आशयगर्भ कलाकृतींचे प्रदर्शन
महा एमटीबी   12-Apr-2019
कुठलीही कलाकृती निर्माण होताना काही पद्धती वा पायर्‍यांचा अवलंब करावा लागतो. ही प्रत्येक पायरी ही त्या कलाकृतीची सौंदर्याभिरुची वाढवित असते. या सर्व पायर्‍या जर चपखलपणे बसवता आल्या किंवा जपता आल्यास ती कलाकृती रसिकमान्य ठरते. मग ती कलाकृतीही एखादे पेन्टिंग असो, एखादे त्रीमित शिल्प असो की साधं रेखांकन असो... सातत्य, नियमितपणा, रंगाकारांचे संकल्पन आणि आकर्षक रचना या वर त्या कलाकृतीबाबतची स्मृतिप्रवणता अवलंबून असते.

 

थोडक्यात, कलाकृती किती आशयगर्भ आणि सौंदर्याभिरूचिपूर्ण आहे, हे ती किती कलारसिकांच्या स्मरणात राहते, यावरून स्पष्ट होते. प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीत आणि सह्याद्रीच्या राकट पर्वतरांगांसह गिरीराज ब्रह्मगिरीच्या उदरात जन्मलेल्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या नाशिकनगरीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकार प्रा. दीनकर जानमाळी यांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात नुकतेच संपन्न झाले. भारतीय अलंकारिक शैलीमधील भारतीय, पौराणिक-ऐतिहासिक आणि धार्मिक विषयांवरील अलंकारिक रेखाचित्रे रेखाटताना पूर्ण ऊर्जेने, पूर्ण सरावाने आणि सातत्य ठेवून केलेले काम पाहताना कलारसिक दिग्मूढ होतो.

 

खरं म्हणजे, शरीरशास्त्रात हाडांचं जे कार्य असतं, तेच कार्य कलाकृतीत रेखांकनांचं असतं. म्हणूनच ‘जानमाळीं’च्या प्रत्येक अलंकरणात ‘जान’ आहे. अत्यंत लयकारी रेषांचं सौंदर्य साजसंध्या, वटसावित्री पौर्णिमा, बांगड्या भरणारा अशा एक-दोन नव्हे, तर शेकडो विषयांवरील अलंकरणे पाहिल्यावर भारतीय संस्कृतीचा अभिमान तर वाटतोच; परंतु, आपण भारतीय असल्याबद्दलचा गर्वदेखील होतो. त्यांच्या कलाकृतींचे नुकत्याच मुंबापुरीत जहांगिर कलादालनात संपन्न झाले. 

 

याचदरम्यान सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तरुण मेटलक्राफ्ट आर्टिस्ट अभिजित यांनी ‘बिंदू’ हा विषय घेऊन कॉपर या धातूपासून बिंदूचे महत्त्व विशद केले. वर्तुळ, ज्याला कडा, बाजू, दिशा वगैरे काहीही नसते, त्याला आपण ‘गोल’ या नावाने संबोधतो. अभिजित यांना त्यांच्या बालपणापासून या वर्तुळाचं आकर्षण होतं. सूक्ष्म अणू-रेणुपासून तर महाकाय गुरु ग्रहापर्यंत सारं ब्रह्मांडच गोलाकार आहे. मग हा गोल किती महान आहे. ज्या भारताने शुन्याचा शोध लावून जगाच्या गणिताची घडी बसवली, तो शून्यदेखील गोलाकारच आहे. अभिजितने तांब्यापासून ज्या गोलाकार कलाकृती निर्माण केल्या, त्या आशयगर्भ आहेत. ते प्रदर्शनही स्मृतिप्रवण ठरणारे असेच होते. अभिजितच्या रूपाने एक साधा-मितभाषी कुठल्याही प्रकारचा अतिगंड नसलेल्या धातुकाम आर्टिस्टची ओळख कलाक्षेत्राला या प्रदर्शनामुळे झाली आहे. अभिजितला तर शुभेच्छांसह त्याला त्याचा कलाविषयक भविष्यकाळ उत्साही राहो अशा सदिच्छा...!!

 

या सप्ताहात वि. वा. महाविद्यालयात कलाध्यापक असलेल्या प्रा. सीमा प्रदीप कांबळे यांच्या चित्रांचे ‘आनंद रोड’ या शीर्षकाखाली प्रदर्शन सुरू होत आहे. लहानपणापासून वडिलांच्या नोकरीमुळे गावोगावी फिरावे लागायचे. मग बिर्‍हाड टेम्पो-ट्रक वगैरे वाहनातून हलवावे लागायचे. लहान असताना इकडून तिकडे जाताना मजा वाटायची, पण वडीलधार्‍यांना किती त्रास व्हायचा? याचं भान त्या काळात नव्हतं. पण, त्यावेळी असणारे जे रंगीबेरंगी ट्रक्स, त्यावरील भडक रंगांतील सजावट वगैरे... हाच विषय चित्रकर्ती सीमाने सीमित करून कलाकृती साकारल्या आहेत. या सप्ताहात हे प्रदर्शन पाहता येईल.

 

 - गजानन शेपाळ 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat