आसामसह बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदानाला मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रासह १४ राज्यांमधील ११५ जागांसाठी झालेल्या मतदानात ठिकठिकाणच्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत मताधिकाराचा वापर केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केले.

 

निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील १४, आसाममधील ४, बिहारमधील ५, छत्तीसगढमधील ७, गोव्यातील सर्व २, गुजरातमधील सर्व २६, केरळातील सर्व २०, कर्नाटकातील १४, ओडिशातील ६, उत्तर प्रदेशातील १०, बंगालमधील ५, दमण दीव, दादरा नगर हवेली आणि जम्मू-काश्मिरातील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान घेण्यात आले. देशभरात सरासरी ६५ टक्के इतके मतदान झाले, तर हिंसक घटना होऊनही आसाम व पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे सर्वाधिक ८१ टक्के आणि ७९ टक्के इतके मतदान झाले.

 

राज्यातही सकाळपासूनच मतदानाला चांगलाच जोर होता, तर सरासरी ५६.५७ टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रातील ज्या १४ जागांसाठी मतदान झाले, त्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, सोलापूर, हातकणंगले आणि अहमदनगरचा समावेश आहे.

 

राज्यातील प्रतिष्ठेच्या लढती

तिसर्‍या टप्प्यात राज्यात काही प्रतिष्ठेच्या लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जालन्यात रावसाहेब दानवे यांना काँगे्रसचे विलास औताडे यांनी आव्हान दिले आहे, तर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपच्या कांचन कुल रिंगणात उतरल्या आहेत. अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे-पाटील भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांना राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघातील लढतही महत्त्वाची ठरणार आहे.

 

बंगालमध्ये हिंसाचार, तृणमूलकाँग्रेसचे ३ कार्यकर्ते जखमी

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदानाला आज, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट लागले. मुर्शिदाबाद येथे मतदान सुरू असताना गावठी बॉम्ब फेकल्याने तृणमूल काँग्रेसचे ३ कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना डोमकल महानगरपालिका येथे घडली. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@