‘पद्मश्री’च्या निमित्ताने
महा एमटीबी   12-Apr-2019
 
 

आ. गोदावरी दत्त आणि बुलू इमाम यांना ‘पद्मश्री’ जाहीर झालं, तेव्हा या दोघांच्या कामांची चाहती म्हणून यांच्या कलेची ओळख मराठी मनाला करून द्यावी, असं तीव्रतेने वाटलं ­­­म्हणून हा लेखन प्रपंच.


‘लोककला’ म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात मी मधुबनी चित्रशैलीतील चित्र पाहिल्याचं आठवतं. १९७०च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या ‘धर्मयुग’ साप्ताहिकात मधुबनी शैलीतील चित्र व लेख आल्याचं आठवतं. घरात वडिलांना चित्रकलेची आवड व ते चांगली चित्रं काढत असल्याने दिनानाथ दलाल व रघुवीर मुळगावकर यांनी मासिकांच्या मुखपृष्ठांवर काढलेल्या चित्रांचा बराच मोठा संग्रह घरी होता. बाकी ही आजूबाजूला मी जी चित्रं पाहत होते त्यापेक्षा हे मधुबनी शैलीतील चित्र खूप वेगळं तरीही छान आणि परिणामकारक असलेलं मला आजही स्वच्छ आठवते.

 

हे सारं आठविण्याचं कारण म्हणजे, मधुबनी शैलीतील एक तपस्वी कलाकार गोदावरी दत्त यांना वयाच्या जवळ जवळ नव्वदीत ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला . खरंतर या चित्रकलेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्या ‘पद्मश्री’सारख्या सन्मानाच्या कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत. एका सच्चा कलाकारासारख्या त्या त्यातही आनंदी व समाधानी आहेत. गोदावरी दत्त यांचा जन्म १९३० मधे दरभंगा जिल्ह्यातील बहादुरपुर गावी झाला. त्यांची आई सुभद्राकुमारी या स्वत: मधुबनीच्या चित्रकार होत्या. त्यांची आईच त्यांची कलागुरू होती. आईच्या अर्ध्या तयार चित्रांवर त्यांनी काम केले तरी, आई न रागवता त्यांना प्रोत्साहन देई, म्हणूनच आपण चित्रं काढू लागलो व आईच्या आशीर्वादाने व प्रोत्साहनानेच आपण इथवर पोहोचलो अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.

 

त्यावेळेस बिहारमध्ये मुलींच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात नव्हते. परंतु, त्यांच्या आईची इच्छा असल्याने त्यांनी व त्यांच्या बहिणीने थोडेफार शिक्षण घेतले. लग्नानंतर त्या मॅट्रिक झाल्या. त्यांचे लग्न रांटी येथील उपेंद्र दत्त यांच्याशी झाले. सासरी आल्यावर ही त्यांची चित्रकला सुरूच होती. ही चित्रे मुख्यत: विवाहप्रसंगी काढली जात, तसेच ‘कोहबर’ची (लग्नानंतर वर-वधू राहतात ती खोली) विशिष्ट चित्रे त्या काढत. तेव्हा मधुबनी प्रामुख्याने भिंतीवर काढली जात असली तरी, काही चित्रे कागदावरही काढल्या जात. हळूहळू गोदावरी छान चित्रं काढतात, हे साऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं. हा १९६४-६५ चा काळ असावा. तेव्हा भास्कर कुळकर्णी व उपेंद्र महारथी हे दोघे तज्ज्ञ लोकचित्रकारांच्या शोधात त्यांच्या गावी आले. त्यांनी गोदावरीशी संपर्क केला. परंतु, तेव्हाच्या पडदा प्रथेमुळे त्या परपुरूषाशी बोलू शकत नव्हत्या. त्यांनी आपलं व आपल्या आईचं काही काम दाखवले, जे त्यांना आवडलं त्यांनी यालाच मोठ्या आकारात करायला सांगितले. परंतु, त्याला गोदावरींनी नकार दिला. कारण, पैसे घेऊन चित्र काढणे तेव्हा चांगले मानले जात नसे. लग्न झाल्यावर त्यांच्या पतीने बनारस हिंदू विद्यापीठातून एम.ए. केले व ते नेपाळला नोकरी करू लागले. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे गोदावरींचे त्यांच्या बरोबर जाणे योग्य मानले जात नव्हते. पती वर्ष-दोन वर्षांनी एकदा येत. त्यांना एक मुलगाही झाला. मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर पतींचे म्हणणे पडले की, गोदावरी पुढे शिकल्या तर त्यांना बरोबर नेता येईल. सासरी संयुक्त कुटुंब होते. सगळ्यांनुमते त्यांनी माहेरी राहून शिक्षण घेणं योग्य होईल, असे ठरले. गोदावरी माहेरी राहिल्या. शिक्षण सुरू करून मॅट्रिक झाल्या. मात्र, सासरी आल्यावर त्यांना कळले की, नेपाळला पतींनी दुसरे लग्न केले. हा त्यांच्यावर मोठाच आघात होता. कारण, अशा स्त्रीची समाजाकडून उपेक्षाच होत असे. मात्र, योगायोगाने त्याच वेळेस तेव्हाचे रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा हे मिथिला (मधुबनी)चित्र कलेला पुढे आणण्यासाठी व तिला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी पुपुल जयकरांच्या सहाय्याने मुंबईत पहिल्यांदा या चित्रकलेचे प्रदर्शन भरवले. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे मधुबनी गावात हस्तकलेचे सेंटर उघडल्या गेले. तिथे गोदावरींना बोलाविण्यात आले.

 

या कलेच्या प्रसिद्ध कलाकार सीतादेवी आणि जगदंबा देवींतर्फे गावागावांत या कलेचा प्रचार करणे सुरू झाले. दुसऱ्या वर्षी जगदंबा देवींना ‘पद्मश्री’ मिळाले. हे पाहून गोदावरींना उत्साह आला. त्याही आपल्या आयुष्यातल्या रिकामपणाला दूर करू इच्छित होत्या. तसे त्या घराबाहेर निघून काम करण्याचे श्रेय त्या ओडिशाचे तेव्हाचे असिस्टंट डायरेक्टर एच. पी. मिश्रांना देतात. त्या चित्रे काढून त्यांना देत व ते ती विकून पैसे आणून देत. घरचे ही साथ देत होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९७० ते ७७ त्यांना बिहार सरकारची सात बक्षिसं मिळाली. त्या ऑर्डरवर काम करीत. जपानचे हासेगावा म्युझियमचे डायरेक्टर होते, त्यांनी गोदावरींची काही चित्रं जपानमध्ये प्रदर्शित केली. पण ही हातांनी काढली आहेत यावर लोकांचा विश्वास बसेना. म्हणून ते गोदावरींना डेमो द्यावा म्हणून घेऊन गेले. गोदावरींनी अर्धनारी नटेश्वराचे चित्र काढले. हासेगावांनी त्यातले त्रिशूळ व डमरू वेगळे व बऱ्याच मोठ्या आकारात काढून मागितले. गोदावरींनी ही मागणी पूर्ण केली. तेव्हा त्या सात वेळा जपानला गेल्या. त्या सहा महिने भारतात व सहा महिने जपानला राहत. आज ही चित्रे जपानच्या मिथिला म्युझियमची ओळख आहेत. यातला डमरू आठ फूट लांब व सात फूट रूंद आहे. याशिवाय गोदावरी फ्रान्स, जर्मनी वगैरे देशातही गेल्या.

 

भारतात मात्र त्यांची कुठलीच चित्रं कोणत्याही म्युझियमध्ये नव्हती, खूप प्रयत्नांनंतर त्यांचे बारा बाय अठरा फुटांचे ‘कोहबर’ हे चित्र बिहार म्युझियममध्ये ठेवल्या गेले. सरळ रेषा, सौम्य रंग अशी त्यांच्या शैलीची विशेषता आहे. त्यांनी आपल्या नातींना तर तयार केलेच आहे, शिवाय बऱ्याच लोकांना त्यांनी ही कला शिकवली आहे. बिहार सरकार या कलेच्या विकासासाठी बरेच प्रयत्न करीत असले तरी, गोदावरी दत्तांच्या ‘पद्मश्री’ने या प्रयत्नांना अजून चालना मिळेल. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड येथे २०११ चा ‘गांधी शांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ मिळविणारे बुलू इमाम यांना ही २०१९ चा ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. ३१ ऑगस्ट, १९४२ ला जन्मलेल्या बुलू इमामांची खूप व्यापक ओळख आहे. कोलकाता हायकोर्टचे वरिष्ठ न्यायाधीश व बॅरिस्टर,१९१८ला राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले सैय्यद हसन इमाम यांचे बुलू हे नातू. याशिवाय ते पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ता आहेत, झारखंडचा अश्मयुगीन इतिहास शोधून तो जपणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ आहेत, झारखंडची विलयाला जाणाऱ्या खोवर व सोहराइ चित्रकलेचा प्रसार करणारे, ती चित्रकला भिंतीवरून कागदावर आणणारे कलाकार ही आहेत. याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत.

 

बुलू इमामांची कहाणी ही विलक्षण आहे. १९६० आणि १९७० च्या दशकात नरभक्षक वाघांना मारणारे बुलू १९७९ मध्ये ब्रिटिश लेखक व प्रवासी असलेल्या मार्क षंड यांच्याबरोबर हत्तीवरून प्रवास करत असताना, त्यांना ते दक्षिण बिहारचं दाट जंगल कोळशाच्या खाणीसाठी नष्ट होताना दिसलं. यामुळे केवळ तिथल्या पर्यावरणाचाच नाश होत नव्हता, तर तिथे राहणारे अनेक आदिवासी समूह विस्थापित होणार होते, त्यांची हजारो वर्षांची संस्कृती नष्ट होणार होती. त्यांना जंगलामधून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तर नष्ट होणार होत्याच, त्याशिवाय आदिवासी ज्यांची पूजा करत ते megaliths (महापाषाण किंवा स्मारकशिला) ज्यातील काही तर इ.स.पू २००० च्या पूर्वीचे होते, ते ही नष्ट होण्याची भीती होती. त्याच क्षणी बुलूंनी शिकार सोडून तिथली संस्कृती वाचविण्याचा व्रण केला. पूर्वी शिकारीनिमित्त बुलूंचं तिथल्या म्हणजे आताच्या झारखंडचा भाग असलेल्या अनेक गावांमधे जाणे-येणे होते. त्यांच्या पत्नीशी आदिवासी समाजातील आहेत. त्यांनी नार्थ करणपुरा व्हॅली इथल्या ओपन कास्ट माइन (विवृत खाण) विरोधात संघर्ष सुरू केला. त्याच वेळेस हत्ती व वाघांसाठी जंगलात कोरिडोर असणे केवढे गरजेचे आहे याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या संस्कृती रक्षणाच्या या प्रयत्नांमुळे १९८७ला त्यांना National trust for Art and Culture या N.G.O.चे क्षेत्रीय संयोजक नेमण्यात आले. १९९१ मध्ये बुलूंना तिथल्या इस्को पर्वतांमधे पहिलं शैलचित्र आढळलं. त्यानंतर त्यांनी जवळ जवळ ५००० वर्षांपूर्वीची अनेक शैल किंवा पाषाणचित्र नॉर्थ करणपुरा व्हॅलीत शोधली. त्यानंतर त्यांनी पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुगाततील स्थाने शोधली. काही बौध्द पुरातात्त्विक स्थानेही शोधली.

 

झारखंडमध्ये स्त्रिया वर्षातून दोन वेळा पूर्ण घर सारवतात. एकदा पावसाळा संपला की सोहराई पर्वाच्या वेळेस व दुसऱ्यांदा जानेवारीनंतर लग्नासारख्या मंगल प्रसंगासाठी. दोन्ही वेळेस वेगवेगळी भित्तीचित्रे काढली जातात. सोहराईच्या वेळेस काढली जाणारी चित्रे ‘सोहारी कला’ व विवाहप्रसंगी काढली जाणारी चित्रे ‘खोवर’ म्हणवली जातात. ही चित्रे स्थानिक लाल, काळी, पिवळी व पांढरा माती वापरून काढली जातात. यात जंगलातील फुले, पाने, वनस्पती, प्राणी यांचे चित्रण असते. बुलू इमामांना प्रागैतिहासिक शैलचित्रे व ही ‘सोहराई’ व ‘खोवर’ चित्रे याच्यात एक संबंध दिसून आला. १९९३ मध्ये त्यांनी आदिवासी स्त्रियांची सहकारी समिती स्थापन केली व या कलेचा प्रसार सुरू केला. त्यांनी ही चित्रे कॅनव्हासवर काढून घेतली व या चित्रांची प्रदर्शने जगभर भरवू लागले. ते आपल्याबरोबर कलाकारांनाही घेऊन जात व प्रेक्षकांशी ‘सोहराई’ कलेचं प्रात्यक्षिक दाखवित. हे करीत असतानाच ते अश्मयुगीन दगडांची हत्यारे, बौध्दकालीन मूर्ती इत्यादी कोळी करीत होते. या सगळ्यांचा संग्रह त्यांनी हजारीबाग येथे संस्कृती संग्रहालयात सुंदर रीतीने केला आहे. संस्कृती हे बुलूंचे सांस्कृतीक संचित आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 

बुलूंनी झारखंडवर ‘Antiquarian Remains Of Jharkhand हे पुस्तकदेखील लिहिले आहे. येणाऱ्या काळात संस्कृती संग्रहालय शोधार्थींसाठी, अभ्यासकांसाठी, कलाकार, पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक या साऱ्यासाठी व सामान्य जनांसाठीदेखील एक आदर्श संस्था व्हावे म्हणून बुलू प्रयत्नशील आहेत. तर अशा या दोन ‘पद्मश्री’प्राप्त व्यक्ती, त्यांचे ‘पद्मश्री’ त्यांच्यासाठी नाहीच, ते तुमच्या आमच्यासाठी आहे. खरंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात दोघांनीही अपार कष्ट केले आहेत. घरदार सोडून महिनोंमहिने जपानसारख्या देशात राहणे गोदावरींना नक्कीच सोपे गेले नसेल. पण कलेच्या प्रसारासाठी त्यांनी ते आनंदाने केले. बुलू इमामांना मी एका मुलाखतीत त्यांनी जमविलेल्या नमुन्यांची काचेची कपाटं स्वत: पुसताना पाहिले. आपल्या आवडत्या क्षेत्रावर दोघांचंही मनापासून प्रेम आहे.

 

भारत एक विविधतेने नटलेला देश आहे, ही विविधता भाषेपासून तर लोककलांपर्यंत दिसून येते. इथल्या लोककला निसर्गाशी एकरूप झालेल्या आहेत. मग ती वारली, मांडना, गोंड, कच्छची लिप्पन कला किंवा उत्तर कर्नाटकच्या शिमोग्याची हासे चित्तर असू दे, रंग काढायचा पृष्ठभाग, रंग, कुंचले सारं काही निसर्गातूनच घ्यायचं आणि त्यालाच अर्पण करायचं. वेगवेगळी फुले-पाने, माती , दगड रंग देतात. बांबू, विविध प्राण्यांचे केस, पिसं कुंचले बनविण्याच्या कामी येतात. चित्र काढायला भिंत असतेच पण कागदावर काढायला हातकागद किंवा लाकडाच्या फळ्यांना माती, शेण लावून पृष्ठभाग तयार करता येतो. मात्र आता लोककलेचा प्राण हरवत चालला आहे.

 

जागोजागी उगवणाऱ्या आर्ट क्लासेसमध्ये भरमसाठ फी घेऊन कृत्रिम रंग, कृत्रिम सामान वापरले जाते आणि प्रदूषणात अजून भर टाकली जाते. मी १०-१५ वर्षांपूर्वी मुंबईत वारली पेंटिंग शिकले. त्याची बॉर्डर प्लास्टिक पेंटची करायला सांगितले. तेव्हापासून या सगळ्यांकडे लक्ष जाऊ लागले आणि पर्यावरणाबद्दल, सौंदर्य दृष्टीबद्दल समाजाला जागृत करणे किती गरजेचे आहे याची जाणीव झाली. खरंतर या चित्रांमधे खोल अर्थ दडलेला असतो. जसं ‘खोवर’ चित्र हे विवाहाच्या वेळेस काढल्या जाते, त्यामुळे हा ‘कोहबर’चा अपभ्रंश असावा असे वाटेल पण तसे नाही , खोवर’ चित्रांमध्ये पूर्ण घर आधी काळ्या मातीने सारवतात, मग पांढऱ्या मातीने सारवून छोट्या कंगव्याने चित्र कोरतात. ‘खोह’ म्हणजे ‘गुहा’ व ‘वर’ म्हणजे वधूवरांमधला वर. ही पूर्ण चित्र विधी जननशास्त्रावर आधारली आहे. या चित्रांमधले प्राणी-पक्षी चितारण्याचा अर्थ आदिवासी त्यांना आपल्यापेक्षा वेगळे समजत नाहीत अशा रितीने या लोककलांकडे पाहण्याची योग्य दृष्टी विकसित करणे हे खरं आपल्यासाठी आव्हान आहे. आ. गोदावरी दत्त आणि बुलू इमाम यांना ‘पद्मश्री’ जाहीर झालं, तेव्हा या दोघांच्या कामांची चाहती म्हणून यांच्या कलेची ओळख मराठी मनाला करून द्यावी, असं तीव्रतेने वाटलं ­­­म्हणून हा लेखन प्रपंच.

- अजीता खडके


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat