लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे आज मतदान
महा एमटीबी   10-Apr-2019


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या गुरुवारी (दि. ११ एप्रिल) देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या ७ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

 

लोकसभेबरोबरच गुरुवारी आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान होणार आहे. तेलंगण राज्यातील लोकसभेच्या सर्व १७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंडमधील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मेघालय, अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी २ आणि मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अंदमान-निकोबार येथील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होत आहे.

 

राज्यात ७ लोकसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानामुळे या मतदारसंघातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, भावना गवळी आदी उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat