मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा
महा एमटीबी   15-Apr-2019



शाईनडॉटकॉमच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

मुंबई : वाढती महागाई, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती यामुळे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल, असे वाटत आहे.

 

'शाईनडॉटकॉम' या भारतातील अग्रणीय जॉब पोर्टलने केलेल्या पहिल्यावहिल्या उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एचआर किंवा कंपनीच्या दृष्टीकोनाऐवजी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर केंद्रित हे सर्वेक्षण आयटी, बँकिंग आणि फायनान्स, औद्योगिक उत्पादने, शिक्षण/प्रशिक्षण, एफएमसीजी आदी विविध उद्योगांतील कार्यालयांमध्ये करण्यात आले.

 

मुंबई, पुणे आणि चेन्नई यांसारख्या शहरात काम करणाऱ्या व्यावसायिकांना २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मुंबईतील सुमारे ३७ टक्के लोकांना २० टक्के पेक्षा जास्त पगार वाढीची अपेक्षा आहे. पुणे आणि चेन्नईतील ही आकडेवारी अनुक्रमे ३६ टक्के आणि ३८ टक्के आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळूर येथे २१ टक्के लोकांना त्यांच्या पगारात १० टक्के पर्यंत वाढ होईल, असे वाटते आहे. तर देशाची राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये २० टक्के लोकांना कमी पगारवाढ होईल असे वाटते आहे.

 

शाईनडॉटकॉमच्या सर्वेक्षणात निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे, मुंबईतील शिक्षण / प्रशिक्षण क्षेत्रातील तब्बल ६२ टक्के कर्मचारी २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा करत आहेत तर ऑटो क्षेत्रातील सुमारे ५६ टक्के कर्मचाऱ्यांनाही तितक्याच वाढीची अपेक्षा आहे. पुण्यातील ऑटो क्षेत्रातील ४८ टक्के आणि शिक्षण / प्रशिक्षण क्षेत्रातील ३८ टक्के कर्मचाऱ्यांना २० टक्के पेक्षा जास्त वाढीची अपेक्षा आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतांशी क्षेत्रात दमदार वाढ होत आहे आणि एकत्रितरित्या त्यांचे अप्रेझल सेंटीमेंट देशात सर्वात जास्त आहे.

 

पगारवाढीच्या अपेक्षांच्या क्षेत्रवार विश्लेषणातून हे स्पष्ट होते की, बीएफएसआय आणि बीपीओ/केपीओ /आयटीईएस क्षेत्रातील व्यावसायिकांमधील अप्रेझल सेंटीमेंट सर्वात उच्च आहे. या क्षेत्रातील ३५ टक्के पेक्षा जास्त कर्मचा-यांना २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि इंटिग्रेशनच्या जोरावर वृद्धिंगत होत असलेल्या या क्षेत्रांमध्ये इतक्या उच्च अपेक्षा असणे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही, असे मत कर्मचारी आणि व्यावसायिकांचे आहे.

 

काही संस्थांकडून कर्मचाऱ्यांची निराशा

 

या सर्वेक्षणाबद्दल बोलताना शाईनडॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाइरस मास्टर म्हणाले कि, “विविध मेट्रो शहरे आणि क्षेत्रे यांतील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अंतर आहे. बहुतांशी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या अपेक्षा उच्च असल्या तरी, सर्वच संस्था काही या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. शाईनडॉटकॉमवर आम्ही अप्रेझलच्या सत्रानंतर आम्ही आमच्या पोर्टलवर रोजगाराच्या शोधात असलेल्यांची सक्रिय उमेदवारांची संख्या वाढवण्यासाठी सिद्ध आहोत. नेहमीप्रमाणे, आम्ही त्यांना त्यांचे कौशल्य आणि अपेक्षा यानुरूप त्यांना नोकरी सुचवण्यासाठी सर्व प्रयत्न करू तसेच आमच्या शाईन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी व दीर्घकालीन करियर ग्रोथसाठी सक्षम बनण्याची संधी देखील देऊ."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat