मायावती व योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचारबंदी
महा एमटीबी   15-Apr-2019उत्तर प्रदेश : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या सर्वेसर्वा मायावती व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. आयोगाच्या कारवाईनुसार मायावती यांना ४८ तास तर योगी आदित्यनाथ यांना ७२ तास प्रचार करता येणार नाही. मंगळवार, १६ एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून या दोघांना रोड शो, भाषण किंवा मुलाखत देता येणार नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान केल्याने ही कारवाई केल्याचे आयोगाने सांगितले आहे.

 

मायावती काय म्हणाल्या होत्या...

 

७ एप्रिलला झालेल्या एका प्रचार सभेत मायावती यांनी मुस्लिम समाजाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्या म्हणाल्या, "काँग्रेसला वाटतं आपला उमेदवार जिंकू अथवा न जिंकू पण गठबंधनचा उमेदवार जिंकला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी अशा जाती-धर्माचा उमेदवार उभा केला आहे, ज्यामुळे मतविभाजन होऊन भाजपाला फायदा होईल. म्हणूनच मुस्लिम मतदारांनो तुमचे मतविभाजन होऊन देऊ नका."

 

योगी काय म्हणाले होते...

 

योगी आदित्यनाथ यांनी मायावतींच्या भाषणाचा संदर्भ घेऊन एका प्रचार सभेत आम्हाला बजरंग बली यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले होते, "जर काँग्रेस, बसप आणि सपा यांना अलीवर विश्वास असेल तर आम्हाला बजरंग बलीवर विश्वास आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat