होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१३
महा एमटीबी   01-Apr-2019काही लोक थंडीमध्येसुद्धा पंखा पूर्ण वेगावर ठेवतात व वातानुकूलित यंत्रसुद्धा वापरतात. कारण, त्यांना अजिबात थंडी लागत नाही. या उलट काही लोक भर उन्हाळ्यातही जाडे पांघरूण, गोधडी किंवा ब्लँकेट घेऊन झोपतात व त्यांना पंखासुद्धा सहन होत नाही.


होमियोपॅथीक तपासणी करताना विविध शारीरिक संस्थांच्या लक्षणांबद्दल माहिती घेऊन शरीरातील इतर सर्वसाधारण लक्षणांचीसुद्धा माहिती करून घेतली जाते. रुग्णाची उष्ण किंवा शीत प्रकृती किंवा समशीतोष्ण प्रकृती याची माहिती फार उपयुक्त असते. होमियोपॅथीमध्ये औषधांची निवड करत असताना या प्रकृतीला फार महत्त्व दिले जाते. वातावरणातील उष्ण वा थंड हवेचा शरीरावर होणारा परिणाम हा प्रत्येक माणसाकरिता वेगवेगळा असू शकतो. काही लोक थंडीमध्येसुद्धा पंखा पूर्ण वेगावर ठेवतात व वातानुकूलित यंत्रसुद्धा वापरतात. कारण, त्यांना अजिबात थंडी लागत नाही. या उलट काही लोक भर उन्हाळ्यातही जाडे पांघरूण, गोधडी किंवा ब्लँकेट घेऊन झोपतात व त्यांना पंखासुद्धा सहन होत नाही. शरीराची ही प्रतिक्रिया कोणत्याही रोगामुळे किंवा आजारामुळे नसते, तर ही प्रतिक्रिया व्यक्तिशः त्या माणसाची असते. माणसाच्या चैतन्यशक्तीने दिलेली ती प्रतिक्रिया असते आणि होमियोपॅथीमध्ये या व अशा व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रियेला फार महत्त्व असते. (Individualizing Symptoms) त्याचबरोबरीने शारीरिक संवेदनशीलतेचा (susceptibility) अभ्यास केला जातो. यात थंड हवा किंवा वारा, पावसात भिजणे, उन्हाळा, याचबरोबर वेदना, आवाज, गंध, रंग इत्यादींपासून जर रुग्णाला संवेदनशीलता जाणवत असेल, तर तेदेखील पाहिले जाते.

 

त्याबरोबरीने ठराविक वेळेला होणारे आजार जसे की, फक्त रात्रीच एखाद्या रुग्णाला दम लागतो किंवा एखाद्याला सकाळी झोपेतून उठल्या उठल्या डोकेदुखी सुरू होते इ. अशा रुग्णांसाठी त्या त्या वेळेची लक्षणे लिहून ठेवली जातात. कारण, होमियोपॅथीमध्ये अशा ठराविक वेळेवर होणार्‍या त्रासांसाठीही विशेष औषधे आहेत. यांच्याशिवाय येणार्‍या लक्षणांची वारंवारिता (periodicity) म्हणजेच काही ठराविक कलावधी नंतर परत परत येणारी लक्षणे (periodicity symptoms) हे औषधाच्या निवडीसाठी महत्त्वाची असतात. त्याचप्रमाणे चंद्रकलांच्या माणसाच्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम पाहिला जातो. साधारणपणे असे दिसून येते की, काही आजार हे या चंद्रकलेप्रमाणे वाढतात वा कमी होतात. काही लोकांना पौर्णिमा वा अमावास्येला त्रास जास्त होतो. उदा. अस्थम्याचा त्रास या काळात वाढू शकतो. तसेच काही मानसिक विकारही या काळात वाढू शकतात. यांच्या अभ्यासाला 'study of moon phases' असे म्हणतात. ही लक्षणे समजून घेत असतानाच रुग्णाला कुठल्याही ठराविक गोष्टींमुळे त्रास होतो का? किंवा काही गोष्टींमुळे त्याला आराम वाटतो का? हेदेखील पाहिले जाते. जसे दुपारच्या उन्हात गेल्याने काही लोकांना अर्धशिशीचा त्रास होतो, तसेच काही पदार्थ खाण्यात आले तरी त्रास होतो इत्यादी. या सर्व लक्षणांबरोबर रुग्णाची शारीरिक सवय व लक्षणे दाखवण्याची सर्वसाधारण प्रकृती तपासली जाते. जसे काही रुग्णांची जखम लवकर भरून येत नाही. काहींना लगेच जखमेमध्ये पू होतो व गळू होते. काहींना शरीरात गाठी येतात, तर काहींना वातावरण बदलल्यास ताबडतोब सर्दी खोकला होतो. काहींना चामखीळ होण्याची प्रवृती असते. या प्रवृत्तीलाच 'रोग प्रवृत्ती' किंवा 'Disease tendency' असे म्हणतात. पुढील भागात होमियोपॅथीक तपासणीच्या गाभ्याबद्दल आपण माहिती पाहूया.(क्रमश:)

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat