खाण्याशी संबंधित मनोविकार आणि त्यांचा किडन्यांवर होणारा परिणाम!
महा एमटीबी   15-Apr-2019 

खाण्याशी संबंधित मनोविकार हे जीवनशैलीशी निगडित असतात असे बरेचदा गृहीत धरले जाते. मात्र, हे गंभीर, प्राणघातक आजार असून त्यातून टोकाची निराशा निर्माण होऊन त्याचा व्यक्तीच्या एकूणच तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो. ‘बुलेमिया नर्व्होसा’ आणि ‘अ‍ॅनारॉक्सिया नर्व्होसा’ (Bulimia Nervosa and Anorexia Nervosa) हे खाण्याच्या घातक सवयींशी संबंधित मनोविकार असून ते चटकन प्राणघातक बनू शकतात. अखंड खात राहणे किंवा भरपूर खाऊन नंतर कॅलरिज आणि वजन वाढू नये म्हणून ते शरीरातून बाहेर फेकणे (उलटी करणे) हे ‘बुलेमिया नर्व्होसा’चे लक्षण मानले जाते. ‘अ‍ॅनारोक्सिया नर्व्होसा’ हे त्याचे दुसरे टोक आहे. यात वजन वाढण्याची टोकाची भीती रुग्णाला वाटत असते. आपण बारीक असायला हवे याचा अतिआग्रह बाळगणार्‍या या व्यक्ती स्वत:च्या खाण्यापिण्यावर अवास्तव बंधने आणतात, व्यायामाचा अतिरेक करतात. याचा पुढचा टप्पा म्हणजे जाणूनबुजून उलटी करणे किंवा वजन कमी होण्यासाठी शरीरावर लॅक्सेटिव्हज म्हणजे सारक औषधांचा मारा करणे अशासारख्या गोष्टी या व्यक्ती करतात.

 

दुर्दैवानेबुलिमिया नर्व्होसा’ आणि ‘अ‍ॅनारॉक्सिया नर्व्होसा’ या दोहोंचाही किडन्यांवर मोठा परिणाम होतो. ‘बुलिमिया’चे निदान झालेल्या व्यक्तींना वेदनादायक मुतखड्यांचा त्रास उद्भवण्याची मोठी शक्यता असते व त्यांच्या किडनीची दीर्घकाळ भरून न निघणारी हानी होते. दुसर्‍या बाजूला ‘अ‍ॅनारॉक्सिया’मुळे किडन्यांना दुखापत होण्याची आणि क्रॉनिक किडनी डिसिज (CKD) म्हणजे किडन्यांचा दुर्धर आजार उद्भवण्याची शक्यता असते. उपाशी राहणे किंवा सतत खाऊन ते उलटी करून शरीराबाहेर फेकणे या प्रकारांतून जीवनसत्त्वांची प्रचंड कमतरता निर्माण होते आणि शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्समध्ये असमतोल तयार होतो. याची परिणती किडन्या नादुरुस्त होण्यामध्ये होते. परिणामी, शरीरात तयार होणारी विषद्रव्ये लघवीवाटे शरीराबाहेर फेकण्याचे कार्य मंदावते. द्रवपदार्थ कमी प्रमाणात प्यायलामुळे डीहायड्रेशन होते. डीहायड्रेशन वाढू लागले की किडनीच्या कार्यामध्ये बिघाड सुरू होतो. यातून रक्तदाबाला चालना मिळू शकते, इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल डळमळीत होतो आणि रक्तप्रवाहामध्ये विषतत्त्वे साठून राहू लागतात. या आजाराशी डीहाडायड्रेशनचा सततचा आणि फार गंभीर, जवळचा संबंध आहे व त्याचा किडन्यांवर विपरित परिणाम होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये हे अतिधोकादायक ठरू शकते आणि त्या व्यक्तीला किडनी प्रत्यारोपण करण्याची किंवा डायलिसिसची गरज भासू शकते.

 

किडनीच्या बिघाडामागे होण्यामागे खालील कारणे असू शकतात.

 

औषधांचा अतिरेक : ‘बुलेमिया’ आणि ‘अ‍ॅनारॉक्सिया’ यांच्याशी संबंधित अनेक वैद्यकीय समस्या या औषधांच्या अतिरेकामुळे उद्भवतात. उलटीसाठी प्रवृत्त करणारी अनेक औषधे ‘ओव्हर द काऊंटर’ म्हणजे दुकांनांमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय सहज उपलब्ध असतात. अनेक जण या औषधांचे अतिरेकी सेवन करतात. या औषधांमुळे किडनीला होणार्‍या रक्तपुरवठ्यावर मर्यादा येतात. ‘डायुरेटिक’ किंवा ’वॉटर पिल्स’ म्हणजे लघवीला चालना देणारी औषधे डीहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरतात आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण करून अखेर किडनीला हानी पोहोचवतात. ‘अ‍ॅनारॉक्सिया नर्व्होसा’चे शिकार बनलेल्या अनेक माणसांना कॅफिन, तंबाखू, लॅक्सेटिव्हज आणि डायुरेटिक्सचे व्यसन असते. लॅक्सेटिव्हज आणि डायुरेटिक्समुळे किडन्यांचे स्वास्थ्य खालावतेच पण हृदयाचे स्नायूही कमकुवत होतात.

 

को-मॉर्बिडीटीज : संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे की डायबेटिस आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींमध्ये ‘क्रॉनिक किडनी डिसिज’चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. रक्तदाब आटोक्यात ठेवला नाही, तर किडन्यांभोवतीच्या धमन्या कडक होऊ लागतात. जर रक्तातील साखरेचे प्रमाण खूप असेल तर त्यांमुळे किडन्यांमधील रक्तपेशींचे नुकसान होते व त्यामुळे किडनीच्या कार्यावर मर्यादा येतात.

हा प्रश्न खरोखरीच गंभीर असला तरीही या मनोविकाराचा सामना करणार्या व्यक्तींसाठी आशेचा एक किरण आहे आणि तो म्हणजे वेळीच मदतीसाठी हाक मारून योग्य ते उपचार सुरू करणे. ‘बुलिमिया’ आणि ‘अ‍ॅनारॉक्सिया’शी संबंधित अनेक गोष्टी या वेळीच हस्तक्षेप केल्याने पूर्ववत करता येतात. एकदा का या रोगांचे निदान झाले की, मनोविकारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ व जवळचे आप्तेष्ट एकत्रितपणे उपचारांची सुरुवात करून देऊ शकतात. ‘बुलेमिया’ आणि ‘अ‍ॅनारॉक्सिया’ची समस्या हाताळण्यामध्ये मनोविकारतज्ज्ञांची लक्षणीय भूमिका असते. ते तुमच्या भावनिक गरजांच्या व्यवस्थापनामध्ये, तसेच तुमच्या खाण्याच्या सवयींवरच ताबा मिळविण्यामध्ये तुम्हाला मदत करतात. मात्र, ही वैद्यकीय मदत वेळेवर घ्यायला हवी. कारण, काही वेळा फार उशीर झाल्यास कधीच भरून न निघणारे नुकसान होऊ शकते.

- डॉ. हरेश दोडेजा

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि कल्याण येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लान्ट फिजिशियन आहेत.)

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat