झऱ्यातून झरझरे गोदामाई...
महा एमटीबी   10-May-2019आजमितीस नदीचे प्रदूषण ही एक बिकट समस्या म्हणून समोर येत आहे. मात्र, नद्यांचे प्रदूषण हे मानावामार्फत तिच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यापेक्षा तिच्या उदरात मानवाने आपल्या स्थापत्यकलेसाठी दाखविलेल्या कलांचा परिपाकच जास्त आहे. याचे उदाहरण म्हणून नाशिकची गोदावरी नदी हे एक उत्तम उदाहरण आहे. गोदावरी नदीचे अभ्यासक आणि गोदा प्रदूषण मुक्तीसाठी लढा देणारे देवांग जानी यांच्याशी याबाबत खास बातचीत केली असता, गोदेच्या अंतरंगाचे एक एक विलक्षण पदर उलगडत गेले. यातूनच गोदेच्या प्रदूषणाचे नेमके गमक उलगडत गेले.


२००२ च्या पूर्वी नाशिक शहरातील गटारे गोदापात्रात सोडण्यात आली असूनही गोदावरी प्रदूषण हा विषय नाशिकच्या लेखी महत्त्वाचा नव्हता. कारण, असे असूनही गोदा प्रदूषित नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे सन २००२ पर्यंत गोदावरी स्वप्रवाही होती. मात्र, २००३-०४ च्या सिंहस्थवेळी गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले. यावेळी नदीपात्रात नाशिक मनपाच्या माध्यमातून काँक्रिटचा स्लॅब टाकण्यात आला आणि त्याच वेळी गोदेच्या पात्रात असणारी १७ प्राचीन कुंडे आणि त्यातील जिवंत झरे बुजवले गेले. त्यामुळे स्वप्रवाही असणारी गोदा आता गंगापूर धरणाच्या पाण्यावर विसंबून राहात प्रवाही होत असते. त्यामुळे आज गोदेचे स्वरूप पाण्याचा विसर्ग झाला तर नदी, नाही तर नाला असे झाले आहे. याबाबत देवांग जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. ८२/२०१५ दाखल केली. त्यात १७ प्राचीन कुंड इ. स. १७०० च्या आसपास १७ महापुरुषांनी निर्माण केली आहेत. अहिल्याबाई होळकर, गोपिकाबाई पेशवे, बाजीराव पेशवे प्रथम, साताऱ्याचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ ला रामकुंड बांधले. यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅजेटर १८८३ मध्ये नोंद आहे. तसेच, कुंडांची नावे, माप, महती आणि निर्माणकर्ते यांची नोंद असल्याचे पुरावेदेखील सादर करण्यात आले. नाशिकमध्ये १९१७ ला ब्रिटिश सिटी सर्व्हे कार्यालय स्थापन केले गेले. त्यावेळी झालेल्या सर्व्हेनुसार गोदेच्या प्रवाहामुळे नाशिक शहराची दोन भागांत विभागणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यावेळी उपसंचालक भूमी अभिलेख यांनी जे नकाशे चित्रित केले, त्यातही या १७ कुंडांचा उल्लेख आहे. या सर्व पुराव्यानिशी जानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला मनपाच्या वतीने उत्तर देण्यात आले नाही.

 

मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने आदेश पारित केले. त्यात त्यांनी सांगितले की, “येणाऱ्या भाविकांना शुद्ध जल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नाशिक मनपाची आहे. ती त्यांनी पार पाडावी. २००४ मध्ये मनपाने रामकुंड परिसरात उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करावे आणि याचिकाकर्ते यांचे जे काही म्हणणे आहे, ते त्यांनी सविस्तरपणे नाशिक मनपा आयुक्तांच्या समोर सादर करावे. त्यावर नाशिक मनपा आयुक्त २ महिन्यांच्या आत निर्णय घेतील. त्यानुसार जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा प्रकट दिनाच्या मुहूर्तावर ६ फेब्रुवारी, २०१७ रोजी तांत्रिक अहवालासह तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. त्यांनी गोदावरी संवर्धन कक्ष स्थापना, होळकर पूल ते तपोवन या क्षेत्रात १२२ सुरक्षारक्षक नेमणे आणि प्रदूषणकर्त्याकडून दंडवसुली असे निर्णय घेतले. मात्र, याचिकेतील १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करावे, जिवंत पाण्याचे झरे पुनर्जीवित करावे या प्रमुख मागण्यांना बगल दिली गेली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकराम मुंढे यांना २२०० नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी सकारात्मक भूमिका स्वीकारत २०१७- १८ च्या अर्थसंकल्पात नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढणे आणि कुंड जीवित करणे याबाबत तरतूद केली. नाशिक स्मार्ट सिटीच्या बैठकीतदेखील कुंडांचे अस्तित्व दाखविण्यात आले. स्मार्ट सिटीच्या गोदा प्रकल्पात जनहित याचिकेतील मुद्दे समाविष्ट करण्यात आले. यासंबंधी निविदादेखील काढण्यात आल्या. मात्र, प्रतिसादाअभावी तो विषय पुन्हा बाजूला पडला. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका स्वीकारत आता गोदा काँक्रिटीकरण मुक्तचे सुतोवाच केले आहे. त्यानुसार आता २३ मे नंतर यासंबंधी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

गोदेच्या प्रवाहात रामसेतू पुलाजवळ रामगया कुंड आहे. तिथे दशरथराजांचा दशक्रियाविधी प्रभू राम यांनी केल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. येथील काही लोक त्याला हत्तीकुंड म्हणत असत. त्यात आता १० ते १२ फूट काँक्रीटीकरण झाले आहे. त्यात दीड फुटाचा खड्डा आहे.त्यातून १ मिनिटाला १० लिटर स्वच्छ पाणी बाहेर येते. असे असंख्य कुंडातील पाणी झरे दाबूनदेखील बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. जलतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार सरफेस वॉटर हे ३० टक्के असले तरी चालत असते. गोदेत सुमारे ७० टक्के पाणी हे झऱ्यांच्या स्वरूपात आहे. त्यामुळे याच झऱ्यांचे जर पुनर्जीवन झाले तर नदी स्वप्रवाही होऊ शकते. याचा पुरावा म्हणून नाशिक येथील डॉ. प्राजक्ता बस्ते यांच्या अहवालानुसार गोदेच्या उजव्या व डाव्या तिरी ३२ विहिरींचे सर्वेक्षण केले असता तेथे पाणी लागल्याचे दिसून आले आहे. गोदेत होणारे अस्थिविसर्जन हा कायमच चर्चेचा मुद्दा ठरत असतो. मात्र अस्थीवलाय कुंड याचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेट १८८३ मध्ये आहे. ब्रिटिशांच्या अभ्यासानुसार ६ सेकंदात गोदेत अस्थी वितळतात. सन २००२ पर्यंत अस्थी वितळण्याची तक्रार नव्हती. मात्र, काँक्रिटीकरणामुळे अस्थींचे विघटन होत नसल्याचे दिसून येते. तसेच, गोदेच्या पाण्यात अस्थी का वितळतात, याबाबतदेखील काँक्रिटीकरणामुळे संशोधन करण्यात अडचणी येत आहेत.

 

गोदावरीत होणारे पिंडदान, कपडे, वाहने धुणे हे गोदावरी प्रदूषित होण्याचे मूळ कारण नसून गोदा स्वप्रवाही नसणे, हे त्याचे मुख्य कारण आहे. तसेच, राजेंद्रसिंह यांनी गोदावरीची इको सिस्टिम अभ्यासली असता, त्यांनी नाशिक हे बेसॉल्ट खडकावर वसले आहे. त्यातील खडकांच्या फटीतून पाणी झिरपत आहे आणि या भेगा खोल असून यात पाणी साठविण्याची क्षमतादेखील जास्त आहे. पावसाचे पाणी हे या भेगांत साठण्यास मदत होते मात्र, काँक्रिटीकरणामुळे ते लोप पावले असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. गोदेचे काँक्रिटीकरण हटविले की, भूजलपातळीदेखील वाढण्यास मदत होणार असून जिल्ह्याला दुष्काळाच्या समस्येपासूनदेखील मुक्ती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, होळकर पूल ते गंगापूर धरण या ९ किमी मार्गावरील गाळ काढणेदेखील आवश्यक असून या गाळामुळे पुराची तीव्रता वाढते व भूजल पातळीदेखील घटत आहे. गोदावरी ही तिच्याच जलाने समृद्ध असून काँक्रिटीकरणाच्या भरात तिच्यातील प्रवाह हे अडले आहेत. येणाऱ्या काळात करण्यात आलेल्या सुतोवाचाप्रमाणे काँक्रिटीकरणमुक्त गोदा झाल्यास, तिच्यातील झरे वाहिल्यास गोदा स्वप्रवाही होण्यास निश्चितच चालना मिळेल आणि यातूनच गोदेच्या प्रदूषणाचा मार्गही मोकळा होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat