लहान मुलांमधील हृदयविकार आणि निदान
महा एमटीबी   01-Apr-2019१०० पैकी एका मुलाला हृदयविकार असतो. मात्र, प्रौढांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांहून हे आजार वेगळे असतात. बाळ आईच्या पोटात असताना त्याचे हृदय सामान्य पद्धतीने विकसित न झाल्यामुळे हे विकार उद्भवतात. मुलांमधील हृदयविकाराचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे. हृदयातील निदान न झालेला दोष वाढू शकतो आणि काही महिन्यात किंवा वर्षात त्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. दोष कोणत्या प्रकारचा आहे यावर हे अवलंबून असते. त्याचप्रमाणे हा दोष सुधारला गेला नाही, तर मुलाची वाढ अनेक मार्गांनी खुंटते.


हृदयातील दोष सर्वात लवकर लक्षात येतो तो त्याच्या जन्मापूर्वी. आदर्श परिस्थितीमध्ये गरोदरपणाच्या १८-२२ आठवड्यात, केलेल्या अल्ट्रासाऊंडमधून. याला ‘फेटल इको’ असे म्हणतात आणि गरोदर स्त्रीची अल्ट्रासाऊंड केली जाते, त्याच पद्धतीने ही अल्ट्रासाऊंडही केली जाते. फरक फक्त एवढाच की, पिडिअ‍ॅट्रिक कार्डिओलॉजिस्ट अल्ट्रासाऊंडमध्ये दिसणारे हृदय व त्याच्या धमन्या मोठ्या करून त्यांचे निरीक्षण करतात. मुलाच्या हृदयात दोष असल्याचे निदान लवकर झाले की, त्यापाठोपाठ त्यावर त्वरित उपचारही झाले पाहिजेत. हे उपचार म्हणजे कदाचित शस्त्रक्रिया असेल किंवा कॅथेटरायझेशन ही लॅबोरेटरीतील प्रक्रिया असेल किंवा औषधे आणि सतत फॉलो-अप घेत राहणे असेल. कोणता उपाय आवश्यक आहे याचा सर्वात चांगला निर्णय लहान मुलांच्या हृदयविकारांमधील तज्ज्ञ डॉक्टरांची डेडिकेटेड टीम करू शकते.

 

लहान मुलांमधील हृदयविकाराबद्दलचे काही गैरसमज

 

‘हृदयातील सर्व छिद्रे मुले मोठी होतील तशी भरत जातात’

या गैरसमजामुळे कित्येक मुले शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या परिस्थितीत राहिलेली नाही आहेत. मुलाचे आईवडील हृदयाचे छिद्र बुजण्याची वाट बघत राहतात, पण प्रत्यक्षात तसेच घडत नाही. अशी वाट बघत वेळ घालवल्यामुळे मुलाच्या फुप्फुसांजवळील रक्तवाहिन्यांची कधीही भरून न येणारी हानी होते. त्यामुळे जे मूल शस्त्रक्रियेनंतर निरोगी आयुष्य जगू शकत होते, त्याला अकाली मृत्यू येऊ शकतो. हृदयातील काही विशिष्ट प्रकारची छिद्रे आपोआप भरली जातात. हृदयातील कोणते छिद्र आपोआप बुजते हे पिडिअ‍ॅट्रिक कार्डिओलॉजिस्टनाच चांगल्या पद्धतीने समजू शकते.

 

‘शस्त्रक्रियेपूर्वी बाळाचे वजन १० किलो व्हायला हवे, त्यासाठी आम्हाला वाट बघितलीच पाहिजे’

 

हृदयात मोठी छिद्रे असलेल्या मुलांवर त्यासाठी शस्त्रक्रिया झाल्याशिवाय त्यांचे वजन वाढणारच नाही. हृदयात मोठे छिद्र असलेल्या एका पाच महिन्यांच्या बाळाचे वजन चार किलो असेल, तर ते कदाचित कधीही १० किलो वजन गाठू शकणार नाही. १० किलो वजन हा गैरसमज आहे. कारण, मुलाच्या वजनाने पिडिअ‍ॅट्रिक हार्टसर्जनला काहीही फरक पडत नाही. गरज भासल्यास दोन किलो वजनाच्या बाळावरही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

 

‘छिद्र औषधांनी बुजू शकते’

 

हृदयातील कोणतेही छिद्र औषधांनी बुजू शकत नाही.

 

“माझ्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे. त्यामुळे ती रडू नये याची काळजी मी घेतली पाहिजे, नाहीतर, तिला वेदना होतील.”

 

मुलांच्या हृदयातील छिद्रामुळे किंवा मुलांमधील बहुतेक हृदयविकारांमुळे कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत.

 

“माझ्या मुलाच्या हृदयात छिद्र आहे. यासाठी कार्डिओलॉजिस्टने शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, मला तो मान्य नाही. कारण, माझा मुलगा एकदम तंदुरुस्त आहे आणि तो अगदी निरोगी दिसतो.”

 

हृदयातील छिद्रामुळे हृदयाला अधिक काम करावे लागते आणि त्यामुळे ते आकारमानाने मोठे होते. या बदलांची सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये काहीच लक्षणे जाणवत नाही. पण, इकोकार्डिओग्रामवर हे सर्व सहज दिसून येते. या बदलांचा अर्थ असा की, शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे. मग ती आता करा किंवा मग करा. काहीवेळा छिद्रे छोटी असतात, तरीही ती बुजवणे गरजेचे असतात. कारण, त्यामुळे जवळच्या झडपांना त्रास होऊ शकतो आणि त्यांची कधीही भरून न येण्याजोगी हानी होऊ शकते.

 

“माझ्या नातीच्या हृदयात दोष आहे. कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, शस्त्रक्रियेनंतर ती पूर्ण बरी होईल. पण मला वाटते की, आता आयुष्यभर ती ‘हार्ट पेशंट’ म्हणूनच जगेल. ती धावू शकणार नाही, खेळू शकणार नाही आणि लहान मुले करतात त्या साध्या गोष्टी करू शकणार नाही.”

 

हृदयविकारांचे सामान्यपणे आढळणारे अनेक प्रकार वेळेवर दुरुस्त झाल्यास शस्त्रक्रियेनंतर आयुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत. ठराविक काळानंतर तपासून घेणे आवश्यक असले तरी, एकंदरीत या मुलांचे आयुष्य अन्य मुलांप्रमाणेच सामान्य राहते. लहान मुलांमधील हृदयविकार आणि प्रौढांमध्ये करावी लागणारी ‘हार्टअटॅक सर्जरी’ या दोहोंमध्ये अजिबात साम्य नाही.

 

माझ्या बाळाच्या हृदयात छिद्र असल्याने नुकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. तिच्या आहारात लोणी किंवा तेल किंवा पनीर येणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल.”

 

कोणत्याही सामान्य मुलाप्रमाणेच हृदयदोषासाठी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. त्यांच्या मेंदू व शरीराच्या वाढीसाठी हे पदार्थ गरजेचे आहेत.

 

“मी गरोदरपणात काहीतरी चूक केली असेल. म्हणूनच माझ्या बाळाच्या हृदयात दोष निर्माण झाला आहे.”

 

गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात हृदय तयार होते. हृदयात दोष का निर्माण होतात, यावर बरेच संशोधन झाले आहे (आणि सुरूही आहे). मात्र, यातील फार थोड्या बाबी गरोदर स्त्रीच्या हातात असतात. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यानंतर ती जे काही करते, त्याचा बाळाच्या हृदयावर नक्कीच परिणाम होत नाही. कारण, त्याच्या हृदयाची रचना पूर्वीच झालेली असते. साडेचौथ्या ते पाचव्या महिन्यात फेटल इकोकार्डिओग्राम करून घेणे उत्तम! कारण, यात मोठे हृदयदोष दिसून येतात.

 

- डॉ. स्वाती गारेकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat