घर पाहावे बांधून
महा एमटीबी   08-Apr-2019
छोटीशी रोपटी लावली व कौतुकाने त्याकडे पाहिले, हातांनी बनविलेल्या वस्तू लावल्या म्हणजे खूप पैशांची उधळण करायची गरज नाही. पण घर सजवताना जीवंतपणा टिकवायचा, माणुसकी जोपासायची, माया-ममता उधळायची यातच तर घराचे घरपण आणि राहणाऱ्यांचे शहाणपण.


आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात. आपण कधीतरी मान्य करतो की, काही गोष्टी मिळाल्या नाहीत तरी चालेल. पण काही गोष्टी खरं तर तशा अर्थाने गरजेच्याच असतात. किंबहुना त्या आपल्याला मिळाल्या तर कुठून तरी आतून एक आंतरिक व तरल समाधान मिळते. नाही मिळविता आल्या, तर आयुष्यभर काहीतरी चुकल्यासारखे वाटते. एक जखम कायमची भळभळल्यासारखी वाटते. स्वतःचे असे एक घर असणे हे त्यापैकी असते. मी कित्येक अशा लोकांना भेटले आहे की ज्यांना घर नाही करता आले म्हणून मरणप्राय अशा यातना झाल्या. काहींना जीवन नकोसे वाटले. काहींनी रागाच्या भरात आत्महत्या करायचाही प्रयत्न केला. घर नसणे ही कल्पना खरे तर न पचणारी असते. काहींना तर आत्मसन्मानाला दुखावणारीही असते. आजकाल स्वतःचं घर असणं म्हणजे एक दिव्यच आहे. या दिव्यातून जे जे सहिसलामत बाहेर पडतात ते खरंच खूप आनंदात किंबहुना ब्रह्मानंदात असतात. व्यवस्थित कर्ज सांभाळायचं, मिळवायचं ते पुन्हा फेडायचं... ते करताना स्वत:च्या आणि घरातल्यांच्या आकांक्षाना मारायचं. इतके सगळे सहन करायचे आणि तरीही त्या घराला सजवायचे आणि वर सुखा-समाधानाने जगायचे. खरंच या एका जन्मात घर असणं म्हणजे कितीतरी अमाप अविश्वसनीय मिळवल्याचं समाधान आहे. पण खरंच या एवढ्या अटी सांभाळल्या की घराचं ‘घरपण’ जगतो का? चार भिंतींचा तो खोका आपल्या आनंदाचा आणि समाधानाचा स्रोत आहे का? आयुष्यातल्या बाजी मारणाऱ्या क्षणांचा तो खरंच दीपस्तंभ आहे का? उत्तर आहे ‘होय’सुद्धा आणि ’नाही’सुद्धा. कारण, हा दीपस्तंभ त्या सिमेंटच्या भिंतीवर उभा असण्यापेक्षा मनुष्यजीवाच्या जीवंतपणावर अवलंबून आहे. त्याच्या श्वासात भिनलेला आहे.

 

पूर्वीच्या जुन्या मजेशीर आठवणींना आपण जीवंत करण्याचा प्रयत्न करतो पण, तिथे मात्र खरंतर भकासच वातावरण आहे. ती पूर्वीची मैत्रीण वर्षभरापूर्वीच विधवा झाली होती. काही वर्षांपूर्वी त्या मैत्रिणीच्या घरी जाऊन त्यांनी निर्भेळ आनंद अनुभवला होता. ती आता एकट्या ‘रॉबिन’ नावाच्या त्यांच्या अल्सेशियन कुत्र्याबरोबर राहत होती. त्या दोघांच्या जीवनात आता पोकळी निर्माण झाली होती. भकासपणा आला होता. विचित्र असे चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. त्या दु:खी लहरी त्या घराला व्यापून उरल्या होत्या. कुत्रासुद्धा एकेकाळी इतका अ‍ॅक्टिव्ह, उड्या मारणारा, शेपटी हलविणारा... आता शांत झाला होता. त्यांच्या डोळ्यात दुःख साचले होते. चेहऱ्यावरचा द्वाडपणा, हुडपणा लोपला होता. किती साकळला होता तो! एकेकाळी आपल्याला नर्व्हस वाटलं, चिडचिडल्यासारखं वाटलं की आनंदाचे क्षण वेचण्यासाठी आपण या घरी मोठ्या विश्वासाने येत होतो. यापूर्वी तो विश्वास कधी भंगला नव्हता. मैत्रिणीचे ते घर म्हणजे हसता-खेळता जॉईंट होता. आज खरंच घर बदललं? का बदललं? कसं बदललं? सिमेंटच्या चार भिंती असलेल्या घराला माणसांच्या अस्तित्वाने, त्यांच्या वागण्या-बोलण्याने काही फरक पडतो का? तर शंभर टक्के होय.

 

घर का बनाना कोई आसान काम नहीं

दुनिया बसाना कोई आसान काम नहीं

 

घराचे घरपण हे तिथे राहणाऱ्या माणसांच्या भावनांचे प्रतिबिंब असते. जितके ते प्रतिबिंब सकारात्मक तितके त्या घराचे अस्तित्व आनंदमयी. म्हणजेच एकूण काय घराचे वासे हसतात आणि रडतात, कधी भांडतातही ते तिथे राहणाऱ्या माणसांच्या रडण्यावर आणि हसण्यावर अवलंबून असतात, त्या घराची सजीवता आणि निर्जीवता अवलंबून असून एखाद्या छोट्याशा घराला गृहलक्ष्मीने तिच्या सौंदर्यशील दृष्टीने सजविले, त्यात टापटीपपणा आणला, रेखीव चित्र लावली, स्वतः कलात्मकतेने बनविलेल्या कलाकृती लावल्या, रंगसंगतीने, सुबकतेने सोफे सजविले, खिडक्यांवर पडदे लावले, शयनगृहात सुंदर बेडशीट्स घातल्या आणि शांत व प्रसन्न वातावरण ठेवले तर घर स्वर्गीयच होईल. म्हणजे घराला ‘डेकोरेट’ करायला भरमसाट पैसा लागला तरी, तिथे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होईल याची हमी नाही देता येत. पण घरात आनंद, सुख, शांती आणायची हे मनात ठेवून केलेली मनापासूनची सजावट खरंच त्या घराला साजिरे रूप देते. छोटीशी रोपटी लावली व कौतुकाने त्याकडे पाहिले, हातांनी बनविलेल्या वस्तू लावल्या म्हणजे खूप पैशांची उधळण करायची गरज नाही. पण घर सजवताना जीवंतपणा टिकवायचा, माणुसकी जोपासायची, माया-ममता उधळायची यातच तर घराचे घरपण आणि राहणाऱ्यांचे शहाणपण. शेवटी काय घराचं घरपण जोपासणं हे त्या घरातल्या राहणाऱ्या माणसांच्या मनांवर, त्यांच्या प्रगल्भतेवर आणि जगण्यासाठी केलेल्या धडपडीवर अवलंबून. अशा घरात शिरताच खूप प्रसन्न वाटतं, मुख्य म्हणजे जीवंत वाटतं. जगात कुठेही पंचतारांकित सुविधा देऊन तिथे राहण्याची व्यवस्था केल्यावरही ‘नको माझ्या घरातच मला सुखावह वाटतं’ असे म्हणणाऱ्या लोकांना विचारा. तिथे सगळी कशी कृत्रिम सेवा, चंगळपण मग मनात आतून येणारा हा सुखाचा हुंकार मात्र शोधावा लागतो. आतून येणारा हा तृप्त हुंकार ऐहिक सुखाच्या पंचतारांकित सोयीसुविधांपल्याडचे आपलं एक साधंसुधं पण प्रसन्न चित्त करणारं घर किती महान आहे, याची प्रचिती ज्याची त्याने अनुभवावी व तृप्त व्हावे.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat