वैराग्याची मूर्तिमंत माता: नर्मदा
महा एमटीबी   06-Mar-2019नर्मदेच्या पात्रामध्ये आणि तिच्या तीरावर हजारो ऋषी, साधू, साधक, संन्यासी अदृश्य रुपामध्ये अखंड तपश्चर्या करत आहेत. चर्मचक्षूंना ते दिसतातच असं नाही. ज्यांची अध्यात्मात प्रगती झाली आहे, अशा साधकांना ते दिसतात.


नर्मदा नदीने विरक्तीचे, वैराग्याचे अलंकार धारण केलेले आहेत. नर्मदा प्रत्येक साधकाला आपल्या तीरावर आत्मिक बलप्रदान करते. तिच्या जलामध्ये आध्यात्मिक शक्तीचं सामर्थ्य आहे. तिच्या तीरावर अनेकांनी आश्रम उभारले. भव्य मठांची स्थापना केली. साधकांना सिद्धीपर्यंत घेऊन जाणारी नदी अत्यंत खोल, गहन आणि गूढ आहे. साधकाला सांभाळणारी नर्मदा ही मातेप्रमाणे आहे. माता आपल्या बालकाला सर्वतोपरी समजून घेते. काहीही न सांगता बालकाला काय हवं आहे, हे ती जाणते. क्षणोक्षणी त्याची काळजी घेते. अशीच नर्मदा मैय्या... माता. तिचं आणि साधकाचं नातं मायेचं आहे. मायेचं असूनही मायेच्याही पलीकडे असणाऱ्या परमात्म्यापर्यंत जाण्यास ती मन:पूर्वक मदत करते. तिच्या तीरावरील काही आश्रम ओसाड पडलेले आहेत. काही मंदिरे जीर्णोद्धाराच्याप्रतीक्षेत आहेत. प्रत्येक ऋतू इथे आपलं ‘स्व’रूप दाखवतो. हिंदूंच्या जीवनात सरितांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. पूजा-अर्चन करून नर्मदा नदीला प्रसन्न करून घेतले जाते. नर्मदा मायेपासून मुक्त करण्यास साहाय्य करणारी माता आहे. म्हणूनच नर्मदेचा काठ हा आद्य शंकराचार्यांची तपोभूमी होता. मोरटक्का खेडीघाट, जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश येथे प. पू. भालचंद्रशास्त्री भारती महाराज यांनी स्थापन केलेले राजराजेश्वरी जगदंबेचे मंदिर व श्रीयंत्र उपासनेचे सर्वात मोठे केंद्र होते.

 

कालांतराने अशी ऊर्जास्थाने ओस पडू लागली. तरी काहींनी या स्थानांचा जीर्णोद्धार केला. तरीदेखील अशी उपेक्षित, दुर्लक्षित शक्तिस्थाने अनेक आहेत. प्रत्येक भूमीचे, वास्तूचे, मूर्तीचे प्रारब्ध असते. त्या प्रारब्धानुसार त्यामध्ये स्थित्यंतरे घडत असतात. संत सत्पुरुषांना सूक्ष्म सृष्टीमधून आदेश मिळतात. त्यांना प्रेरणा मिळते. त्यांच्या पावन स्पर्शाने त्या भूमीला, वास्तूला, मंदिराला उर्जितावस्था प्राप्त होते. मंदिराचा जीर्णोद्वार संत, साधकांच्या हस्ते होतो. पुनश्च ते स्थान भक्तांनी गजबजून जाते. उपासना, साधना, पारायण, पुनश्चरण यांना प्रारंभ होतो. तेथील औदासिन्य, मरगळ दूर होते. अवघा परिसर भक्तांनी फुलून जातो. सामान्य माणसाला आपले प्रारब्ध असते, हे कळते. परंतु, मंदिरे, भूमी, वास्तू, मूर्ती यांनादेखील प्रारब्ध असते, हे आकलन होण्यापलीकडील असते. नर्मदेच्या पात्रामध्ये आणि तिच्या तीरावर हजारो ऋषी, साधू, साधक, संन्यासी अदृश्य रुपामध्ये अखंड तपश्चर्या करत आहेत. चर्मचक्षूंना ते दिसतातच असं नाही. ज्यांची अध्यात्मात प्रगती झाली आहे, अशा साधकांना ते दिसतात. हजारो वर्षांचा काळ साधनेमध्ये व्यतित करणारे सूक्ष्मरूपात नर्मदेच्या काठावर वास्तव्य करून आहेत. आद्य शंकराचार्यांनी अत्यंत शक्तिसंपन्न असणाऱ्या नर्मदेची स्तुती करणाऱ्या ‘नर्मदाष्टका’ची रचना स्फूर्तीमधून साकार झाली. त्याचप्रमाणे संन्यासाश्रमाचा आदर्श प्रस्थापित करणारे प. प. टेंबे स्वामी महाराजांनी नर्मदेची स्तुती करणारी स्तोत्रे रचली. तिच्या ठायी असणाऱ्या अफाट शक्तीची प्रचिती येऊन प. प. टेंबे स्वामी तिच्या चरणी नतमस्तक झाले. ते नर्मदेशी एकरूप झाले आणि त्यांना नर्मदास्तोत्राचे स्फुरण झाले.

 

नर्मद ईश्वरविग्रहजाते शर्मद

उद्वतिदा भव यत्ते।

कर्मनिवारक मम्बुम आस्ये धर्मविधारकमस्तु नमस्ये॥

पुढे स्वामी लिहितात-

मेकलजे तव तीरं सेवे

मेघमरं हरजे हर रेवे।

क्षेत्र इहपि च कर्दमनाम्नि

क्षेमकरे तव सन्निधिरस्तु॥

दर्शनतो द्रुतमेत पुनासि

ज्ञातमिंद ह्यलसा खलु नासि।

नर्मद आवरणं हर तूर्णं प्रापय

तत्पर धाम सुपूर्णम्॥

 

अशी केवळ तीन श्लोकांची स्तोत्ररचना त्यांनी केली. सकल कर्म नाहिसे करण्याची ताकद असलेल्या, धर्माला पुष्ट करण्यास प्रेरणा देणाऱ्या आणि ईश्वराचा नित्य वास असणाऱ्या नर्मदेला मनोभावे नमस्कार करणारे टेंबे स्वामी! तुझ्या केवळ दर्शनाने अनेक पापं नष्ट होतात. तू सगळ्यांचे कल्याण करणारी आहेस, असे आशयघन अवघ्या तीन श्लोेकांचे स्तोत्र आहे. स्वामींचे आणि नर्मदा नदीचे एक आगळेवेगळे नाते जुळून आलेले होते. टेंबे स्वामी महाराज धार जिल्ह्यातील नर्मदा तीराच्या उत्तर तटावरील ‘चिखलदा’ या क्षेत्री राहिले. पुढे ते होळकर राज्यात ‘डही’ येथे गेले. शूलपापेश्वराच्या जंगलात ‘कातरखेडा’ मुक्कामी गेले. ‘गरुडेश्वर’ हे क्षेत्र स्वामींच्या वास्तव्याने निर्माण झाले. नर्मदा माता स्वामींशी हितगुज करत असे. दोन वैराग्याच्या मेरुमणींमध्ये संवाद होणे स्वाभाविक आहे. श्रीक्षेत्र गरुडेश्वर स्वामींच्या देहविसर्जनाचे, अवतार समाप्तीचे पवित्र स्थान आहे. नश्वर देह नर्मदेला अर्पण केल्यावर नर्मदा हेलावली. आपल्या पुत्राला या मातेने आपल्या कुशीत घेतले. धन्य ती नर्मदा माता आणि धन्य ते प.प. वासुदेवानंद सरस्वती उर्फ प. प. टेंबे स्वामी महाराज! गरुडेश्वराचा शेवटचा चातुर्मास संपन्न झाला. नर्मदा आणि स्वामी एकमेकांपासून दुरावले नाहीत, तर कायमचे एकरूप झाले.

 

ज्ञानाधी गरुडेश्वरास असतां,

पापाधि तारावया ।

भक्तांचे भव सांकडे कठीण

जे त्यासी निवारावया ॥

धर्मा रक्षुनि, शुद्ध जी प्रतिपदा आषाढमासांतरी ।

होई सद्गुरु-ब्रह्म-मीलन

तदा आनंदसंवस्तरी ॥

 

पापाचा क्षय, लय करून भक्तांना हा कठीण भवसागर तरून जाण्यासाठी प.प. टेंबेस्वामींनी साधकांना उपदेश केला. धर्माचं रक्षण करणाऱ्या स्वामींनी नर्मदा मातेच्या इच्छेला मान देऊन ते श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे तिच्याशी एकरूप झाले. हजारो लोकांना संकरमुक्त करणाऱ्या स्वामींनी नर्मदेच्या विवेक, वैराग्याला अधिकच उज्ज्वल केले. नर्मदा आजही हजारो साधकांना विरक्तीचे गुणगान गाऊन भवसागरातून बाहेर काढण्याचा अमूल्य व्रताचा अंगीकार करताना दिसते.

 
- कौमुदी गोडबोले 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat