पुढे जाताना...
महा एमटीबी   09-Mar-2019


 


स्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पठडीबद्ध केलेल्या वाटांपेक्षा वेगळा, स्वयंपूर्ण आणि भविष्याभिमुख विचार करणे तरुणांना विशेषत: पालकांना दडपणाचे वाटते. त्यामुळे करिअरचा विचार आपल्या समाजात साचेबद्धपणे केला जातो असे दिसते.


मित्रमंडळींच्या गप्पांच्या सत्रात 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' आणि त्याचे परिणाम यावर उलट-सुलट चर्चा चालू होती. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांतील लोक आपापली मते मांडत होते. यंत्रयुगाच्या वेगाने होणाऱ्या विकासामुळे माणसाला निर्माण होणारा धोका, वाढू शकणारी बेरोजगारी, उद्भवू शकणाऱ्या सामाजिक-बौद्धिक-मानसिक समस्या यावर बरीच मतमतांतरे झाली. यातून 'भविष्यातील व्यवसायांचे स्वरूप? त्यासाठी आपण, विशेषत: तरुण पिढी सुसज्ज आहे का?' या प्रश्नांशी मंडळी येऊन ठेपली. चर्चा करताना लक्षात येऊ लागले की, प्रचलित शिक्षणपद्धती नवनवीन यंत्रे समजून घेण्याचे, चालवण्याचे शिक्षण युवा पिढीला देत आहे. पण, काळाची गरज तितकीच आहे का? 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मार्टफोन हातात असणारी, हाताळता येणारी व्यक्ती' ही 'स्मार्टपणा'ची व्याख्या असावी का? बहुतांशी उपभोक्तावादाच्या तत्त्वावर आधारलेल्या जाहिरातींतून माध्यमे आपली दिशाभूल तर करत नाहीत ना? तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे माणसाला माणसाची, मनुष्यजातीला निसर्गाची गरज राहणार नाही, अशा भ्रमाकडे तर आपण खेचले जात नाही ना? या प्रश्नांकडे तरुणांनी करिअरचा विचार करताना विशेष लक्ष द्यायला हवे. करिअर जितके समाजाभिमुख, निसर्गपूरक असेल तितके दीर्घकालीन महत्त्व त्याला मिळणार. 'The more I study science, the more I believe in God. I believe in God who reveals himself in the orderly harmony of the universe' ही खुद्द अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञाची विचारधारा आहे. शास्त्रीय अथवा तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन निसर्गाशी फारकत घेणारा नसून त्याच्याशी एकता साधणारा असेल, तरच तो प्रगतिशील राहील. हे सूत्र जगाच्या भावी सज्ञान नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे. मानवाच्या उत्क्रांतीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मूलभूत मानवी कौशल्यांचे स्थान अबाधित आहे. यंत्रांचा, तंत्रज्ञानाचा विकास हा माणसाचे काम सोपे करण्यासाठी झाला आहे. या विकासाचा वेग पाहता भविष्यात बहुतांश कामे करण्यासाठी यंत्रे सुसज्ज असतील.

 

भविष्यवेधी शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार भविष्यातील कार्यक्षेत्रे चार भागात विभागता येतील- तांत्रिक, नित्य, कौशल्यपूर्ण आणि कल्पक. यातील तांत्रिक, नित्य व बहुतांश कौशल्यपूर्ण कामे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे उपयोगात येतील. यातील कल्पक कामे मात्र अद्वितीय, अनियमित आणि स्वायत्त असतील. त्यामुळे ती करू शकणाऱ्या व्यक्तींची रोजगारक्षमता भविष्यात निश्चितच जास्त असणार.तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी, उत्क्रांतीच्या प्रत्येक पायरीवर उपयुक्त ठरलेले मूलभूत मानवी गुणधर्म, कौशल्ये आज आणि उद्याही अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. २०२० व त्यापुढे विविध व्यवसायक्षेत्रांत संपन्न होत राहण्यासाठी, जागतिक अर्थशास्त्रविषयक मंचाने पुढील दहा कौशल्यांना महत्त्व दिले आहे. जटिल समस्यांचे निवारण करता येणे, विश्लेषणात्मक विचारप्रक्रिया, कल्पकता, मानवी कौशल्यांचे व्यवस्थापन, इतरांशी समन्वय साधून काम करता येणे, भावनिक बुद्धिमत्ता, सुज्ञपणे, सारासार विचार करता येणे, सेवाभावी वृत्ती, परस्परसंमतीने निर्णय घेता येणे आणि विचारांची परिवर्तनशीलता या कौशल्यांसह भविष्याकडे केलेली वाटचाल तरुणांना भक्कमपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देईल. या वाटचालीचा अजून एक अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे 'सातत्याने शिकत राहण्याची तयारी. 'Future Shock', 'The Third Wave' यासारखी अभ्यासपूर्ण भविष्यवेधी पुस्तके लिहिणारे अमेरिकन लेखक अल्विन टाॅफलर म्हणतात की, "The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn, and relearn." स्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पठडीबद्ध केलेल्या वाटांपेक्षा वेगळा, स्वयंपूर्ण आणि भविष्याभिमुख विचार करणे तरुणांना विशेषत: पालकांना दडपणाचे वाटते. त्यामुळे करिअरचा विचार आपल्या समाजात साचेबद्धपणे केला जातो असे दिसते. परंतु, खरेतर शिकत राहणे, गरजेप्रमाणे शोध लावत राहणे, सहकार्याने काम करणे, कल्पक विचार करणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवी विकासाच्या प्रवासात ही प्रवृत्तीच सातत्याने उपयुक्त ठरलेली आहे. गरज आहे ती अनावश्यकपणे आपण लावून घेतलेली झापडे उतरवून आपला दृष्टिकोन विस्तारण्याची.

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat