आडाम मास्तरांवरील कारवाई प्रकरण : माधव भांडारी यांची टीका
महा एमटीबी   05-Mar-2019


सोलापूर : सोलापूर शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडाम उर्फ आडाम मास्तर यांना माकपने तीन महिन्यांसाठी पार्टीच्या मध्यवर्ती समितीतून निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन त्या दोघांचीही स्तुती केल्याचा अक्षम्य अपराधकेल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ही कारवाईकेली आहे. माकपची ही कारवाई म्हणजे कम्युनिस्टांच्या पोथीनिष्ठ असहिष्णुतेचे बेशरम प्रदर्शन असल्याची खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

 

त्यांनी सांगितले की, गेल्या ९ जानेवारी रोजी सोलापूर येथे ३०,००० विडी कामगारांच्या मालकीच्या घरांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. आयुष्यभर विडी कामगारांसाठी संघर्ष करणारे कम्युनिस्ट नेते नरसय्या आडाम या कार्यक्रमात व्यासपीठावर हजर होते. त्यांनी त्या सभेत भाषणही केले व विडी कामगारांच्या घरांचा हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे त्यांनी जाहीर कौतुकही केले. सोलापुरातील विडी कामगारांना त्यांची हक्काची घरे मिळवीत यासाठी आडाम मास्तर गेली तीन दशके संघर्ष करीत आहेत. ह्या कामगारांना पहिली १०,००० घरे श्रद्धेय अटलजी पंतप्रधान असताना मिळाली होती याचाही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला होता. आडाम मास्तर केवळ विडी कामगारांच्या मुद्द्यासाठी त्या व्यासपीठावर हजर होते व तसे त्यांनी स्पष्टही केले होते. तरीही माकपने ही कारवाई केली आहे.

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राजकीय आणि वैचारिक अस्पृश्यतेचा आग्रह धरते व अत्यंत निर्लज्जपणे अशी अस्पृश्यता आचरणातही आणते याचेच हे उघडे वागडे प्रदर्शन आहे अशी टिप्पणी माधव भांडारी यांनी केली, अशा प्रकारची राजकीय अस्पृश्यता मानणारी मनोवृत्तीच सार्वजनिक जीवनातील वैचारिक असहिष्णुतेला जन्म देते असे सांगून श्री. माधव भांडारी यांनी सांगितले की,अशा प्रकारची वैचारिक असहिष्णुता व अस्पृश्यता निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. या कारवाईमुळे आडम मास्तर यांचा मनाचा मोठेपणा तर माकपचा कोतेपणा दिसला. माकपच्या या कारवाईमुळे आडाम मास्तर हे व्ही. एस. अच्युतानंदन ते सोमनाथ चटर्जींपर्यंतच्या महनीय कम्युनिस्टांच्या रांगेत जाऊन बसले आहेत, असेही मत माधव भांडारी यांनी नोंदवले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat