ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर मतदारसंघात मोठा उत्साह
महा एमटीबी   29-Apr-2019
ठाणे : राज्यातील इतर १७ मतदारसंघासह ठाणे, कल्याण, पालघर व भिवंडी मतदारसंघामधील मतदारांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत भिवंडी मतदारसंघात ३०.३० टक्के, पालघर मतदारसंघात ३६.१६ टक्के, कल्याण मतदारसंघात २५.३१ टक्के तर ठाणे मतदारसंघात २९.६३ टक्के मतदान झाले. यावेळी अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

ठाणे

 

ठाणे मतदारसंघांत दुपारी एक वाजेपर्यंत २९.६३ टक्के मतदान झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघांत मतदानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात प्रमुख लढत रंगणार आहे. ठाणे मतदारसंघातील २३ लाख ७० हजार २७६ मतदार येथील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

 

कल्याण

 

कल्याण मतदारसंघांत दुपारी एक वाजेपर्यंत २५.३१ टक्के मतदान झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच कल्याण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळाराम पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कल्याण मतदारसंघात १९ लाख ६५ हजार १३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत येथे टक्के मतदान झाले आहे.

 

भिवंडी

 

भिवंडी मतदारसंघांत दुपारी एक वाजेपर्यंत ३०.३० टक्के मतदान झाले. भिवंडी मतदारसंघामध्ये एकूण १५ उमदेवार रिंगणात असून भाजपचे कपिल पाटील, काँग्रेसचे सुरेश टावरे व वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. ए. डी. सावंत यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. भिवंडी मतदारसंघात १८ लाख ८९ हजार ७८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

पालघर

 

पालघर मतदारसंघांत दुपारी एक वाजेपर्यंत ३६.१६ टक्के मतदान झाले. पालघरमधून शिवसेनच्या राजेंद्र गावित यांच्यासह १२ उमदेवार मैदानात आहेत. शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होत असून बळीराम जाधव हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. पालघर मतदारसंघात १८ लाख ८५ हजार २९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

 

ज्येष्ठ संशोधक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी एलआयसी मंडल मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात किसननगर शाळा क्र. ३ मध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ठाणे मतदारसंघांचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनीही सेंट जॉन बाप्टीस्ट शाळा येथे सहकुटुंब मतदान केले. यासोबतच लेखक, दिग्दर्शक विजू माने यांनी शिवाई नगर येथे जाऊन मतदान केले तसेच अभिनेत्री सुरुची अडारकर हिनेही मतदानाचा हक्क बजावला.

 

१ वाजेपर्यंत राज्यात ३१.७४ टक्के मतदान

 

सकाळी ११ वाजेपर्यंत नंदुरबार मतदारसंघात ४०.०५ टक्के, धुळे मतदारसंघात ३१.०८ टक्के, दिंडोरी मतदारसंघात ३५.६९ टक्के, नाशिक मतदारसंघात ३०.८६ टक्के, पालघर मतदारसंघात ३६.१६ टक्के, भिवंडी मतदारसंघात ३०.३० टक्के, कल्याण मतदारसंघात २५.३१ टक्के, ठाणे मतदारसंघात २९.६३ टक्के, मुंबई उत्तर मतदारसंघात ३२.९३ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २९. ८७ टक्के, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ३२.३७ टक्के, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात २८. ५९ टक्के, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ३०. ०२ टक्के, मुंबई दक्षिण मतदारसंघात २८.२३ टक्के, मावळ मतदारसंघात ३१.८७ टक्के, शिरुर मतदारसंघात ३२. ०५ टक्के व शिर्डी मतदारसंघात ३४.८७ टक्के मतदान झाले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat