डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. कुकडे दाम्पत्याच्या याच गौरवानिमित्त केशवसृष्टी संस्थेतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील माहेश्वरी भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. अशोकराव कुकडे यांनी वरील उद्गार काढले. कुकडे दाम्पत्याच्या सत्कार सोहळ्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘वनबंधू परिषदे’चे माजी अध्यक्ष पद्मश्री रामेश्वरलाल काबरा उपस्थित होते. तसेच मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘महिको’चे एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष राजेंद्र बारवाले आणि कार्यक्रमाचे संयोजक विष्णुदास दरक उपस्थित होते.

 

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अशोकराव कुकडे म्हणाले की, “गेल्या चार महिन्यांपासून आणि आजही इतरांच्या तोंडून सातत्याने स्वत:ची स्तुती ऐकत आल्याने संकोचाची आणि संतोषाची अशा दोन्हीही भावना मनात आहेत. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून सर्व स्तरातून केल्या जाणाऱ्या अभिनंदन व सत्कारांमुळे मानवतेचे एकात्मदर्शनही घडत आहे. आपण सगळे एक आहोत, असा अनुभवही येत आहे आणि त्याचे समाधानदेखील वाटत आहे. मात्र, सुरुवातीपासूनचा प्रवास हा खडतर होता. शारीरिक, मानसिक व सामूहिक परिश्रमाचे हे काम होते. पहिली १५ वर्षे अतिप्रतिकूल अवस्थेला आम्हाला तोंड द्यावे लागले. आणीबाणीच्या काळातील २१ महिन्यांचा कारावास तर परीक्षेचा काळ होता. कारण, संघविचाराच्या व्यक्तींनी कसे नेस्तनाबूत करता येईल, हाच एक विचार त्यावेळी सत्ताधाऱ्यांमध्ये होता. अशा सगळ्या प्रसंगातून आम्हाला पुढे जावे लागले. तेव्हा आजचा हा अनुकूल काळ नजरेस पडतो.” पुढे ते म्हणाले की, “आज अनुकूल काळ आलेला दिसत असला तरी, हे काम आणखी पुढे जावे असे वाटते. तसेच समाजाच्या अन्य क्षेत्रातही अशीच भक्कम कामे उभी राहावीशी वाटतात. सोबतच आमच्या प्रतिकूल काळातही सहकार्याचे, मदतीचे हात सदैव आमच्या पाठीशी होतेच. भाऊ बारवाले (राजेंद्र बारवाले यांचे पिताश्री) यांनी आम्हाला नेहमीच पुरेपूर मदत केली. भाऊंचा आम्हाला केवळ आर्थिकच नव्हे, तर नैतिक आणि वैचारिक आधारदेखील वाटत होता,” असे यावेळी डॉ. कुकडे म्हणाले.

 

रा. स्व. संघाबाबत डॉ. कुकडे म्हणाले की, “जेव्हा समाज संघटितरीत्या उभा राहतो तेव्हा संकटावर मात करण्याची हिंमत मिळते. डॉ. हेडगेवार यांच्या संघटनशास्त्राच्या व्यवहारातील अवलंबानेच आज आमचा हा प्रवास शक्य झाला. संघ स्वयंसेवक ज्या ज्या क्षेत्रात जातील त्या त्या क्षेत्रात त्याने संघाचा राजदूत म्हणून काम करावे ही गुरुजींची शिकवणही वेळोवेळी आठवते. संघाने राष्ट्राला परम वैभवाला नेण्याचे स्वप्न पाहिले ते आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने नक्कीच नजीकच्या काळात पूर्ण होणार आहे. आज तुम्ही आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे मला वयाच्या ८० व्या वर्षीदेखील शरीरात नवी ऊर्जा संचारत असल्याचे व काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे वाटते,” असेही ते अखेरीस म्हणाले. दरम्यान, कुकडे दाम्पत्याच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. पंढारे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसे कार्यक्रमाची भूमिका व हेतू विष्णुदास दरक यांनी विशद केला, तर सूत्रसंचालन विवेक भागवत यांनी केले.

 

डॉ. अभय बंग अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थित

 

आजच्या कुकडे दाम्पत्याच्या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग उपस्थित राहणार होते. परंतु, डॉ. बंग यांच्या मातोश्रींना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. परिणामी, डॉ. अभय बंग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

 

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’चा अनुभव

 

“गेल्या चार महिन्यांपासून आम्हाला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या उक्तीचा अनुभव येत आहे. भेटायला येणाऱ्या, अभिनंदन करणाऱ्या प्रत्येकालाच आम्हाला मिळालेला पुरस्कार स्वत:ला मिळत असल्याचा अभिमान वाटत आहे, हे पाहून मला देवदर्शन झाल्यासारखेच सध्या वाटत आहे. कारण, या सर्वांच्या रुपातूनच परमेश्वरही भेटतो आहे, दिसतो आहे. मला मिळालेल्या डी. लिट पदवीचा संबंध हा केवळ वैद्यकीय शिक्षणाशी नव्हे तर लातूरच्या मातीतील माणसांशीदेखील आहे. कारण, तिथेच मला माणूस वाचायला मिळाला आणि माणूस ऐकायलाही मिळाला. तेव्हाच विवेकानंद परिवार समृद्ध झाला आणि आमची डॉक्टर ही पदवी गळून पडली. आम्ही कोणाचे काका झालो तर कोणाची काकू! आणि याचा मला अभिमानही वाटतो.”

 

- डॉ. ज्योत्स्ना (काकू) कुकडे, डी. लिट

 

सेवा रक्तात प्रवाहित होते

 

“डॉ. कुकडे दाम्पत्याच्या रक्तात सेवा प्रवाहित होत असल्याचा प्रत्यय नेहमीच येतो. अशा प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचा सत्कार आज इथे केला जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. जगात कोट्यावधी लोक केवळ भारवाह्याचे काम करताना दिसतात परंतु अशोकरावांसारखा प्रकाशस्तंभ पाहायला मिळणे दुर्लभच! केंद्र सरकारने डॉ. अशोकराव कुकडेंना पद्मभूषण देऊन सन्मानित केले असे जरी म्हटले दात असले तरी मला वाटते की, डॉ. कुकडेंना पुरस्कार दिल्याने भारत सरकारचाच गौरव वाढला आहे. ”

 

- रामेश्वरलाल काबरा

 

डॉ. कुकडे ‘मी’ नव्हे, तर ‘आम्ही’ झाले!

 

“डॉ. काका कुकडेंना मिळालेला ‘पद्मभूषण पुरस्कार’ केवळ त्यांचा नव्हे, तर आम्हा सर्वांचा सन्मान आहे. काका कुकडेंनी नेहमीच ‘मी’ म्हणून नव्हे, तर अहंकाराचा त्याग करत ‘आम्ही’ होऊन काम केले. म्हणूनच समष्टीमय झाल्याचे ते एक जितेजागते उदाहरण आहे, असे मला वाटते. संघसंस्कारामुळे असे होणे साहजिकच आहे. कारण, १० टक्के विचार आणि ९० टक्के तो विचार स्वत: जगणे, आचरणात आणणे असे संघ शिकवतो आणि ते कुकडे दाम्पत्यात दिसते.”

 

- रमेश पतंगे, अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@