टाइम मासिकातून पंतप्रधान मोदींवर टीका : वाद उफाळण्याची चिन्हे
महा एमटीबी   10-May-2019


 


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम' या मासिकाच्या आशिया आवृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कव्हर पेजवर स्थान दिले असले तरीही या कव्हर स्टोरीवर केलेल्या उल्लेखामुळे आता वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ', असा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीनिमित्त टाइम मासिकाने विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?', असे या लेखाचे शिर्षक आहे.

आतिश तासीर यांनी लिहीला लेख

हिंदू आणि मुस्लिमांतील बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केले नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली आहे. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला आहे. 'नरेंद्र मोदींनी राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिमांचे नाते सुधारण्यासाठी यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका टाइमने केली आहे

 

भारतीय संस्कृतीवरही भाष्य

भारतीय संस्कृतीवरदेखील भाष्य करण्यात आलं आहे. 'भारताच्या कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचे सत्तेत येणे या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातली भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे ते दाखवते,' असे टाईमने म्हटले आहे.

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही झाली होती टीका

टाइम मासिकातून भारताच्या पंतप्रधानांवर टीका करण्याची ही पहीली वेळ नाही. १६ जुलै २०१२ रोजी टाइमच्या आवृत्तीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही द अंडरअचिव्हर, या मथळ्याखाली टीका करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांतून टाइम मासिकाचा समाचार घेण्यात आला होता. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या या टीकेमुळे वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat