भारतीय नौसेनेचा अभिलाष ‘सिकंदर’
महा एमटीबी   06-Mar-2019
 
 

एक शिडाची नौका घेऊन महासागराशी दोन हात करत पृथ्वीची सागरीपरिक्रमा पूर्ण करणार्‍या अभिलाष टॉमी यांच्याविषयी आज आपण ‘माणसं’ सदरात जाणून घेणार आहोत.

 

संपूर्ण जग जिंकायला निघालेल्या महत्त्वाकांक्षी सिकंदरविषयी अनेकांनी ऐकलं असेल, वाचलंही असेल. मात्र, तो जगज्जेता होऊ शकला नाही, हे त्याचं दुर्दैव. खरंतर अशी लोक खूप जिद्दी आणि साहसी असतात. जग जिंकून घेणं हा विचारच सर्वसामान्य करूच शकत नाहीत. त्यासाठी खूप मोठी हिंमत आणि आभाळाएवढा आत्मविश्वास लागतो. असाच एक सिकंदर आपल्या भारतात आहे, जो एकदा जग जिंकून आला. मात्र, दुसर्‍या वेळी दुर्दैवाने थोडक्यासाठी हुकला. भारताच्या या ‘सिकंदर’चे नाव आहे अभिलाष टॉमी. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही विचार करताय तेच हे अभिलाष टॉमी, जे चार दिवस हिंदी महासागरात मृत्यूशी झुंज देत होते. हो तेच हे अभिलाष जे, वादळाने उसळता हिंदी महासागर, ५० फुटांच्या महाकाय लाटा, ताशी १३० किमी वेगाने वाहणार्‍या बेधुंद वार्‍यांशी एकट्यानेच झुंजत होते. एक शिडाची नौका वगळता दूरदूरपर्यंत कोणीच नाही ना कोणता आसरा. अशा परिस्थितीत ते महासागराशी दोन हात करत होते. याच अभिलाष यांच्याविषयी आज आपण ‘माणसं’ सदरात जाणून घेणार आहोत. अभिलाष टॉमी हे भारतीय नौसेनेतील लेफ्टनंट कमांडर या पदावर कार्यरत आहेत. आज वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे शौर्य ऐकून १३० कोट्यवधी भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो. तसेच अभिलाष यांनी साहसी क्षेत्रात ’न भूतो’ असे कार्य केले आहे.

 

अभिलाष यांचा जन्म केरळमधील चेथिपुझा येथे झाला. त्यांचे वडीलदेखील नौसेनेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साहजिकच लहानपणापासून अभिलाष यांना नौदलाचे प्रचंड वेड. त्यांच्या वडिलांनीदेखील त्यांची आवड लक्षात घेतली व शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना गोव्याच्या भारतीय नौदल अकॅडमीमध्ये दाखल केले. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अभिलाष २००० साली नौदलात भरती झाले. २००२ साली त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून नौसेनेचा पायलट म्हणून पात्रता पूर्ण केली. याच दरम्यान त्यांच्या डोक्यात एक अनोखा विचार चालू झाला. शिडाच्या बोटीतून जगाला प्रदक्षिणा घालायची, हे अनोखे स्वप्न त्यांना चैन पडू देत नव्हते. असा विचार भारतात सहसा कोणी केला नसेल. जगभरात असे थोडेफार प्रयत्न निश्चितच झाले होते. अखेर त्यांनी आपले स्वप्न सत्यात आणायचे ठरवले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सागरीमार्गाने पृथ्वीपरिक्रमा करायची म्हटल्यावर विशेष तयारी आणि प्रशिक्षण लागणार होते. ते त्यांनी पूर्ण केले.

 

अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी त्यांना पृथ्वीच्या सागरी परिक्रमेवर निघायचे होते. हजारो लोकांच्या शुभेच्छा घेऊन १ नोव्हेंबर, २०१२ रोजी ‘गेट वे ऑफ इंडिया’हून त्याच्या लाडक्या ‘म्हादेई’ बोटीबरोबर त्यांची सफर सुरू झाली. त्यांच्या मोहिमेचे नाव होते ‘सागर परिक्रमा २.’ पुढील सहा महिने त्यांना महासागराशी जुळवून घेऊन त्याच्याशीच दोन हात करावे लागणार होते. अतिवेगाने वाहणार्‍या वार्‍याला तोंड देऊन आणि सात-आठ मीटरपर्यंतच्या उंचीच्या महाकाय लाटांचा, वादळाचा सामना करून लहानशा नौकेवर तग धरणे आणि पुढे पुढे जात राहणे किती अवघड असेल, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अखेर ३१ मार्च, २०१३ हा दिवस उजाडला आणि अभिलाष यांनी एकट्याने आणि कोठेही न थांबता २३ हजार, १०० नॉटिकल मैलांची पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल १५१ दिवस अनेक देशांच्या सागरी हद्दी ओलांडत त्यांनी हा इतिहास घडवला. त्यांच्या याच पराक्रमाने त्यांनी भारतीय नौसेनेबरोबरच देशाचे नावदेखील उंचावले होते. याची दखल घेत २०१३ साली भारत सरकारने त्यांना ‘कीर्तिचक्र’ देऊन गौरविले होते. मात्र, अभिलाष यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही, तर खर्‍याअर्थाने सुरू झाला.

 

२०१८ मध्ये अभिलाष यांनी सागरी खलाशांसाठी प्रतिष्ठेची मनाली जाणारीगोल्डन ग्लोब रेस’ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत भाग घ्यायचे ठरविले. या स्पर्धेत कोणत्याही मदतीशिवाय एकट्याने प्रदक्षिणा घालावी लागते. अर्थातच, या स्पर्धेकडेजगातील सर्वात कठीण स्पर्धा म्हणून पाहिले जाते. १ जुलैपासून फ्रान्सच्या ‘ला सेब्ला दोलॉन’ येथून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. यात अभिलाष यांच्यासह जगातील १८ खलाशी सहभागी झाले होते. मात्र, अभिलाष यांचे दुर्दैव असे की, ८४ दिवसांत साडेदहा हजार सागरी मैलांचा प्रवास केल्यानंतर ते सागरी वादळाच्या तडाख्यात सापडले आणि दुसर्यांदा जग जिंकायचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. भविष्यात ते पुन्हा सागरी सफरीवर निघतीलही, पण त्यांनी जगभरातील तरुणाईसमोर एक आदर्श निश्चितच उभा केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊन उद्या हजारो अभिलाषसारखे सिकंदर तयार होतील, अशी आशा करायला हरकत नाही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat