समाजघातक कुविद्या...
महा एमटीबी   06-Mar-2019कुविद्येची माणसे समाजाचे अपरिमित नुकसान करतात. त्यांच्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते. समर्थांसारखे संत या अवगुणांचा पाढा वाचून लोकांना त्यापासून दूर राहण्याचा उपदेश करतात. कुविद्यालक्षणांचे अनेक प्रकार या समासात सांगून स्वामींनी अवगुणांचे भांडार दाखवले आहे, त्यागार्थ सांगितले आहे. त्यांचे वर्गीकरण करून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.


सबोध ग्रंथाच्या रचनेत विविधता आहे. भाषेचे वेगवेगळे प्रयोग समर्थांनी दासबोधात केले आहेत. दासबोधातील ‘मूर्खलक्षण’ या दशकाच्या सुरुवातीस मूर्खलक्षणे ‘त्यागार्थ’ सांगण्यापूर्वी ‘येक मूर्ख येक पढतमूर्ख’ असे सांगून त्या ‘पढतमूर्खाचे लक्षण । पुढिले समासी निरूपण।’ हे सांगितले. पण, लगेच पुढच्या समासात पढतमूर्खाची लक्षणे दिसत नाहीत. ‘पुढिले समासी’ म्हणजे पुढे नंतरच्या समासात सांगतो, असे समर्थ म्हणतात. साधकाने मूर्खलक्षणे सोडली, तर तसे करण्यात चातुर्य आहे, शहाणपणा आहे असे स्वामी सांगतात. ‘मूर्ख लक्षणे’ टाकून द्यायची मग पुढे काय करायचे, हा प्रश्न पडतो. त्यासाठी समर्थ लगेच उत्तम गुण लक्षणे सांगतात. काय त्यागायचे ते सांगितल्यावर काय स्वीकारायचे ते श्रोत्यांना समजले पाहिजे. संतांच्या बुद्धीची साक्ष त्यांच्या वाङ्मय रचनेत पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांनीही पसायदान मागताना सुरुवातीस ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ अशी प्रार्थना केली खरी, पण या दुष्टांनी त्यांचा दुष्टपणा टाकून दिल्यावर त्यांच्या ठिकाणी एक प्रकारची पोकळी निर्माण होईल, असे संत ज्ञानदेवांना वाटले असावे. ती पोकळी भरून काढण्यासाठी माऊलींनी लगेच पुढे सांगितले की, ‘तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे।’ याचा अर्थ दुष्टांतील दुष्टपणा निघून गेल्यावर त्या जागी ‘सत्कर्माची आवड’ आणि ‘परस्परांची मैत्री’ आल्याने रिकामी जागा भरून निघेल. समर्थांनी ‘उत्तम गुण’ सांगितल्यावर ‘त्यागार्थ’ कुविद्येची लक्षणे सांगायला सुरुवात केली. कारण, नुसता मूर्खपणा टाकून दिला, तर माणूस समाजोपयोगी अथवा अध्यात्म ज्ञानासाठी पात्र होईल असे नाही. कुविद्यालक्षणेही तेवढीच घातक आहेत. त्यांचा त्याग केला पाहिजे. समर्थांना स्वराज्यासाठी आवश्यक असा चांगला समाज घडवायचा होता. समर्थांनी समाजातील सुसंस्कृत माणूस कसा नसावा हे यातून सांगितले. त्यासाठी समर्थांनी कुविद्येची लक्षणे विस्तारपूर्वक सांगितली. ती ‘त्यागार्थ’ सांगितली. कुविद्येच्या मनुष्याच्या ठिकाणी सारे अवगुण एकत्र आलेले असतात. ते अवगुण सोडून द्यावेत, असे कुविद्येच्या माणसाला वाटत नाही. समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीने सांगितले, तर ते अवगुण सोडण्याची कुविद्यायुक्त माणसाला बुद्धी होईल. यासाठी ‘कुविद्या लक्षणनाम’ समास महत्त्वाचा आहे. या कुविद्येने युक्त माणसाच्या ठिकाणी अवगुणांची समृद्धी कशी आली, हे सांगण्यासाठी आधार म्हणून गीतेच्या १६व्या अध्यायातील चौथा श्लोक समर्थांनी उद्धृत केला आहे.

 

दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध:

पारुण्यमेव च ।

अज्ञानं चाभिजातस्य

पार्थ संपदमासुरीम् ॥

 

(आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या पुरुषास वदंभ, घमेंड, (वृथा) अभिमान, क्रोध संताप, कठोरपणा आणि अज्ञान हे गुण प्राप्त होतात.) दासबोध रचनेची गंमत अशी की, समर्थांनी गीतेतील हा चौथा श्लोक या समासातील चौथ्या ओवीच्या अगोदर टाकला आहे. त्याचे चौथे स्थान कायम ठेवून त्याला योग्य जागी आणले आहे. समर्थांनी असे वाटते की, सुसंस्कृत माणसांच्या समाजात ही आसुरी संपत्ती नसावी. या आसुरी संपत्तीने कुविद्येने माणसाची देहबुद्धी व पापवासना दृढ होते. आसुरी संपत्तीची जी पिल्ले भगवंतांनी गीतेत सांगितली, त्यांचे नातू-पणतू समर्थांनी ‘कुविद्यालक्षण’ या समासात स्पष्ट करून सांगितले आहेत. कुविद्येचा प्राणी जन्माला येऊन आपल्या अवगुणांनी समाजाला त्रास देतोच, पण स्वत:चेही नुकसान करून घेतो. त्याच्या ठिकाणी अवगुणांचा कोश असल्याने कोणी आदेश केलेला त्याला आवडत नाही. पुढे समर्थ सांगतात की काम, क्रोध, लोभ, तिरस्कार, गर्व, ताठा, विकल्प, चिंता, अहंता, कामना, वासना, तऱ्हेवाईकपणा इ. कुविद्या लक्षणे एखाद्याच्या ठिकाणी दिसून येतात; तेव्हा समजावे की, त्याला ‘कुविद्या’ नावाचा मोठा रोग झाला आहे.

 

ही अवगुणांची लक्षणे सांगताना ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून पहिल्या २१ ओव्यांत समर्थांनी मार्मिकपणा दाखवला आहे,” असे समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर म्हणतात. समर्थांनी या समासात आळशी आणि खादाड, मूर्ख आणि तपोळ (तापट), वेडा आणि वाचाळ, अज्ञानी आणि अविश्वासी, पापी आणि निंदक, रोगी आणि कुकर्मी, कनिष्ठ आणि गर्विष्ठ अशा कितीतरी अवलक्षणी जोड्या ‘आणि’ या शब्दाने जोडल्या आहेत. या ठिकाणी ‘आणि’ याचा अर्थ ‘असूनही’ असा घ्यावा लागतो. जसे वेडा आणि वाचाळ. एखादा माणूस वेडा असेल, तर लोक दुर्लक्ष करतात. पण वेडा असूनही वाचाळ, बडबड्या असेल तर त्रासदायक. पापी आणि निंदक, पापी माणसाला लोक दूर ठेवतील. पण, तो पापी असूनही निंदा करणारा असेल, तर लोक त्याला कसे सहन करतील, अशा रितीने समर्थांनी निवेदनातील कंटाळवाणेपणा दूर केला आहे. ही कुविद्येची माणसे समाजाचे अपरिमित नुकसान करतात. त्यांच्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते. समर्थांसारखे संत या अवगुणांचा पाढा वाचून लोकांना त्यापासून दूर राहण्याचा उपदेश करतात. कुविद्यालक्षणांचे अनेक प्रकार या समासात सांगून स्वामींनी अवगुणांचे भांडार दाखवले आहे, त्यागार्थ सांगितले आहे. त्यांचे वर्गीकरण करून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

 

व्यक्तिनिष्ठ सुविद्या

 

ही माणसे कपटी, कुटील, कारस्थानी व द्वेषाने बोलणारी असतात. ही माणसे संशयी असतात. चांगले त्यांना पाहावत नाही. प्रत्येक चांगल्या गोष्टीत शंका उपस्थित करून ते चांगले घडू देत नाहीत. ही माणसे कलहप्रिय असतात. छोट्या छोट्या गोष्टीत भांडण उकरून काढतात. तसेच भांडण बघणे त्यांना आवडते. भांडण लावून मजा पाहत बसतात. हे महापापी असून भ्रष्ट असतात. ही माणसे स्वार्थी, हावरट व घट्टी मुठीची म्हणजे त्यांच्या मुठीतून दुसर्‍यांसाठी काही सुटत नाही, अशी असतात. ते कंजुष असतात. समाजासाठी काही त्याग करायची त्यांची तयारी नसते.

 

स्वभावनिष्ठ कुविद्या

 

ही माणसे स्वैर व उत्शृंखल असतात. आम्ही कशाचे बंधन मानत नाही, असे म्हणणारी असतात. त्यामुळे त्यांना नीतिबंधने किंवा धर्माने घालून दिलेली आचरणाची चौकट आवडत नाही. अशी माणसे बहुदा अधर्मी असतात. धर्म त्यांना मान्य नसतो. समाजातील जगरहाटी त्यांना आवडत नाही. जगरहाटी मोडून काढण्याकडे त्यांचा कल असतो. जगरहाटी मागील तत्त्वे न पाहता स्वार्थबुद्धीने ते ती मोडण्याचा प्रयत्न करतात.

घातकीपणा

ही कुविद्येची माणसे आत्मघातकी, स्त्रीघातकी, गोहत्या करणारी, मातृघातकी, पितृघातकी आणि मित्रद्रोही असतात. हत्या करणे त्यांना आवडते. हत्या करण्यात त्यांना आनंद वाटतो. हे मारेकरी असतात, दरोडेखोर असतात. ते भोंदू असून परस्त्रीशी संबंध ठेवणारे असतात.

 

बुद्धीचा दुरुपयोग करणारी कुविद्या

 

ही माणसे वाईट कर्म करणारी असतात. एखाद्या चांगल्या गोष्टीतील वर्म शोधून काढून, त्यावर कुतर्क करून लोकांना ते संभ्रमात टाकतात. ही माणसे विश्वासघातकी असतात. तसेच ते कृतघ्न असतात. कोणी उपकार केला, तर त्यात त्याने विशेष काय केले असे मानणारी असतात. ही माणसे दुसऱ्याचे नुकसान करणारी असतात. या माणसांना चेटूक विद्या आवडते. चेटूक विद्या शिकून ते इतरांवर चेटूक करीत असतात. इतरांवर चेटूक करून लोकांना छळण्यात त्यांना आनंद वाटत असतो. कुविद्याधारक माणसांची स्थिती कशी असते, याचे मार्मिक वर्णन समर्थांनी या समासात केले आहे. ही माणसे आततायी व बडबडी असतात. वर वर्णन केलेले सर्व दुर्गण त्यांच्या ठिकाणी आश्रयाला आलेले असतात. ते समाजाला त्रासदायक तर असतातच, पण त्यांची अंतिम अवस्था वाईट असते. ही कुविद्या लक्षणांनी युक्त माणसे विद्याहीन, वैभवहीन, शक्तिहीन अशी असतात. त्यांचे थोडक्यात वर्णन म्हणजे ही माणसे भिकारीच असतात.

 

विद्याहीन वैभवहीन ।

कुळहीन लक्ष्मीहीन।

शक्तिहीन सामर्थ्यहीन ।

अदृष्टहीन भिकारी ॥

 

ही कुलक्षणी माणसे ओळखणे फारसे कठीण नाही. कारण, त्यांच्या ठिकाणी हे अवगुण काठोकाठ भरलेले असतात.

 

ऐसे हे नाना विकार ।

कुलक्षणांचे कोठार ।

ऐसा कुविद्येचा नर ।

श्रोती वोळखावा ॥

 

अशी ही कुलक्षणी माणसे समाजात असणे सर्वांनाच घातक आहे. ही लक्षणे त्यागार्थ सांगितली आहेत. शेवटी एक महत्त्वाची सूचना स्वामींनी केली आहे. श्रोत्यांनी उगीच इरेस पडून ही कुविद्या लक्षणे न सोडण्याचा अट्टाहास करणे, हे चांगले नाही. ‘अभिमाने तऱ्हे भरणे। हे विहित नव्हे॥ही कुविद्या लक्षणे टाळून आपण समाज सुसंस्कृत करावा, ही स्वामींची अपेक्षा आहे. त्यासाठी ज्या सद्विद्येचा अभ्यास केला पाहिजे, त्याची लक्षणे पुढील लेखात पाहू. (क्रमश:)

 
 - सुरेश जाखडी
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat