FACT CHECK : राहुल गांधींच्या चेहेऱ्यावरील 'तो' प्रकाश मोबाईलचाच
महा एमटीबी   11-Apr-2019नवी दिल्ली : राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरव्या रंगाची लेझर लाईट ही स्नायपर हल्ल्याची असल्याचा दावा कॉंग्रेसने केला होता. मात्र, हा प्रकाश कॉंग्रेसच्या एका छायाचित्रकाराच्या मोबाईलचा प्रकाश असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतिही चुक झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राहुल गांधी अमेठी येथे प्रचारादरम्यान गेले असताना एका छायाचित्रात त्यांच्यावर हिरवा प्रकाशझोत पडल्याचे दिसत होते. कॉंग्रेसने याबद्दल गृहमंत्रालयाला पत्र लिहत राहुल यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकारामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली होती. राहुल गांधींवर स्नायपर हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

 

काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. 'भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला. १९९१ साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.' असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर किमान सातवेळा ग्रीन लेझर लाईट मारण्यात आल्याचं पत्रात म्हटले आहे. याबद्दलचा व्हिडिओही कॉंग्रेसकडून सादर करण्यात आला होता.

 

गृह मंत्रालयाने एसपीजीच्या डायरेक्टर यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार तपासात उघड झालेल्या माहितीच्या आधारावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या घटनेच्या व्हिडीओ क्लिपचे निरीक्षण केल्यानंतर ती हिरवी लाईट काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलची आहे. तसेच कमेरामनच्या पोझिशनबाबत राहुल गांधी यांच्या खासगी स्टाफला कळवण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी नसल्याचं एसपीजीच्या डायेरक्टर यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat