रंगांच्या दुनियेतील चिह्न आणि चिह्नसंकेत ...!!
महा एमटीबी   13-Apr-2019


 

पिवळ्या रंगाचे प्रवचन...!!


आपली रंगांच्या दुनियेतली भ्रमंती काही आठवडे सुरूच राहणार आहे. आता वसंत ऋतूची रंगीत तालीम झाली आहे आणि त्याचीही रंगांची उधळण थक्क करणारी असेल. आता गावागावात आणि शहराशहरात, सगळी पाने झडून फुलांनी फुललेला लाल आणि पांढरा पांगारा, रंगीत पक्षांना आकर्षित करतो आहे. मे महिन्याच्या अखेरीस पावसाच्या प्रतीक्षेत गुलमोहर, लाल-गुलाबीपासून शेंदरी रंगांच्या छटांनी समृद्ध होईल. पावसाच्या पहिल्या सरींनी मृद्गंधासह झाडांवरील हिरव्या रंगांच्या प्रत्येक पानावर अगणित छटांचे अनोखे प्रदर्शन भरेल. माझ्या घराच्या खिडकी समोरचा करंजा, हिरव्या आणि पिवळ्याची सरमिसळ असलेल्या पोपटी छटांची भरगच्च महिरप मांडून आधीच तयार आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बहावा आणि शंकासूर आपल्या पिवळ्याजर्द रंगछटांनी परिसर सोन्याचा करत आहेत.

 
 

लाल आणि निळ्या रंगानंतर आपला उरलेला तिसरा प्राथमिक रंग आहे पिवळा. भिन्न संस्कृतींमध्ये हा रंग विविध संदर्भ सूचित करतो. हा रंग सूर्य, सूर्यप्रकाश आणि रोज फुलणारे नवे जीवन याचे दृश्य प्रतीक. मात्र, काही संस्कृतींमध्ये हाच पिवळा रंग कपट, फसवणूक, लबाडी, विश्वासघात, धोका अशा संदर्भाने वापरला गेला आहे. येशू ख्रिस्ताला फाशी देणाऱ्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा अंगरखा घातला होता, या बायबलमधील उल्लेखानुसार ख्रिस्ती धर्मबांधवांना पिवळा रंग वर्ज्य आहे. इस्लाम धर्मसंकल्पनेनुसार, फिकट पिवळा रंग, विश्वासघात आणि धोका सूचित करतो. या उलट तेजस्वी आणि उजळणारा पिवळा रंग हा चातुर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. चिनी दंतकथांमध्ये देवाने पहिला माणूस पिवळ्या रंगाच्या मातीतून बनवला म्हणून चिनी नागरिक पीतवर्णाचे असतात, अशी एक आख्यायिका आहे. चीनमध्ये राज्यकर्ता राजा देवस्वरूप मानला जातो, त्याचे पारंपरिक परिधान नेहमी पिवळ्या रंगाचे असते. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार अनेक चित्र-प्रतिमांमध्ये देवदेवतांचे पवित्र वस्त्र आणि परिधान पिवळ्या रंगाचे म्हणजेच पीतांबर असते. जेजुरीचा मल्हारी म्हणजे सर्वशक्तिमान महादेवाचे एक रूप. याला सूर्यप्रकाशाचा पिवळा रंग प्रिय आहे. म्हणूनच श्रद्धा आणि भक्तीने याला हळदीचा भंडारा वाहिला जातो. एका बाजूला मौल्यवान सोन्याचे रूपक असलेला हाच रंग, वाढत्या वयाचा सूचक आहे. निसर्ग नियमानुसार जीर्ण होणारी झाडाची पाने गळून जाताना पिवळा रंग धारण करतात. आपल्या डोळ्यांच्या रचनेमध्ये लाल रंग सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेतो. त्यानंतर आपल्या डोळ्यांत भरणारा दुसरा रंग आहे ताजा आणि उल्हासित करणारा पिवळा. हा पिवळा आपल्याला उत्साहित करतो, कामं सुरू करण्यास उन्मेष, प्रोत्साहन देतो. मात्र, याच्या अतिवापराने चित्त विचलित होते आणि तणाव निर्माण होतो. पूर्ण पिवळ्या रंगाने रंगवलेल्या खोलीत लहान मुले जास्त रडतात, असे रंगांचा वैज्ञानिक अभ्यास करताना लक्षात आले आहे. काळ्या आणि पिवळ्याचा जोडीने वापर केला जातो तेव्हा ही जोडी सगळ्यात प्रथम आपले लक्ष वेधून घेते. म्हणूनच शहारातील टॅक्सी नेहमीच काळ्या अधिक पिवळ्या रंगाने रंगवल्या जातात. रस्त्याचे दुभाजक आणि वळणावरच्या भिंतीसुद्धा काळ्या अधिक पिवळ्या पट्ट्यांनी रंगविलेल्या असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनचालकाचे लक्ष या धोक्याकडे वेधून त्याला दुरूनच सावध करण्याचे काम ही रंगांची जोडी करते.

 

मध्ययुगीन युरोपमध्ये साधारण बाराव्या शतकांत, लढाईच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या ढाली बनवल्या गेल्या. या ढाली रंगवताना त्यावर पिवळ्या रंगाचा प्रभावी वापर केला गेला. राजा आणि राज्याप्रति असणारी निष्ठा आणि विश्वासाचे प्रतीक असा संदर्भ ढालीवरील या रंगाला त्यावेळी होता. कालांतराने झालेले पराभव आणि फितुरीच्या घटनांमुळे हा पिवळा रंगच भ्याडपणा आणि भेकडपणाचे रूपक बनला. छापील रंगीत जाहिराती-जाहिरात फलक-टेलिव्हिजन असा जाहिरात क्षेत्राचा व्याप आणि दर्शकवर्ग फार मोठा आहे. लहान, तरुण, मध्यमवयीन वृद्ध, स्त्री-पुरुष अशा सर्व वयोगटातील समाजाचा अभ्यास, त्या प्रत्येक गटाच्या मानसिकतेचा अभ्यास, या क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमीच करत असतात. अशा अभ्यासाने जाहिरातीचे डिझाईन, मॉडेल आणि त्यातील रंग यांची अचूक मांडणी केल्याने त्यांच्या उत्पादनाची विक्री वेगाने वाढते. यातील रंगांची योग्य निवड करताना काही निश्चित आडाखे बांधलेले असतात. समर्पक उदाहरण द्यायचे झाले, तर पुरुष दर्शकवर्ग आणि जाहिरातीत वापरलेला पिवळ्या रंगाचा प्रभाव याचे देता येईल. पुरुषदर्शक वर्ग या पिवळ्या रंगाला स्वाभाविक रंग मानतो. याचा अर्थ या दर्शक वर्गासाठी आणि ग्राहक गटासाठी, पिवळा रंग उत्साहित करतो पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी तो रंग बालिश असतो. ग्राहक महिला वर्ग पिवळी साडी, पर्स, बांगड्या, पिवळे परिधान निश्चितपणे विकत घेतात. या उलट पुरुष ग्राहक साधारणपणे पिवळा शर्ट, पिवळी पँट, पिवळे वाहन किंवा पिवळे फर्निचर विकत घेणार नाही. जाहिरात तज्ज्ञांच्या अशा अभ्यासामुळे आपल्या लक्षात येते की, पुरुष ग्राहक गटासाठी बनवलेल्या कुठल्याही माध्यमातील जाहिरातीमध्ये पिवळ्या रंगाचे प्रमाण फार मर्यादित असते.

 

शीर्षखाली असलेला समभूज त्रिकोण हे भूमितीय चिह्न पिवळ्या रंगाचे प्रतीक आहे. उलट्या त्रिकोणाच्या या आकाशात झेपावणाऱ्या मुद्रेला, प्रतीकशास्त्रात आणि चिह्नसंकेतांच्या भाषेत ‘उन्नत’ किंवा ‘उदात्त मुद्रा’ असे संबोधित केले गेले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत असा त्रिकोण हे पार्वतीचे म्हणजे विश्वातील शक्तितत्त्वाचे प्रतीक आहे. सूर्यप्रकाशाकडे उन्नत होणारा असा पिवळ्या रंगाचा समभूज त्रिकोण, ऐहिक-भौतिक संदर्भापेक्षा दिव्य-अलौकिक शक्तीचे प्रतीक आहे. काचेच्या लोलकातून प्रकाश किरण गेले की सात रंगांचा वर्णपट दिसतो, हे शाळेत विज्ञानाच्या तासाला आपण सर्वांनी ऐकलेले आणि कदाचित पाहिलेलेही असते. वर्षा ऋतूत पाऊस पडत असताना, पाण्याच्या अगणित थेंबांतून प्रकाश किरण गेले की असाच क्षितिजावर अंकित झालेला सप्तरंगी इंद्रधनुष्याचा स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो. या वर्णपटात सर्वात जास्त दृश्यमानता आपल्या पिवळ्या रंगाची असते. म्हणजे यातील पिवळा रंग, निसर्गतः सर्वात आधी आपल्याला आकर्षित करतो. उत्साही, प्रकाशमान, उष्ण, तेजस्वी अशा व्यक्त गुणवत्ता असलेला आपला पिवळा रंग नियमितपणे सूर्यप्रकाशाची अनुभूती देतो. चेतना देतानाच हा आपल्याला सावध, चौकस आणि सतर्क बनवतो. हा रंग, खगोलातील बुध ग्रह, आठवड्याचा बुधवार आणि राशिचक्रातील मिथुन आणि सिंह अशा सर्वांचे प्रतीक मानला गेला आहे. चाणाक्ष वृत्ती, एकाग्रता, काम करण्याची प्रेरणा आणि चिकाटी, मोहकता, आत्मविश्वास, प्रसन्नता, समाधानी वृत्ती या सर्व गुणवत्ता ही या रंगाची वैशिष्ट्ये आहेत. मात्र, याबरोबर द्वेष-मत्सर या भावनासुद्धा याच्या सान्निध्यात प्रखर होतात.

 

प्राचीन इजिप्तमध्ये पिवळा रंग हेवा, असुया आणि मत्सराचे प्रतीक मानला गेला होता. आजही युरोपमधील काही ठिकाणी हा पिवळा, भ्याड वृत्ती आणि भेकडपणाचा सूचक मनाला जातो. ऑस्ट्रेलियातील मूळ निवासी आजही हा रंग मृत्यूचे प्रतीक मानतात. चिनी संस्कृतीमध्ये हा सूर्यप्रकाशाचे प्रतीक झाला आणि चीनच्या पहिल्या सम्राटाचे नाव ‘ह्युआंग टी’ होते. या नावाचा शब्दश: अर्थ ‘पिवळा राजा’ असा आहे. पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा निसर्गात जशा उपलब्ध आहेत, तशाच मानवनिर्मित रोजच्या वापरातील वस्तूंमध्येसुद्धा आहेतच. ही रंगछटांची नावे जरी इंग्रजीमध्ये असली तरी, सर्वच आपल्या परिचयाचीच आहेत. त्यांचा निश्चित अर्थही आपल्याला माहीत आहेच. वाहतूक नियंत्रक खांबावरील लाल आणि हिराव्यासह खांबावर दिसणारा अंबर, कॅनरी या नावाने परिचित सुंदर पिवळा धम्मक पक्षी, सोन्याचा रंग गोल्ड अशा पिवळ्याच्या अनेक परिचित छटा. याबरोबरच बनाना, लेमन, मेझ, ओरिअलीन, नेपल्स, ओल्ड गोल्ड, पेल, बिटर, सॅफराँन, स्ट्राँ... अशा वेगवेगळ्या संदर्भाने येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या अन्य छटा आपल्याला रोजच दर्शन देतात. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी आपणही बहाव्याच्या या सोनेरी-पिवळ्या मोहक झुपक्यांचा आनंद घेऊया...!!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat