खोट्याच्या कपाळी गोटा...
महा एमटीबी   13-Apr-2019ज्या दिवशी हे ६०० कलावंतांचे मोदींना पराभूत करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा मामला सर्वोच्च न्यायालयात निकाली झाला. म्हणजे कलावंतांच्या पत्रकाचा नव्हे! ‘भोबिष्योतर भूत’ चित्रपटाच्या अघोषित बंदीचा मामला सर्वोच्च न्यायालयात आला. त्या निर्माता-दिग्दर्शकांना न्याय मागायला थेट सर्वोच्च न्यायालयात यावे लागले.


हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी-विचारवंत म्हणतो, “ज्यांना सत्य गवसल्याचा भ्रम झालेला असतो, असे लोक मग तेच ‘सत्य’ सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेही बोलू लागतात.” नरेंद्र मोदी यांना साडेपाच वर्षांपूर्वी भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून अशा ‘सत्यवादी’ साक्षात्कारी लोकांची संख्या आपल्या देशात क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे. त्यांचा खोटेपणा वारंवार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे जपून खोटे बोलावे, इतकेही भान त्यांना उरलेले नाही. वास्तविक एक-दोनदा खोटे पकडले गेल्यावर सामान्य गुन्हेगारही सावध होत असतो. पण, सत्य सापडलेले बुद्धिमंत किंवा शहाणे लोक कधीच अनुभवातून शहाणे होत नाहीत. त्यामुळे मागल्या सहा वर्षांत अशा लोकांची संख्या सातत्याने वाढत गेलेली आहे. खरेतर अशा लोकांचा किंवा या आजाराचा उद्भव २००२ सालात प्रथम झाला. गुजरातमध्ये गोध्रा येथे ‘साबरमती एक्सप्रेसया रेल्वेगाडीच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवक रामभक्त प्रवाशांना जीवंत जाळले गेले, त्यातून जी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटली, त्यातून दंगल उसळली होती. त्यात नवे काहीच नव्हते. त्यापूर्वी चार दशके गुजरातमध्ये एकही वर्ष बिनादंगलीचे गेलेले नव्हते. पण, गोध्रानंतरची दंगल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम घडवून आणली व मुस्लिमांची जाणीवपूर्वक कत्तल केली, अशी एक ‘सत्यवादी’ अफवा पसरवण्यात आली. तिथून हा सत्यवादी आजार देशाच्या कानाकोपऱ्यात व तथाकथित बुद्धिजीवी वर्गात पसरत गेला. त्याला अजून आटोक्यात आणणे कोणाला शक्य झालेले नाही. मागल्या लोकसभा मतदान काळात तो देशभर फैलावला आणि नियंत्रणात आला होता. आता पुन्हा तो उफाळून आलेला आहे. आता त्याने आपले बुद्धिवादी रूप त्यागून कलात्मक अवतार धारण केलेला दिसतो; अन्यथा काही शेकडा सह्यजीरावांनी लोकशाही ‘संविधान बचाव’ असले मुखवटे पांघरून पत्रके कशाला काढली असती?

 

मध्यंतरी मराठी भाषेतले एक दिग्गज पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुका होणारच नाहीत. कारण, पंतप्रधान मोदींना पराभवाची भीती असून ते निवडणुका रद्द करून आणीबाणी घोषित करतील, अशी भीती व्यक्त केलेली होती. आता ती निवडणूक सुरू झाली असून, त्यातली पहिली मतदानाची फेरीही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सत्यवादी केतकरांनी निदान आपण खोटे बोललो किंवा भ्रामक अफवा पसरवल्याची दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. पण, तसे काही घडल्याचे कोणाच्या ऐकिवात नाही. यातून आपल्याला अशा ‘सत्यवादी’ मानसिक आजाराची कल्पना येऊ शकते. त्याची लक्षणेही समजू शकतात. केतकर असोत की राहुल गांधींसह विविध क्षेत्रातले बुद्धिमंत कलावंत म्हणून मिरवणारे लोक असोत, त्यांना कायम सत्याच्या भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळे त्यांना सतत कसले तरी भ्रम होत असतात आणि त्यालाच सत्य मानून मग अशा भ्रमांचा डंका पिटला जात असतो. ६०० सह्यजीराव त्याच व्याधीने ग्रस्त झालेले असून त्यांचा भ्रम कोणता आहे, तेही आपण समजून घेतले पाहिजे. भ्रमिष्टाशी आपण कधी युक्तिवाद करू शकत नसतो. कारण, त्याला सत्य दाखवता येत नसते किंवा तोही बिचारा ते सत्य बघू शकत नसतो. सत्य कितीही जाडजूड भिंगातून दाखवले तरी त्याला मनातलेच दिसत असते आणि बघायचे असते. त्याची अवस्था मयसभेतल्या दुर्योधन वा तत्सम लोकांसारखी झालेली असते, त्याला फरशी हौदासारखी दिसते आणि हौद फरशी म्हणून बघायची अजब सिद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळे अशा लोकांना नसलेले दिसते आणि असलेले दिसतही नाही; अन्यथा त्यांना बंगाल या राज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या गुंडपुंडांच्या तृणमूल पक्षाने चालवलेली आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी बघता आली असती. तिच्या विरोधात गळा काढता आला असता. पण, चकार शब्द या सह्यजीरावांनी काढलेला नाही. पण तेच सर्व एकजूट होऊन मोदींनी न लादलेल्या अघोषित गळचेपीच्या विरोधात आक्रोश करत सुटलेले आहेत.

 

अनिक दत्ता नावाच्या एका यशस्वी चित्रपट दिग्दर्शकाचाभोबिष्योतर भूतनावाचा बंगाली चित्रपट दोन महिन्यांपूर्वी बंगालमध्ये प्रदर्शित झाला. १५ फेब्रुवारी रोजी विविध चित्रपटगृहात त्याचे प्रदर्शन सुरू झाले आणि एक-दोन दिवसातच स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील चित्रपटगृह मालकांना स्पष्ट इशारा दिला की तत्काळ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबले पाहिजे. कुठलीही तक्रार करण्यास जागा नव्हती. न्यायालयाचे वा अन्य कुठलेही कायदेशीर आदेश नव्हते. पण स्थानिक पोलीस आणि सत्ताधारी तृणमूल कॉँग्रेसचे गुंड आदेश देत होते आणि त्यांची अवज्ञा करण्याची आज निदान बंगालमध्ये कोणाची बिशाद नाही. साहजिकच सर्व चित्रपटगृहातून दोन-तीन दिवसांतच हा चित्रपट गायब झाला. एक-दोन बातम्या कुठेतरी झळकल्या. पण कुठल्याही राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर त्याची चर्चा झाली नाही वा कुठल्या आविष्कार स्वातंत्र्यवीराला अनिक दत्ताच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याची हिंमत झाली नाही. आणखी एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. त्याच दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये ब्रिगेड परेड ग्राऊंड या भव्य मैदानावर त्याच कालखंडात एक सर्वपक्षीय जाहीर सभा घेतली. त्यात देशभरच्या मोदीविरोधी नेत्यांना आमंत्रित केलेले होते. या सर्वांनी देशात अघोषित आणीबाणी कशी चालू आहे आणि नरेंद्र मोदी हिटलरलाही लाजवणारी हुकूमशाही कशी करीत आहेत, त्याचा पाढा वाचला होता. परंतु, कोणालाही त्याच कोलकात्यात एका चित्रपट व कलाकृतीची कशी बेकायदा गळचेपी झालेली आहे, त्याचा पत्ता नव्हता आणि असेल तर त्याविषयी बोलायची हिंमत झाली नाही. कलावंतांना तर बंगाल, ममता वा कुठला ‘भविष्योतेर भूत’ नावाचा चित्रपटही ठाऊक नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या गळचेपीबद्दल मागले दोन महिने यथास्थित मौन धारण केले. कदाचित त्यापैकी बहुतांश कलावंतांना बंगाल भारतात असल्याचेही ठाऊक नसावे.

 

किती बेशरमपणा आहे बघा. ज्या दिवशी हे ६०० कलावंतांचे मोदींना पराभूत करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा मामला सर्वोच्च न्यायालयात निकाली झाला. म्हणजे कलावंतांच्या पत्रकाचा नव्हे! ‘भोबिष्योतर भूत’ चित्रपटाच्या अघोषित बंदीचा मामला सर्वोच्च न्यायालयात आला. त्या निर्माता-दिग्दर्शकांना न्याय मागायला थेट सर्वोच्च न्यायालयात यावे लागले. कारण, देशातले ममताग्रस्त पुरोगामी कलावंत विचारवंत खून झाला तरी, मौन धारण करतील, याची अनिक दत्ताला खात्री होती. म्हणून त्याने सह्या गोळा करण्यापेक्षा थेट न्यायालयातच धाव घेतली होती. त्याच्या सुनावणीत दोन महिने गेले आणि गुरुवारी ११ एप्रिल रोजी त्याचा न्यायालयाने निकाल दिला. त्यात ‘वाढत्या असहिष्णुतेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यातअसा शेराही मारलेला आहे. पण देशात याचा अर्थ बंगालमध्ये असा आहे आणि तो पुरोगामी ममतांच्या बाबतीतला आहे. पण तरीही कोणा स्वातंत्र्यसेनानी कलावंताने अजून ममतांचा निषेध केलेला नाही वा त्यांच्या पक्षाला मते देऊ नका, असा आवाज उठवलेला नाही. आहे ना चमत्कार? ज्या बाबतीत व ज्या सरकारच्या कारकिर्दीत साक्षात गळचेपीचे पुरावे समोर आले व न्यायालयाने ज्या सरकार व पक्षाला स्वातंत्र्याचा गुन्हेगार मानले, त्याच्याविषयी या सह्यजीरावांनी चकार शब्द उच्चारलेला नाही. पण, ज्या मोदी सरकारच्या विरोधात आजवर कुठला गळचेपीचा पुरावा कोणाला समोर आणता आलेला नाही, त्याच्या विरोधात आक्रोश चाललेला आहे. याला म्हणतात बुद्धिमंत, कलावंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा. मजेची गोष्ट म्हणजे अनिक दत्ता याला न्याय देऊनच सर्वोच्च न्यायालय थांबलेले नाही. त्याने ममता सरकारला या गळचेपीच्या गुन्ह्यासाठी २० लाख रुपये दंडही ठोठावला आहे. पण आपले महान कलावंत व बुद्धिमंत तोंडात गुळणी घेऊन बसले आहेत. ‘मोदी-मोदी’ असे रवंथ करणे मात्र जोरात चालू आहे. मग यांना कलावंत म्हणायचे की गोठ्यातली गुरे म्हणायचे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat