नाट्यलेखनातील प्रतीके आणि रूपके
महा एमटीबी   09-Mar-2019नाट्यगृहात रंगमंचासमोर 'चौथी भिंत' म्हणून बसलेला प्रत्येक प्रेक्षक स्वत:च्या अनुभवाशी समोरचे नाटक ताडून पाहत असतो. मात्र, अशा वेळी कलाकृतीच्या लेखक-निर्माता-दिग्दर्शकाने समोर ठेवलेला उद्देश आणि प्रेक्षक किंवा वाचकाने काढलेला मथितार्थ यांत फरक असतो आणि असा फरक असणे आवश्यक असते, तरच त्या कलाकृतीला अमूर्ताचे नियम लागू होतात.


अलीकडच्या काळात इंग्रजी आणि मराठी साहित्यात आणि नाट्यसंहितांमध्ये चिह्न- प्रतीके-रूपके यांचा वापर तरुण वाचकांच्या विशेष पसंतीस पडला. हे त्याच्या यशाचे मर्मस्थान आहे. 'क्रॉनिकल्स ऑफ नार्निया' ही कादंबरी आणि चित्रपट आणि जे. के. रोलिंगलिखित कादंबरी मालिकेतील हॅरी पॉटर ही व्यक्तिरेखा हे सगळे साहित्यातील चिह्नांचे आणि त्यातून अभिप्रेत होणाऱ्या अमूर्त संकल्पनांचे जनक आहेत. वाचक आणि प्रेक्षकाने एखाद्या कलाकृतीचा, त्यातील संपूर्ण विषयवस्तू आणि संकल्पनेचा सखोल अभ्यास करून त्या लेखक किंवा चित्रकाराचा, त्या कलाकृती मागचा हेतू आणि उद्देश लक्षात घेणे आवश्यक असते. पुढील परिच्छेदात उल्लेख केल्यानुसार प्रत्येक वाचक किंवा प्रेक्षक आपली स्वत:ची संकल्पना नक्कीच मांडू शकतो. नाट्यगृहात रंगमंचासमोर 'चौथी भिंत' म्हणून बसलेला प्रत्येक प्रेक्षक स्वत:च्या अनुभवाशी समोरचे नाटक ताडून पाहत असतो. मात्र, अशा वेळी कलाकृतीच्या लेखक-निर्माता-दिग्दर्शकाने समोर ठेवलेला उद्देश आणि प्रेक्षक किंवा वाचकाने काढलेला मथितार्थ यांत फरक असतो आणि असा फरक असणे आवश्यक असते, तरच त्या कलाकृतीला अमूर्ताचे नियम लागू होतात.

 

'वन फ्ल्यू ओव्हर ककूज नेस्ट' ही केन केसी याची १९६२ सालात प्रकाशित झालेली, अतिशय गाजलेली कादंबरी. १९७५ साली याच नावाने, मेलॉक फोरमन याने दिग्दर्शित केलेला अनेक सन्मान प्राप्त चित्रपट प्रदर्शित झाला. एकाच वर्षी जॅक निकल्सनच्या अभिनयासाठीच्या ऑस्करसह पाच ऑस्कर प्राप्त करणारा ऑस्करच्या इतिहासातला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट त्याच्या विषयवस्तू, कथा आणि पटकथेसाठी विशेष गाजला. त्याबरोबरच कादंबरीचा लेखक केन केसी आणि दिग्दर्शक मेलॉक फोरमन या दोघांच्या मध्ये झालेल्या वादासाठीही गाजला. आपल्या कादंबरीवर निर्माण झालेला हा यशस्वी चित्रपट दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादामुळे केन केसीने मात्र कधीच पहिला नाही. अमेरिकन चित्रपटाच्या १०० वर्षांच्या इतिहासातील, सर्वोत्तम १०० चित्रपटांमध्ये हा चित्रपट आजही ३३व्या क्रमांकावर विराजमान आहेएकदा दाखल केल्यानंतर कायम तिथेच राहणाऱ्या मनोरुग्णांना बाहेरचे जग पूर्ण विसरलेले असते, अशा रुग्णांचा अंत तिथेच होतो, अशा मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या एका रुग्णालयात, या कादंबरीचा लेखक केन केसी हा रात्रीचा मदतनीस म्हणून प्रत्यक्षात काम करत असे. १९५५ ते १९६० सालातील अमेरिकन समाज, प्रचलित कायदे, सरकारने लादलेले व्हिएतनाम युद्ध, युद्धावरून परत आलेले पराभूत मनोरुग्ण सैनिक अशा पार्श्वभूमीवर, केन केसी याने 'वन फ्ल्यू ओव्हर ककूज नेस्ट' या कादंबरीत एका अशाच रुग्णालयाचे रूपक वापरून अमेरिकेतील तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीवर प्रभावी टिप्पणी केली. मूळ कादंबरी आणि चित्रपटाची पटकथा यातील बदलांमुळे वाद झाले तरीही हे दोन्ही, त्यातील प्रभावी चिह्नसंकेत-रूपके आणि तुलना-दृष्टांत यामुळे जगभर गाजले.

 

सॅम्युएल बेकेट

 

सॅम्युएल बेकेट या नामवंत फ्रेंच नाटककाराचे जगप्रसिद्ध नाटक 'वेटिंग फॉर गोदो.' बेकेटने नाटकाची मूळ फ्रेंच संहिता १९४९ सालात लिहिली, त्याने स्वत:च त्याचे इंग्लिश रूपांतर केले, त्याचा पहिला प्रयोग १९५५ मध्ये लंडनमध्ये झाला. 'गोदो'ची रस्त्यात उभे राहून वाट पाहणारे दोघे, वाट पाहताना अन्य तिघांना भेटतात. मात्र, शेवटपर्यंत हा 'गोदो' काही येत नाही. या नाटकाचे वैशिष्ट्य असे की, यातील अमूर्त संकल्पनेसाठी, हे नाटक त्याकाळात खूप गाजले. राजकीय, सामाजिक, धार्मिक दृष्टिकोनातून या नाटकाचे असंख्य जाणकार समीक्षकांनी मोजता येणार नाही इतक्यावेळा विश्लेषण केले. डॉ. सिग्मंड फ्रॉइड आणि डॉ. कार्ल गुस्ताव यंग या दोन महान मानसोपचार तज्ज्ञांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी या नाटकाचे, मनोविकार झालेली नाटकांतील पात्रे, अशा दृष्टीने विश्लेषण केले. कोणी विश्लेषकाने नाटकातील पात्रे ज्याची वाट पाहतायत हा 'गोदो' देवच आहे, असे छातीठोकपणे सांगितले. मात्र, मुलाखतींमधून वारंवार प्रश्न विचारूनही, लेखक सॅम्युएल बेकेट याने नाटकातील हा 'गोदो' कोण याचा खुलासा करणे शेवटपर्यंत टाळले, तो खुलासा कधीच स्पष्ट झाला नाही. इतक्या सगळ्या प्रश्नानंतर आणि प्रसिद्धीनंतर या नाटकातील अजूनही गूढ राहिलेल्या चिह्नसंकेत-रूपके-प्रतीकांमुळेच हे नाटक, विसाव्या शतकांतील 'इंग्लिश रंगभूमीवरचे सर्वात लक्षणीय नाटक' अशा संबोधनाने सन्मानित झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या अभ्यासकाला आजही, नाट्यसंहितेतील 'अमूर्त संकल्पनाची जनक' ठरलेली ही संहिता सादर करणे आव्हान वाटते. जागतिक चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील या दोन संहितांचा संक्षिप्त अभ्यास मांडल्यानंतर आपण भारतीय किंवा खासकरून मराठी रंगभूमीवरील महत्त्वाच्या नाट्यलेखक आणि त्यांच्या संहितांचा, चिह्नसंकेत-रूपके-प्रतीके या भिंगांतून अभ्यास करू जो खूप रंजक आहे.

 

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२-१९४८)

 

मराठी नाट्यलेखनाचे एक आद्यजनक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या सर्व लिखाणाला तत्त्वनिष्ठा आणि निस्सीम राष्ट्रभक्ती याचे अधिष्ठान होते. खाडीलकरांचे १९०७ साली लिहिलेले 'कीचकवध' हे अजरामर नाटक म्हणजे चिह्नसंकेत आणि अमूर्त संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे. यातील 'द्रौपदी' ही व्यक्तिरेखा म्हणजे तत्कालीन पारतंत्र्यातील भारतवर्षाचे प्रतीक आहे. 'कीचका'चे पात्र म्हणजे जुलमी इंग्रज राज्यकर्ते, 'युधिष्ठिर' हा मवाळ पक्षाचे प्रतीक, तर 'भीमा'चे पात्र हे जहाल मतवादी आणि क्रांतिकारकांचे प्रतीक आहे. महाभारतातील या व्यक्तिरेखा, त्यांच्या ज्ञात स्वभावधर्मासाठी भारतातील तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला रूपके म्हणून वापरण्याची संकल्पना, मराठी नाट्यलेखनाच्या इतिहासात महत्त्वाची आहे. या नाटकाला प्रेक्षकांची गर्दी जशी वाढू लागली आणि प्रेक्षकांच्यात काही क्रांतिकारक दिसू लागले, त्याबरोबर इंग्रज सरकारने या नाटकावर तत्काळ बंदी घातली. मात्र, असे चिह्नसंकेत हे अनेकदा ठराविक काळ आणि तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात असतात आणि परिस्थिती बदलली की, असे लिखित साहित्यातील चिह्नसंकेत कालबाह्य होतात. मात्र, तरीही साहित्यातले त्याचे स्थान जराही कमी होत नाही. साधारण १९७० सालानंतर भारतीय आणि विशेष करून मराठी रंगभूमीला एक नवी ऊर्जा प्राप्त झाली. आजच्या घडीला यशस्वी झालेल्या अनेक तरुण नाट्यकर्मींची यशस्वी कारकीर्द याच काळात सुरू झाली. त्यांच्या सकस संहिता हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नड आणि बंगाली नाट्यसृष्टीत सादर झाल्या आणि त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर अशा लेखकांनी आणि विजया मेहता, जब्बार पटेल, सत्यदेव दुबे अशा नाट्यकर्मींनी अनेक शतकांपासून प्रचलित पारंपरिक भारतीय नाट्यकला आणि पाश्चिमात्य नाट्यसंस्कृती, नाट्यशैली याचा उत्तम संयोग करून आधुनिक भारतीय आणि विशेष करून मराठी नाटकांत नव्या संकल्पना सादर केल्या. नवी क्षितिजे, नवे विषय, नव्या जाणिवा, नवे आशय, अस्तित्ववाद, मानवी मनोव्यापार अशा अनेक नव्या संकल्पना नाट्यसंहितेत वापरल्या गेल्या. वैचारिक, भावनिक, मानसशास्त्रीय व्यवहारांची मांडणी नाट्यसंहितेच्या नव्या शैलींमध्ये केली गेली आणि इथेच चिह्न-रूपके-प्रतीके यांचा यशस्वी वापर झाला. संहितेतील विषय-आशय, आविष्काराची मांडणी आणि तंत्र याच्या साहाय्याने रंगमंचीय सादरीकरणाला नव्याने महत्त्व प्राप्त झाले, प्रेक्षकांची दाद मिळाली.

 

मृषानाट्य

 

'Theater of Absurd' हा सॅम्युएल बेकेटचा वारसा आणि नाट्यलेखनशैली मराठी रंगभूमीवर प्रचलित करणारे प्रतिभावंत नाटककार याच काळात प्रभावी ठरले, यशस्वी झाले. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रगतीमध्ये या नव्या दमाच्या नाटककारांचे योगदान फार मोठे आहे. प्रचलित भारतीय नाट्यसंस्कृतीत, 'Absurd' या शब्दाला आणि संकल्पनेला, भाषावार विविध प्रतिशब्द वापरले गेले. मृषानाट्य, व्यस्त रंगभूमी, असंगत नाट्य, विसंगत नाट्य, न-नाट्य, निरार्थनाट्य अशी अनेक संबोधने-विशेषणे याचा संदर्भ देताना वापरली गेली. १९७०च्या आधीच्या काळापर्यंत मराठी पारंपरिक प्रचलित रंगभूमीवर उत्तम जीवनमूल्ये, सदाचार, तर्कसंगत-आदर्शमूल्य, नीती संकल्पना, संयमित शृंगार याचे चित्रण नाट्यसंहितेमध्ये केले गेले होते. उत्तम काव्य आणि संगीत हे संहितेच्या आशयाला पूरक होते आणि त्या मराठी नाट्यसंगीताने विशेष वारसा निर्माण केला. या उलट, 'Theater of Absurd' किंवा मृषानाट्याच्या संहितांमध्ये अशा पारंपरिक नीतिमूल्ये-आदर्श-तर्कसंगत दैनंदिन व्यवहार या सर्वांचा, समाज आणि व्यक्तीच्या आयुष्यात झालेला ऱ्हास किंबहुना अशा संकल्पनांचे अध:पतन याचे अनपेक्षित चित्रण झाले. जीवन निरर्थक आहे, या सगळ्या पारंपरिक आदर्श नीति संकल्पना आभासी आहेत, अशी मांडणी हेतुपूर्वक स्पष्टपणे केली गेली. याच आणि अशाच नव्या विषय-आशय संकल्पना, संहितेत संवादाच्या माध्यमात साकार करताना, दिग्दर्शनाचे अनेक प्रयोग सिद्ध झाले, आधुनिक प्रेक्षकाने या वास्तववादाला, त्याच्या अनपेक्षित-अनोख्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली, त्याचा स्वीकार केला. नव्या नाट्यलेखन शैलींमध्ये नव्या संकल्पना मांडणाऱ्या प्रथितयश आधुनिक नाट्यलेखकांचा आणि त्यांच्या संहितेतील चिह्नं आणि प्रतीकांचा वापर याचा परिचय, पुढील लेखांत नक्कीच होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat