डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली हॅप्पीवाली फीलिंग पद्धतीने!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकंदरीत योगदान आपल्या सगळ्यांना चांगलेच माहीत आहे. बाबासाहेबांना वाचनाची, शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांनी ज्ञानाच्या भुकेसमोर कधीच पोटाच्या भुकेला महत्त्व दिले नाही. ‘शिका आणि शिकू द्या,’ हा त्यांनी घेतलेला ध्यास तरुणांच्या मनात अजूनही घर करून आहे. तर एकंदरीत अशा अभ्यासू, ज्ञानी महापुरुषाची जयंतीही तितकीच खास आणि हॅप्पीवाली फीलिंग पद्धतीने करायचा निर्धार पक्का झाला.

 

बाबांनी, मुलांनी शिकावे यावर विशेष भर दिला होता. त्यांचा हाच विचार आपल्या उपक्रमात आम्ही मांडला. मी माझ्या संपूर्ण टीमसोबत विचारविनिमयाने ‘प्रोजेक्ट ज्ञानदान’ची बांधणी केली. या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही आमच्या मित्रपरिवार मंडळींकडून त्यांनी वाचून झालेली पण त्यानंतर घरात पडून असलेली पुस्तके गोळा करून ती अनाथाश्रमातील चिमुकली तसेच वस्तीमधील गरजू लहान मुलांच्या हाती पोहोचविण्याचा निश्चय पक्का केला आणि निश्चयानुसार लागलो कामाला. या कामी सोशल माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब यांचा मोलाचा उपयोग झाला. विविध पोस्टमधून टीम हॅप्पीवाली फीलिंगने लोकांना निवेदन केले की, “जास्तीत जास्त सहभाग घेऊन प्रत्येकाने पुस्तकरूपी ज्ञानदान करावे.”...आणि विशेष म्हणजे या उपक्रमाला मुंबई, नवी मुंबईसोबत पुणे, सोलापूर तसेच शेगाव इथूनही खूप चांगला प्रतिसाद लाभला. पुणेकरांचे खास कौतुक. कारण, त्यांनी खास वैयक्तिक येऊन जमलेली पुस्तके माझ्या हाती सोपवली.


ज्ञानदानाच्या या उपक्रमात बरेच मदतीचे हात पुढे सरसावले आणि बघता बघता आम्ही पुस्तकवाटपाच्या एक दिवस आधीपर्यंत शंभर पुस्तकांचा आकडा गाठला. माझ्या पुणे येथील प्रतिनिधींचा रात्री फोन आला. उद्या बाबांची एकशे अठ्ठाविसावी जयंती, जमत असेल तर आपण उद्या १२८ पुस्तके वाटू. तसा विचार खूप चांगला होता पण, त्याची पूर्तता करण्यासाठी अठ्ठावीस पुस्तके कमी पडत होती, ती आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी विकत घ्यायची ठरवली. सकाळी उठून त्याच कामासाठी मी निघालो, तोच इमारतीच्या गेटवर आमच्या सिक्युरिटी मामांनी (भगवान गायकवाड) मला अडवले आणि माझ्या हातात एक पिशवी सोपवली. त्यात वीस पुस्तके होती. मामा म्हणाले, “गेला आठवडा तुमची धावपळ पाहतोय, तुम्ही गरजू पोरांना पुस्तकं वाटणार, हे मला कळले आणि मी आमच्या चाळीतून माझ्याकडून जमली तितकी पुस्तकं गोळा करून आणलीत. त्यावेळी मी मामांकडे आणि त्या पिशवीकडे फक्त एकटक निःशब्द होऊन पाहत होतो. मला कळतच नव्हतं की, त्यांचे आभार कसे मानावे. तोंडातून शब्द फुटत नव्हते. भारावून मी मामांना घट्ट मिठी मारली आणि राहिलेली आठ पुस्तके विकत घेऊन आलो.

 

ठरल्याप्रमाणे आम्ही नियोजित वेळेत कोपरखैरणे येथील जनविकास सोसायटी बालक आश्रमाला भेट दिली, तिथल्या मुलांना आम्ही पुस्तकरूपी ज्ञानदान केले. मुलं खूप जास्त आनंदी झाली. त्यांनी लगेचच आमच्यासमोरच पुस्तकाचे वाचन सुरूदेखील केले. एक वेगळेच समाधान वाटले त्यावेळी. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम केला होता. तेव्हा वस्तीतील गरजू मुलांच्या संख्येची माहिती रीतसर गोळा केली होती, तीच यावेळी उपयोगी पाडली. त्यानुसार आम्ही पुस्तकांसोबत वस्तीतील प्रवास सुरू केला. वस्तीमधील बच्चा पार्टी आता विशेष ओळखीची झाली आहे. आम्हाला बघून त्यांनी तर आनंदाने उड्याच मारायला सुरुवात केली. मग पुस्तकरूपी आनंद आम्ही त्या चिमुकल्यांसोबतदेखील वाटला. या उपक्रमाबद्दल बोलताना माधुरी बाविस्कर म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, ज्ञानाची भूक असलेल्यांना पुस्तकांची भेट देऊन साजरी करूया आणि खास करून ही पुस्तकं विकत न घेता, अशी पुस्तके द्यायची, जी एकतर वाचून झालेली आहेत किंवा जी पुस्तके घरात धूळ खात पडून आहेत.” हा उपक्रम ऐकून मला अत्यंत आनंद झाला.

 

कारण, माझ्या आयुष्यात मला परिस्थितीमुळे जास्त शिकता आले नाही आणि माणसाची काही स्वप्ने अपूर्ण राहिली की, तो ती स्वप्ने दुसर्‍यांच्या डोळ्यांत पाहून खुश होतो. तसा इतरांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम मला खूप आवडला. मी मग अनेकांना फेसबुकच्या माध्यमातून मेसेज केले, पोस्ट टाकल्या आणि यासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘प्रोजेक्ट ज्ञानदान’ ला सपोर्ट करत अनेकांनी यात भाग घेतला आणि तब्बल १२८ पुस्तके गोळा झाली, जी राहुल बोबडे आणि अ‍ॅड. माधवी सवाने यांच्या माध्यमातून पुण्याहून मुंबईला रवाना झाली.

 

ही सगळी पुस्तके टीमने मुंबईमधील अनेक भागांत नेऊन चिमुकल्यांना देऊ केलीखरंच, जेव्हा युट्यूबवर याचा अनुभव पाहिला तर तो आनंद त्या मुलांच्या चेहर्‍यावर खूप स्पष्टपणे दिसत होता. त्यात पुस्तकात असलेल्या पंचतंत्र, छान-छान गोष्टी, शिवाजी कोण होता, स्वातंत्र्याची आहुती, तुकाराम, महात्मा फुले यासारख्या पुस्तकांचा समावेश होता. जेणेकरून मुलांना मनोरंजनासोबतच मिळणार्‍या ज्ञानातून आनंद अनुभवता येईल. खरंच, असे अनेक उपक्रम विजय माने यांच्या चॅनेलवर ते टाकत असतात आणि आम्हाला सहभागी करून घेत असतात. हॅप्पीवाली फीलिंगमुळे आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या आयुष्यातही हा आनंद आला आहे. याबाबत राहुल बोबडे यांचे म्हणणे आहे की, “पुस्तक सगळ्यांसाठी अशा प्रकारचा हा उपक्रम खरंच खूप गरजेचा आहे.

 

आनंदाचे हे रंग, आनंदाचे तरंग.

आनंदी करण्या सर्वांना,

चला होऊ एकसंघ

 

ही भावना त्यातून मनामध्ये उमटली. माधवी सवाने यांनी आपले मत मांडताना सांगितले की, “सुरुवातीला काही वाईट अनुभव आले आणि मन खचून जात होेते. पण जेव्हा आम्ही, शनिवारवाड्यासमोरील रद्दी डेपोमध्ये गेलो, पुस्तकं घेतली आणि मोलभाव करताना जेव्हा दुकानदार काकांना म्हणजेच प्रकाश मुंदडा-महावीर काकांना आमचा उपक्रम सांगितला तेव्हा त्यांनी चक्क एक रुपयाही घेतला नाही. वर म्हणाले, “बेटा, तुम्ही चांगल्या कामासाठी करता आहात सगळे आणि आमची पण इच्छा असते पण आम्ही करू शकत नाही. तुम्ही करताय, त्यात आमचा सहभाग समजा. पण मी पैसे घेऊ शकत नाही.” माझ्या आनंदाला तर पारावार उरला नाही आणि डोळे आनंदाने ओथंबून वाहत होते. खरंच, इतकी हॅप्पीवाली फीलिंग कधी अनुभवली नव्हती, जितकी या उपक्रमात अनुभवली.” बाकी, हाच आनंद घेऊन आम्ही विजय माने यांच्या घरी गेलो. त्यांनीदेखील आमचे आदरातिथ्य खूप स्नेहाने केले आणि खूप सार्‍या गोष्टी आणि पुढील उपक्रमात भाग घेण्यासाठी उत्साह दिला. “खरंच, या माध्यमातून खूप सारा आनंद अनुभवता आला. आज आम्ही हॅप्पीवाली फीलिंगचे एक भाग आहोत, हेच आमच्यासाठी खूप आहे.”

 

विशाल कदम या उपक्रमाबद्दल सांगतात की, “प्रोजेक्ट ज्ञानदान’ च्या माध्यमातून लाखमोलाचा आनंद जगता आला. विशेष म्हणजे वस्तीतील मुलांच्या चेहर्‍यावरचे हसू डोळ्यांना तृप्ती देऊन गेले. आता हे अशाच पद्धतीने कार्य निरंतर चालू ठेवण्यासाठी अजून हुरूप आला आहे. आता वाट पाहतो आहे तो, पुढील प्रोजेक्टच्या घोषणेची जो की ‘हॅप्पीवाली फीलिंग टीम’चा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल.” खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला की, या आनंदी टीमचा मी एक भाग आहे. शेवटी इतकंच सांगेन की, तसं बघायला गेलं तर फार लहान उपक्रम होता हा, पण या छोट्याशा उपक्रमातून खूप आनंद अनुभवला सगळ्यांनी.” एकंदर समाजहित साधू पाहणार्‍या समाजशील सहकार्‍यांच्या साहाय्याने हा उपक्रम खूप काही आशादायी भावना देऊन गेला. रियल हॅप्पीवाली फीलिंग!

 
- विजय माने  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@