पीएम मोदी चित्रपट स्थगितीविरोधात निर्माते सर्वोच्च न्यायालयात
महा एमटीबी   12-Apr-2019मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

 

निवडणुकीच्या काळात 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदार प्रभावित होऊ शकतात, असे कारण पुढे करत विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्या विरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती.

 

चरित्रपटांमध्ये व्यक्तीच्या कामाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिलेली असते. निवडणुकांच्या काळात अशाप्रकारचे चरित्रपट प्रदर्शित करता येऊ शकत नाहीत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने त्यावेळी दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. न्यायालयानं त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat