मुक्ततेचा ठाव घेणारा चित्रकार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019   
Total Views |


नुकताच ललित कला अकादमीचा चित्रकला क्षेत्रातला राष्ट्रीय पुरस्कार चित्रकार विक्रांत भिसे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या चित्रातील सत्य उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझे वेगळे

जिंकणे ना हारणे, मुक्तत्वाची आस ही

माणूसपणाच्या अर्थाचे चित्र माझे वेगळे

 

रंगाच्या दुनियेतला अवलिया तरुण म्हणून विक्रांत भिसे या तरुणाचे नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. चित्रकला क्षेत्रातली विविध पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत. ‘कॅमलिन आर्ट फाऊंडेशन’चा ‘नॅशनल युरोप टूर अवॉर्ड’, इंडियन अकादमी ऑफ फाईन आर्ट अवॉर्ड - अमृतसर, ऑल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी अ‍ॅवॉर्ड- नवी दिल्ली, बॉम्बे आर्ट सोसायटी अ‍ॅण्ड गोल्ड मेडल, प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशन अ‍ॅवॉर्ड, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अवॉडर्र्, महाराष्ट्र राज्य पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

त्यांच्या ‘इम्प्रेशन’ या चित्राला नुकताच ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. माणूस म्हणून जगताना एखाद्या सामान्य माणसाला सर्वच पातळ्यांवर करावा लागणारा संघर्ष हा विक्रांत यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू. विक्रांतच्या चित्रातला मुक्ततेचा अर्थ त्यांच्या जीवनातही पुरेपूर उतरला आहे. कोणाचीही गुलामी, अन्याय सहन करण्यासाठी माणसाचा जन्म झाला नाही, असे त्यांचे म्हणणे.

 

चित्रकार विक्रांतचे म्हणणे आहे की, “माझा अभिव्यक्ती आणि मानवी स्वातंत्र्यावर विश्वास आहे.” विक्रांत यांची जडणघडण कशी झाली असेल? मूळचे सांगली या तासगावचे, पण मुंबईत स्थायिक झालेल्या विश्वास आणि जयश्री भिसे या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा विक्रांत. विक्रोळीमध्ये राहणार्‍या विक्रांतचे लहानपण अतिशय सर्वसामान्य. मात्र, चित्रांचे वेड अगदी वेड्यासारखे होते. शाळेतल्या सगळ्या वह्यांवर चित्र काढणारे विक्रांत. विक्रोळी विद्यालयात शिकत असताना, एका चित्रकला स्पर्धेत विक्रांत यांना पारितोषिक मिळाले.

 

विक्रांत यांच्या आयुष्यात तो दिवस खास होता. मात्र, त्यावेळीही चित्र काढणे हा फक्त अनेक छंदांपैकी एक विरंगुळा होता. कारण नृत्य, गाणे, क्रिकेट या अनेक गोष्टींमध्ये विक्रांतला चांगलीच गती होती. दिवस जात होते. विक्रांत यांच्या मनातली चित्रांची ओढ कायम होती. या दरम्यान विक्रांत कामाला जाऊ लागले. सकाळी सात ते रात्री सात कामाला जाणे. त्या कालावधीत वाहनांमधून प्रवास करताना, रस्त्यामधून प्रवास करताना त्यांना माणसांचे अंतरंग वाचण्याची सवय, नव्हे छंदच जडला. त्या काळात त्यांना जाणवले की, प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी जायचे आहे, काही ना काहीतरी पाहिजे आहे. ते भावचित्र प्रत्येकाचे वेगळे, पण त्यातला अर्थ एकच, कुठेतरी पोहोचायचे आहे.

 

या दरम्यान काम आणि क्रिकेट खेळणे यामध्ये त्यांचा दिनक्रम व्यस्त असे. त्या दरम्यान विक्रांत यांना चित्रकलेची ओढ मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. ती ओढ वडिलांना जाणवली होती. त्यामुळे त्यांनी फाऊंडेशन कोर्ससाठी विक्रांत यांचे नाव नोंदवले. आदल्या दिवसापर्यंत काम करून दुसर्‍या दिवशी विक्रांत कोर्ससाठी पोहोचले. हातात प्लास्टिकची पिशवी, चित्रकलेचा पेपर आणि कसेही वाढलेले अस्ताव्यस्त केस. मात्र, याही वेशात विक्रांतच्या चेहर्यावर नवे काही शिकण्याची उत्सुकता आणि स्वातंत्र्याची ओढ असलेला बिनधास्तपणा लपत नव्हता. तिथे इतर सर्व विद्यार्थी चित्रकार बनावे, या दृष्टीने लहानपणापासूनच विविध कोर्स, सराव करून आलेले. या पार्श्वभूमीवर विक्रांतला फक्त जाणीव होती की, आपल्याला शून्यातून शिकायचे आहे.

 

आपला जन्म, आपले समाधान केवळ चित्रांमध्येच आहे, याची मूळ जाणीव विक्रांतला इथेच झाली. पुढे रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये डिपीएडपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. या कालावधीत ते छोटी-मोठी कामेही घेत. पुढे व्यावसायिक कलाकार म्हणून त्यांनी अंधेरी-दहिसर वगैरे ठिकाणी नोकर्‍याही केल्या. मात्र, नोकरी करताना त्यांना मनातून अस्वस्थता वाटे. जर पगार मिळवण्यासाठीच चित्रकलेचे शिक्षण घेतले, तर मग चित्रकला का शिकलो? दुसरे कोणतेही शिक्षण घेऊन मुकाट कारकूनगिरी, चपराशीगिरीही करू शकत होतो. चित्रकलेचे काय? मनासारखी चित्रे काढता यावीत म्हणून त्यांनी नोकरी सोडली. चित्र, रंग यांचा विचार मुक्तपणे करता यावा, यासाठी त्यांना मुक्तता हवी होती. त्यांनी शाळेची नोकरीही सोडली. स्वतःचा चित्र स्टुडिओ काढला. या सर्व प्रवासात त्यांची पत्नी सिद्धी यांची साथ मोलाची आहे.

 

विक्रांत यांचे ध्येय आहे की, चित्रकला हे त्यांचे शस्त्र आहे. त्याद्वारे समाजाचे प्रबोधन करावे. आपल्या चित्रशैलीद्वारे जागतिक स्तरावर सुरू असलेल्या विविध समस्यांचा मागोवा घेत व्यक्त होण्याचा त्यांचा विचार आहे. एक भारतीय कलाकार म्हणून जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याचा त्यांचा प्रयास आहे. कलेच्या माध्यमातून समाजहित साधणारे विक्रांत हे आज होतकरू कलाकारांचे दीपस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या कलाक्षेत्रामध्ये नवीन मापंदड तयार केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणार्‍या नवकलाकारांना प्रेरणा मिळत आहे.

 

आज देशभरात असे चित्र उभे केले जाते की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य चिरडले जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिव्यक्तिस्वातंत्र्य हाच कलेचा ध्यास मानणार्‍या विक्रांत यांच्या कलाकृतीला आज राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. हे चित्र अभिव्यक्तिस्वातंत्र्याचीगळचेपी होते असे म्हणत कांगावा करणार्‍यांसाठी फार बोलके आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@