वायुदलाची युद्धसज्जता
महा एमटीबी   06-Apr-2019


 


भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून वायुदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर भविष्यात चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणाऱ्या संकटाला तोंड देणे अवघड होईल. संरक्षणदलाच्या दृष्टिकोनातून संरक्षण उद्योग आणि निर्यात या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.

 
 

वेगवेगळ्या कारणांमुळे वायुसेनेचे नुकसान

 

राजस्थानच्या जोधपूर येथे १ एप्रिलला वायुदलाचं ‘मिग-२७’ लढाऊ विमान कोसळलं. हे लढाऊ विमान रुटीन मिशनवर असताना हा अपघात झाला. उत्तरलाई वायुदलाच्या बेसवरून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र, काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळताच विमानातील दोन्ही पायलट्सनी विमानातून उड्या मारल्या. त्यामुळे ते बचावले. यापूर्वीही बिकानेरमध्ये ‘मिग-२१’ हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथेही वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात दोन पायलट्स, चार जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. २८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात उड्डाणानंतर भारतीय वायुसेनेचे एक ‘जग्वार’ लढाऊ जेट दुर्घटनाग्रस्त झाले. १ फेब्रुवारी रोजी फ्रेंचनिर्मित ‘मिराज-२०००’ विमान काही मिनिटांनी क्रॅश झाले, तेव्हा दोन भारतीय वायुसेनातील पायलट ठार झाले.

अत्याधुनिक विमाने येणे गरजेचे

२०१९ मध्येच वेगवेगळ्या कारणांमुळे वायुसेनेचे अपघातांमुळे खूपच नुकसान झाले आहे,यामुळे आपल्याकडे असलेल्या लढाऊ विमानांची संख्या ही अजून कमी झाली आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून राफेल विमाने लवकरात लवकर भारतीय वायुदलामध्ये सामील होणे गरजेचे आहे. विमानांचे अपघात तीन कारणांमुळे होतात. एक तर वैमानिकाची चूक, दुसरे विमानांमध्येतांत्रिक बिघाड आणि तिसरे वाईट हवामानामुळेझालेले अपघात. अर्थातच वाईट हवामानामुळे झालेल्या अपघाताविषयी आपण काहीही करू शकत नाही. तांत्रिक बिघाड झाले असतील, तर त्या जातीची जुनाट विमाने लवकरात लवकर बाहेर काढून त्याऐवजी अत्याधुनिक विमाने येणे गरजेचे असते. जर वैमानिकाची चूक असेल, तर याचा अर्थ यांचे विमान चालवण्याचे कौशल्य अजून जास्त वाढवणे गरजेचे आहे. सध्या भारतीय वायुदलामध्ये अॅडव्हान्स जेट ट्रेनर म्हणजे नवशिक्या वैमानिकांना शिकण्याकरिता लागणारी विमाने यांची खूपच कमी आहे, ती लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे.

 

वायुदलाच्या युद्धसज्जतेवरच प्रश्नचिन्ह

 

चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाचवेळी युद्ध झाले तर या दोन्ही आघाड्यांशी दोन हात करण्याएवढे आपले वायुदल सक्षम नाही, अशी कबुली भारतीय वायुदलाचे एअर मार्शल बी. एस. धनोआ यांनी अनेक वेळा दिली आहे. मागील तीन-चार दशकांत हवाई दलच नव्हे, तर आपल्या सर्वच संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाबाबत पूर्वीच्या सरकारांनी अक्षम्य बेफिकिरी दाखवली आहे. त्यामुळे आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल शत्रूंच्या तुलनेत खूप मागे पडले आहे. हवाई दलात जुनी झालेली विमाने, त्यांचे वाढते अपघात, नवीन विमाने घेण्यासाठी वर्षानुवर्षे होणारा विलंब या आणि अशा इतर कारणांमुळे हवाई दलाच्या युद्धसज्जतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हवाई दलात लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रन्सची मंजुरी असली तरी सध्या केवळ ३१ स्क्वॉड्रन्सच शिल्लक आहेत. १९९० पासूनच लढाऊ विमानांच्या ताफ्यांची संख्या घटत गेली आहे. पाकिस्तान आणि चीन भारत विरुद्ध कायम एकत्र असतात. त्यामुळे कोणाशीही खटका उडाला तर एकाचवेळी दुहेरी युद्धाचा धोका भारताला आहेच.

 

‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण यशस्वी करा

 

फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे, तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही हवाई दलाची पिछेहाट झाली आहे. आता संरक्षण क्षेत्रातलं स्वावलंबन वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांच्या मदतीनं भारतातच लढाऊ विमानांचं उत्पादन करणं शक्य होणार आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेले प्रकल्प यांना चालना मिळाल्यास हवाई दलाची कमी होणारी स्कॉड्रन्सची संख्या रोखता येईल. या शिवाय कुशल मनुष्यबळाकरता आधुनिक ट्रेनिंग विमांनाची तातडीने गरज आहे. २०१५ मध्ये सरकारने अंगीकारलेले ‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण तोकडे पडले आहे. अनेक घोषणा करूनही एकसुद्धा प्रकल्प ड्रॉईंग बोर्डाच्या चौकटीबाहेर अद्यापि पडू शकला नाही. राफेल आणि ‘ऑगस्टा’सारखे वायदे हीन राजकारणाला किंवा नोकरशाहीच्या लाल फितीला बळी पडले. ३६ नवी राफेलविमाने नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान भारतीय हवाई दलात प्रवेश करतील. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ६ देश अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतात बनवण्यासाठी स्पर्धा करताहेत. याविषयी होणारा निर्णय पुढील एक ते दोन वर्षात घेतला जाईल आणि अत्याधुनिक विमाने भारतातच तयार होतील. एका बाजूला भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना वायुदलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्याअपघातामुळं या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. वायुदलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेषण करत असतानाच वायुदलात सेवा करणाऱ्या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.

 

अद्ययावत उत्पादने तयार करावी

 

भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून वायुदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर भविष्यात चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणाऱ्या संकटाला तोंड देणे अवघड होईल. वायुदलाला अ‍ॅडव्हान्स जेट ट्रेनर दिले जावे. संरक्षणदलाच्या दृष्टिकोनातून संरक्षण उद्योग आणि निर्यात याबाबींकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. अद्ययावत उत्पादने तयार करावी व त्यांची निर्यात करण्याचेही प्रयत्न करावेत, ज्यामुळे विमानांची किंमत कमी होईल. मी आशावादी वृत्तीचा असल्याने मला असे वाटते की, नवीन सरकार भारतीय वायुदलाचे ब्रीदवाक्य ‘नभ अवकाश स्पृशं दीप्तं’ पूर्ण करतील व वायुदलाची सातत्याने प्रगती होत राहील.

 

भारतीय वायुदलातील लढाऊ विमाने

 

मिग २१ : सध्या एकूण १२५ सेवेत. सर्वात जुने म्हणजे १९६० साली सेवेत दाखल झालेले. २०१७ पर्यंत त्यांना सेवानिवृत्त करून त्यांच्या जागी भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय. ४८ तेजस विमानांसाठी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’कडे मागणीही नोंदवली आहे.

 

मिग २७ (बहादूर) : सध्या एकूण १०० सेवेत. ५० ते ५५ वर्षे जुनी. प्रामुख्याने जमिनीवर मारा करण्यास उपयुक्त.

 

जॅग्वार (समशेर) : सध्या एकूण १३९ सेवेत. ही विमाने४० एक वर्षे जुनी असून, त्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. मुख्यत्वे करून जमिनीवर व जहाजांवर हल्ला करण्यास उपयुक्त.

 

मिग २९ (बाझ) : सध्या ६६ सेवेत. जमिनीवर मारा करण्यासाठी किंवा शत्रूच्या विमानांवर हवेत हल्ला करण्यासाठी उपयुक्त. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे.

 

मिराज (वज्र) : सध्या केवळ ५१ सेवेत. हवाई संरक्षण किंवा जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे.

 

सुखोई ३० एमकेआय : वायुदलातील सर्वात आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त. सध्या अशी २०४ विमाने वायुदलात दाखल झाली असून आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत. कालबाह्य होत चाललेल्या विमानांच्या जागी ‘तेजस’ व्यतिरिक्त फ्रेंच बनावटीची ‘राफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले आहे.

 

भारतीय वायुदलाने आधी ‘जग्वार’ आणि ‘मिराज’वापरणाऱ्या देशांशी संवाद साधून त्यांच्याकडील सेवानिवृत्त विमानांचे तांत्रिकदृष्ट्या सक्षम भाग काढून भारतीय विमानांमध्ये वापरण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे ११८ ‘जग्वार’ विमाने आहेत, पण त्याच्या सुट्या भागांची कमतरता असल्याने जी विमाने हवेत उडू शकतात, त्याची संख्या खूप कमी आहे. नावीन्यपूर्ण पद्धती वापरून आपल्या विमानांचे आयुष्य वाढवून युद्धक्षमता वाढवण्याच्या वायुदलाच्या या पद्धतीचे देशाने कौतुकच करायला पाहिजे. कारण, आपण कमीत कमी पैसे खर्च करून आपली विमाने आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat