पाकपेक्षा यांनाच भीती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |




नरेंद्र मोदींनी काश्मीरबाबत ठोस भूमिका घेतल्याने आपल्या भवितव्याची, काश्मीरच्या कथित जहागिरीची चिंता त्यांना सतावू लागली. आज मेहबूबा मुफ्ती असो व अब्दुल्ला कुटुंबीय, त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द याचीच साक्ष देतात. आता काश्मीरच्या दुर्दैवासाठी कारणीभूत ठरलेल्या या नेत्यांना किती काळ भुलायचे की हद्दपार करायचे, याचा निर्णय तिथल्या जनतेनेच घ्यायला हवा.

 

भारत पाकिस्तानच्या अणुबॉम्बला भीक घालत नाही. आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत आणि आम्ही ते दिवाळीत फटाक्यांसारखे उडवण्यासाठी ठेवलेले नाहीत,” अशा कठोर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या बाडमेरमधील प्रचारसभेत ठणकावले. त्यानंतर पाकिस्तानसारख्या नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी निरूपयोगी ठरलेल्या शांतता-अहिंसा वगैरे पुस्तकी तत्त्वज्ञानावर प्रवचने झोडणार्‍यांना नरेंद्र मोदींवर टीका करण्याची आणखी एक उबळ आली. परिणामी, डाव्या-बुद्धिजीवी-इतिहासकार वगैरे मंडळींनी स्वातंत्र्यानंतर आळवलेला अणुयुद्धाच्या भीतीचा राग या लोकांनी पुन्हा एकदा गाऊन दाखवला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी अणुयुद्धाचा भडका उडवू इच्छितात, त्यांना जनतेची नव्हे, तर फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी आहे,” अशी भाषा त्यांनी वापरली. सर्वसामान्य जनतेने मात्र पंतप्रधानांच्या रोखठोक भूमिकेला पसंती दर्शवत नरेंद्र मोदींच्या कणखरपणामागेच उभे राहणे पसंत केले. एका बाजूला शांततेचे पालुपद लावणारे, तर दुसर्‍या बाजूला मोदींना पाठिंबा देणारे, अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांचे ना ‘पाक’ प्रेम उफाळून आले. “भारताने जसे दिवाळीसाठी अणुबॉम्ब ठेवलेले नाहीत, तसेच पाकिस्ताननेही ईदसाठी अणुबॉम्ब ठेवलेले नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला. आपल्या विधानांतून जणू काही मेहबूबा मुफ्तींनी समस्त भारतीयांना युद्धाची भीती घातल्याचेच लक्षात येते. परंतु, डावे-बुद्धिजीवी असो वा, मेहबूबा मुफ्तींकडून केली जाणारी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटेल आणि भारतीय उपखंड नष्ट होईल, ही भाषा बचावात्मक असल्याचे दिसते. सोबतच या मंडळींना जागतिक राजकारणाचे भान उरले नसल्याचीही यातून खात्री पटते.

 

वास्तविकपणे कोणताही देश स्वतःहून अणुयुद्ध छेडण्याची शक्यता सध्याच्या युगात तर अजिबातच दिसत नाही. मात्र, युद्धाची भीती दाखवून आपला कार्यभाग साधणार्‍यांकडून देशाचे, सैन्यदलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जातात. वस्तुतः जगातील अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांनी अणुबॉम्बची निर्मिती स्वतः सबल होत इतरांनी आपल्यावर हल्ला करू नये, याच उद्देशाने केलेली असते. नरेंद्र मोदींनीदेखील त्याचीच आठवण करून दिली, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल? उलट आपल्याकडे अणुबॉम्बसारखी संहारक शक्ती असूनही २०१४ पूर्वीची सरकारे पाकिस्तानने कितीही कागाळ्या-कुरापती केल्या तरी तोडीस तोड उत्तर देण्याऐवजी हातावर हात ठेवून बसण्यालाच रणनीती समजत होते. ‘जग काय म्हणेल,’ ही भीतीदेखील त्यांच्या अशा वागण्यामागे होती. नरेंद्र मोदींनी हाच ‘जग काय म्हणेल’चा शेपूटघालेपणा बाजूला सारत, आम्ही आमच्या देशाच्या एकता-अखंडता व सार्वभौमत्वासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची हिंमत बाळगतो, अशी खमकी भूमिका घेतली. शिवाय जगभरातील अमेरिका, इस्रायल, रशिया, जपान, फ्रान्स त्याचबरोबर आखाती देशांशीही उत्तम संबंध प्रस्थापित करून भारताचे एक अलौकिक स्थान निर्माण केले. त्याला व्यापाराची, व्यवसायाची, बाजारपेठेची पार्श्वभूमी आहेच, पण ती वापरण्याचे कौशल्य हे मोदींनीच दाखवले. म्हणूनच भारताने पाकिस्तानवर सुरुवातीला ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि यंदा ‘एअरस्ट्राईक’ करूनही जगातल्या कोणत्याही देशाने अवाक्षरही काढले नाही. आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा मुत्सद्देगिरीच्या साह्याने खुबीने वापर करून घेणारा नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान ज्यावेळी आमच्याकडची अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, असे म्हणतो, तेव्हा त्यामागे जग आपल्यासोबत असल्याचा विश्वासही असतो. म्हणजेच पाकिस्तानने दहशतवाद्यांचे कारखाने बंद केले नाहीत, भारताची आगळीक करणे सोडले नाही, तर भारत पाकिस्तानला होत्याचे नव्हते तर करेलच, पण तेव्हा जगदेखील आपल्यासोबत असेल, याची ती ग्वाही असते. मेहबूबा मुफ्तींसारख्या स्वतःच्या पायापुरते पाहणार्‍यांना ते कसे समजेल?

 

दुसरीकडे मेहबूबा मुफ्तींचे पाकिस्तान प्रेम आजचे नाही आणि ते कधी लपलेही नाही. काश्मिरी जनतेच्या भावनांशी खेळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी मेहबूबा असो वा त्यांचे दिवंगत पिताश्री जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद असो, दोघांनीही पाकिस्तानशी ‘कोणत्याही परिस्थितीत’ चर्चेचे समर्थन केले. मेहबूबा मुफ्ती यांनी तर सुरक्षा दलांनी खात्मा केलेल्या दहशतवाद्यांच्या घरी जाण्याचे, सैन्यदलांनी पकडलेल्या संशयित काश्मिरी युवकांना सोडवून आणण्याचे आणि सैन्यादलांवर मानवाधिकार उल्लंघनाचे खोटेनाटे आरोप करण्याचे उद्योग केले. ‘सॉफ्ट सेपरेटिस्ट’ किंवा ‘सौम्य फुटीरतावादीही संकल्पना सर्वप्रथम मेहबूबा मुफ्तींसाठीच वापरली गेली, ती त्यांनी केलेल्या अशा कारनाम्यांमुळेच! दरम्यानच्या काळात भाजपशी आघाडी करून सरकार स्थापन केल्यानंतर, खोर्‍यातल्या बुर्‍हान वाणी नावाच्या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले तेव्हा मात्र मेहबूबा मुफ्तींनी वाणीच्या मृत्यूनंतर होणार्‍या विरोधावर, ‘ते लोक सैन्य तळांवर दूध वा टॉफीसाठी गेले होते का?,’ असा सवाल केला होता. पुढे मात्र राज्य सरकार टिकले नाही आणि मेहबूबा मुफ्तींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. म्हणजेच सत्तेत असताना फायद्यासाठी सरकारसोबत असल्याचे म्हणायचे आणि सत्ताच्युत झाले की, लगेच विरोध करायचा, ही काश्मिरी नेत्यांची नेहमीची नीती मेहबूबांनीही अवलंबल्याचे स्पष्ट होते. आपली जुनी प्रतिमा पुनरुज्जीवित करण्यासाठी मेहबूबांनी मग सुरक्षा दलांवर आरोपबाजी करण्याची आणि कलम ३७० व कलम ३५ ए वरून भारताच्या भूमिकेशी विपरीत वागण्याची मालिकाच लावली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना एक संधी देण्याची मागणी करण्यापासून ते २०२० साली जम्मू-काश्मीर राज्य भारतापासून फुटून निघेल, असे तारे तोडण्यापर्यंत मजल मारली. आताचे त्यांचे अणुबॉम्बबद्दलचे विधान अशा देशविरोधी वागणुकीचाच एक भाग.

 

काश्मिरी नागरिकांचे दुर्दैव असे की, त्यांना मिळालेले सर्वच नेते मेहबूबा मुफ्तींच्या श्रेणीतलेच होते आणि आहेत. शेख अब्दुल्लांपासून सुरू झालेला हा विघातक प्रवाह फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि फुटीरतावाद्यांपर्यंत चालत आला. आपापले स्वार्थ साधून घेताना या मंडळींनी राज्यातल्या जनतेच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षांचा कोणताही विचार केला नाही. पृथ्वीवरील ‘नंदनवन’ म्हटल्या जाणार्‍या काश्मीरच्या विकासाचे गाडे रुळावर यावे, म्हणून या लोकांनी कधी प्रयत्न केले नाही. केवळ केंद्र सरकारकडून हजारो कोटींची पॅकेजेस घ्यायची, त्यातून स्वतःचे खिसे भरायचे, फुटीरतेची बीजे रोवायची, सर्वसामान्यांना वेठीस धरायचे असल्याच उचापत्या केल्या. काश्मीरमध्ये उद्योगधंदे यावे, लोकांना रोजगार मिळावा म्हणून या लोकांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. उद्योग आले तर त्यातून आर्थिक संपन्नता येईल, लोक शिक्षण घेतील, त्यांना नव्या जगाची ओळख होईल, त्यांच्या ज्ञानात-माहितीत भर पडेल आणि मग आपल्यामागे धावणारे कोणी उरणार नाही, अशी मतलबी मानसिकता यामागे होती. पाकिस्तानला पूरक ठरेल, राज्यात अशांतता कायम राहिल, यासाठीही या लोकांनी काम केले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरबाबत ठोस भूमिका घेतल्याने आपल्या भवितव्याची, काश्मीरच्या कथित जहागिरीची चिंता त्यांना सतावू लागली. आज मेहबूबा मुफ्ती असो व अब्दुल्ला कुटुंबीय, त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द याचीच साक्ष देतात. आता काश्मीरच्या दुर्दैवासाठी कारणीभूत ठरलेल्या या नेत्यांना किती काळ भुलायचे की हद्दपार करायचे, याचा निर्णय तिथल्या जनतेनेच घ्यायला हवा. सोबतच अन्य फुटीरतावाद्यांप्रमाणेच या लोकांवरही काही निर्बंध टाकता येतील का, याचाही केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, तरच काश्मीरचे भले होईल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@