माहिती तंत्रज्ञानाचा 'डेटा रक्षक'
महा एमटीबी   14-Apr-2019सध्या माहिती-तंत्रज्ञानातील डेटा सुरक्षित ठेवणे खूप आव्हानात्मक. सुरक्षा कवच तयार करण्याच्या कामात 'दिनेश जोशी' या मराठमोळ्या तरुणाने जगभर नावलौकिक केले आहे. जाणून घेऊया याबद्दल थोडेसे...


सध्याच्या आधुनिक युगात इंटरनेट हेदेखील सर्वांनाच मूलभूत गरजांपैकी असल्याचे वाटते. माहिती तंत्रज्ञान हा विषय सर्वांच्या अगदीच गरजेचा मुद्दा. यामध्ये लाखो, कोट्यवधी काय तर अब्जावधी लोकांचा डेटा सुरक्षित राहणे ही तर अतिशय निकडीची बाब. डिजिटल युगात जगभरातल्या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा होत असतो. हा डेटा सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान कंपन्यांसमोर असते. असे आव्हान पेलणाऱ्या काही निवडक लोकांमध्ये मुंबईमधल्या दिनेश जोशी या मराठमोळ्या तरुणाची निवड झाली आहे. दिनेशने यामध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्याला 'अपाची कसांड्रा कमिटर' होण्याचा मान मिळाला आहे. असा बहुमान मिळवणारा तो जगातला ५४वा संशोधक ठरला आहे. त्याच्या योगदानामुळे जगभरातील हजारो कंपन्यांमधील लाखो ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहिला आहे.

 

मुंबईमध्ये राहणाऱ्या दिनेश जोशीला लहानपणापासूनच संगणकाचे वेड होते. त्याच्याच वयाच्या आठव्या वर्षापासून छोटे छोटे कॉम्प्युटर प्रोग्राम तयार करण्याची आवड निर्माण झाली होती. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे हे कौशल्य लहान वयातच पारखले. या क्षेत्रामध्ये त्याला असलेली गती हेरून त्याच्या आई-वडिलांनी या कौशल्यास प्रोत्साहन दिले. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच, काहीसे दिनेशबाबतही झाले. शालेय शिक्षण घेताना अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ दिनेश कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये घालवू लागला. त्याची आवड आणि जिद्द इतकी पराकोटीची होती की तो स्वत: कॉम्प्युटरच्या भाषा शिकू लागला. पुढे अभियांत्रिकी शिक्षण घेताना 'लिनक्स' या कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमवर त्याने प्रभुत्व मिळवले. अभियांत्रिकी शिक्षण झाल्यानंतर मानखुर्दच्या 'होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन' इथे एक वर्ष 'सिमँटिक डेटा ऑर्गनायझेशन' यावर त्याने संशोधन केले. यानंतर पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेतील अटलांटा येथील जॉर्जिया टेक या विद्यापीठात गेला. तिथे त्याने मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली.

 

मुळातच असलेल्या समाजभानामुळे दिनेश जोशीने आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एक यंत्रणा विकसित केली. यानंतर त्याने 'याहू'मध्ये इंटर्नशिप केली. त्याची काम करण्याची आवड आणि मेहनत पाहून तिथेच त्याला वित्त विभागात डेटा सुरक्षेची नोकरी मिळाली. दिनेशचे काम पाहून अल्पावधीतच त्याची 'प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर' या पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्याची निवड 'अ‍ॅपल'सारख्या नामांकित कंपनीच्या 'कसांड्रा' या डेटासुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लिष्ट सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी झाली. यामध्येही त्याने स्वतःचे अमूल्य असे योगदान दिले. कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये रमणाऱ्या दिनेशने या क्षेत्रातही आपली चमक दाखवली. त्याने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे आज जगभरातल्या १५०० कंपन्यांचा डेटा अधिक सुरक्षित होण्यास मदत झाली. त्याच्या या योगदानाबद्दल 'अपाची कसांड्रा कमिटर' हा बहुमान त्याला देण्यात आला. आत्तापर्यंत अवघ्या ५३ जणांनाच हा बहुमान मिळाला होता. या यादीत दिनेश ५४वा कीर्तिवान ठरला आहे. या योगदानामुळे दिनेशची नियुक्ती अनेक तांत्रिक समित्यांवर करण्यात आली. या विषयामध्ये त्याने एवढे प्रभुत्व मिळवले आहे की, तो या संबधित व्याख्याने देण्यासाठी जगभर भ्रमंती करत असतो. “खूप मेहनत घ्या आणि उत्कृष्टतेशी स्पर्धा करा. यश तुमच्या मागे आपोआपच येईल,” असा मोलाचा सल्ला दिनेशने काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुणांना दिला.

 

दिनेशने स्वतःच्या प्रगती आणि यशासोबतच समाजभानदेखील बाळगले आहे. त्याला समाजासाठी झटण्याची आवड आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'विमेन हू कोड' या संस्थेमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण योगदान. त्याने अमेरिकेमध्ये 'विमेन हू कोड' या नावाची संस्था सुरू केली आहे. या मार्फत जास्तीत जास्त महिलांनी क़ॉम्प्युटर कोडिंग क्षेत्रात यशस्वी व्हावे या उद्देशाने महिलांना प्रशिक्षण दिले जाते. सध्या इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या या जगात कोडिंगचे महत्त्व खूप जास्त मानले जाते. अशामध्ये त्याचे हे पाऊल म्हणजे संगणक क्षेत्रात एक क्रांती आणू शकते. त्याच्या या कर्तृत्वाने त्याने अटकेपार मराठमोळा झेंडा रोवला आहे. त्याने केलेल्या जिद्द आणि चिकाटीचे उदाहरण या क्षेत्रात करिअर करू पाहण्याऱ्या तरुणांसाठी एक मोठा आदर्श मानला ठरेल. मुंबईकर दिनेश जोशीला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा...!

- अभिजीत जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat