शरीरसौष्ठव आणि सौंदर्याचा अथांग ‘सागर’
महा एमटीबी   09-Mar-2019

 

 
 
 
देशभरातून ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेसाठी ३० हजार तरुणांना मागे सारत, मुंबईतील सागर आमले हा मराठमोळा तरुण ‘रुबरू मिस्टर इंडिया’ स्पर्धेचा अंतिम फेरीतील स्पर्धक ठरला. त्यानिमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी सागरने केलेली ही मनमोकळी बातचित.
 

शरीरसौष्ठव स्पर्धा’ ते ‘रुबरू मिस्टर इंडिया’च्या अंतिम फेरीतील स्पर्धक... या प्रवासाविषयी काय सांगाल?

 

खरं सांगायचं तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी इथपर्यंत पोहोचू शकेन. मी आधी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो. पुरुषांसाठी असणाऱ्या सौंदर्य स्पर्धांचेदेखील मला बऱ्यापैकी ज्ञान होते. मग एके दिवशी विचार केला की, शरीरसौष्ठव स्पर्धा तर माझ्यासाठी आता चांगल्या परिचयाच्या झाल्या आहेत, माझा फिटनेसही चांगला आहे, तर आपण ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होऊयात. पण, शरीरसौष्ठव स्पर्धा आणि सौंदर्य स्पर्धा यांच्यात फार मोठा फरक आहे, हे मला लक्षात आलं. त्यादृष्टीने मी स्वत:वर मेहनत घ्यायला सुरुवात केली. साधारण आठ महिन्यांपूर्वीपासून मी ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली. सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने मी स्वत:मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. स्पर्धेच्या निवड फेरीत मी सहभागी झालो. त्यातील पाच-सहा फेऱ्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर या स्पर्धेच्याअंतिम फेरीसाठी माझी निवड करण्यात आली.

 

रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेविषयी काय सांगाल?

 

‘मिस इंडिया’ या स्त्रियांसाठी असलेल्या सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच ‘रुबरू मिस्टर इंडिया’ ही पुरुषांमधील कलागुणांना, त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि सौंदर्याला वाव देणारी स्पर्धा आहे. लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे की, सौंदर्य स्पर्धा म्हणजे फक्त दिसायला चांगले असायला हवे. पण त्यासाठी तुमचे व्यक्तिमत्त्वही उत्तम असायला हवे. तुमची उंची किती आहे, तुमची शरीरयष्टी कशी आहे, तुमचा फॅशन सेन्स कसा आहे, तुम्ही कसे बोलता, स्वत:ला इतरांसमोर कसे सादर करता, तुम्हाला सामाजिक विषयांचे किती ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या दिसण्याइतक्याच महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गुणांची पारख करण्यासाठी त्यादृष्टीनेच स्पर्धेच्या फेऱ्या ठरवलेल्या असतात. या सर्व फेऱ्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच तुमची अंतिम स्पर्धक म्हणून निवड करण्यात येते. ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत माझी अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून निवड झाली याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पण इथपर्यंत पोहोचण्यामागे माझी आणि माझे फिटनेस गुरू मनिष आडविलकर यांची खूप मेहनत आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे असेल, काही बनून दाखवायचे असेल, तर मेहनतीला पर्याय नाही.

 
 

 
 

व्यायामाबरोबर आहारावरील नियंत्रणही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण नेमके काय करता?

 

व्यायाम हा फक्त २० टक्के असावा, बाकी ८० टक्के तुमच्या आहारावर तुमचे नियंत्रण असायला हवे. लोकांना वाटते की, आपण व्यायामशाळेत अनेक तास घाम गाळला की, झटपट बॉडी बनते. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. तुम्ही अनेक तास व्यायाम केलात आणि त्यानंतर काहीही तेलकट, तुपकट, गोड किंवा जंकफूड खाल्ले आणि खाण्याच्या बाबतीत जर तुमचे तुमच्या तोंडावर नियंत्रण नसेल, तर मग तुम्ही कितीही व्यायाम केलात तरी, तो निरर्थक आहे. तुमच्या ध्येयानुसार तुम्ही तुमचा आहार निश्चित करायला हवा. तुम्ही दिवसभरातून अन्नपदार्थांमधून किती कॅलरिज घेता, हे महत्त्वाचे असते. तुम्हाला सुदृढ दिसायचे असेल, तर कॅलरिजचे प्रमाण वाढवावे लागते. तुम्हाला सडपातळ व्हायचे असेल, तर आहारातील कॅलरिजचे प्रमाण कमी करावे लागते. त्यानुसार तुम्हाला आहारात बदल करावा लागतो. शरीरातील प्रोटीन्सच्या प्रमाणाकडेदेखील पुरेसे लक्ष द्यायला हवे. मी दिवसाला पाच वेळा आहार घेतो, पण नेमकेच अन्नपदार्थ खातो. चिकन, फिश, अंडी या मांसाहारी पदार्थांचा समावेश माझ्या रोजच्या आहारात असतो. त्यासोबत काही आवश्यक डायटरी सप्लिमेंट्सही मी घेतो. संतुलित आहारानेच सर्व काही साध्य करता येते आणि योग्य आहाराद्वारे तुम्ही सुडौल शरीरयष्टी प्राप्त करू शकता.

 

व्यायाम आणि पौष्टिक आहाराबरोबरच प्रोटीन शेक, सप्लीमेंट्स याकडेही शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या, त्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या तरुणांचा कल दिसून येतो. तुम्हाला हे कितपत फायदेशीर आणि सुरक्षित वाटते?

 

खंर तर लोकांचा हा मोठा गैरसमजच आहे. अनेक तरुण पार्टीच्या नावाखाली दारू पितात, सिगारेट ओढतात. असली व्यसनं करताना लोक घाबरत नाहीत. पण, प्रोटीन पावडर घेताना मात्र घाबरतात. प्रोटीन पावडर घेणे खूप सुरक्षित आहे. तुमच्या वजनानुसार तुमच्या शरीरातील प्रोटीनच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवले जाते. जर तुम्हाला वजनानुसार दिवसाला २०० ग्रॅम प्रोटीन घ्यायचे असेल. समजा, एका अंड्यातून तीन ग्रॅम प्रोटीन मिळत असेल, तर दिवसाला तुम्ही ६० अंडी खाऊ शकत नाही. पण एक चमचा प्रोटीन पावडरमधून तुम्हाला २५ ते ३० ग्रॅम प्रोटीन मिळते. ते पचायलाही हलके असते. त्यामुळे प्रोटीन पावडर घेणे फायद्याचे ठरते. प्रोटीन पावडर या अन्न आणि औषधे संशोधन मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त झालेल्या असतात. त्यामुळे शरीराला धोका नसतो.

 
 

 
 
 

सागरचा फिटनेस मंत्र

 

मी दिवसातून दोन वेळा व्यायाम करतो. शिवाजी पार्क येथे असलेली माझी ‘रिजस दी फिटनेस फॅक्टरी’ ही व्यायामशाळा अत्याधुनिक साधनांनी युक्त आहे. शरीरसौठष्व करणाऱ्या तरुणांना माझी व्यायामशाळा खूप प्रोत्साहन देते.

 

रूबरू मिस्टर इंडियास्पर्धेनंतर एकूणच करिअरच्या दिशा आणि ग्लॅमर क्षेत्रातील संधींकडे आपण कसे बघता?

 

रूबरू मिस्टर इंडिया’ ही अशी एकमेव स्पर्धा आहे की, या स्पर्धेच्या विजेत्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. या स्पर्धेच्या विजेत्याला ‘ग्लॅमर’ जगतात अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची, मॉडेलिंग क्षेत्रातही चांगल्या संधी मिळतात. मी या स्पर्धेचा विजेता ठरलो तर या सगळ्या गोष्टी करायला मला नक्कीच आवडतील. पण, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीयस्तरावरील मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे स्वप्न आहे.

 

तुमच्या वयाच्या इतर तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?

 

व्यायामासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून किमान दोन तास वेळ काढायला हवा. कारण, आज परिस्थिती पाहता प्रदूषण एवढे वाढले आहे की, २४-२५ वर्षांच्या तरुण मुलालादेखील हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे जर निरोगी राहायचे असेल, तर व्यायाम करायलाच हवा. त्यासाठी व्यायामशाळेतच जायला हवे, असे काही नाही. तुम्ही घरच्या घरीदेखील व्यायाम करू शकता. योगासने करू शकता. त्यामुळे शरीराला खूप फायदा होतो.

 

शरीरसौष्ठवाव्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी, छंद याविषयी....

 

स्पर्धकांना आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करता यावे, यासाठी ‘रुबरू मिस्टर इंडिया’ स्पर्धेत एक ‘टॅलेंट फेरी’ असते. या फेरीत मी नृत्य सादर करणार आहे. माझ्यातील नृत्यकौशल्य आणखी विकसित व्हावे, यासाठी नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास मी सुरुवात केली आहे. तसेच, माझ्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाशी संलग्न म्हणून मी आंतरराष्ट्रीय फ्लोरल डिझाईनिंगचा डिप्लोमा केला. मी एका वेडिंग प्लॅनर कंपनीत ‘फ्लॉवर डेकॉर एक्सपर्ट’ म्हणून काम करतो. फुलांची सजावट करायला मला फार आवडते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat