मैत्री सागराशी...
महा एमटीबी   31-Mar-2019'The Academic Advisors' या संस्थेतर्फे पुण्यात आणि अन्य काही भागांत 'सागरमित्र' हा शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरवी प्लास्टिक संकलन करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला जातो आहे. मुलांचे सागराशी, म्हणजेच सध्याच्या प्लास्टिक प्रदूषणग्रस्त समुद्री परिसंस्थेशी भावनिक नातं जोडण्याचाही प्रयत्न यातून होतो आहे. त्या निमित्ताने उपक्रमाचे सहसंस्थापक विनोद बोधनकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.


 

प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची आणि पर्यावरणऱ्हासाची सद्यस्थिती काय आहे?

 

प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण ही आज एक जागतिक गंभीर समस्या बनली आहे. जगातल्या १९७ देशांमधून वर्षाला सुमारे ८० लाख टन प्लास्टिक समुद्रात सोडले जाते. साधारणत: तेवढेच मातीत मिसळले जाते आणि तेवढेच जाळून टाकले जाते. जगात वापरल्या जाणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी फक्त सात ते दहा टक्के प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण होते. उरलेले सगळे कचऱ्याच्या रूपाने परिसरातच पडून राहते. भारतात सद्यस्थितीला सुमारे २५ प्रकारचे प्लास्टिक घरांमध्ये वापरले जाते. प्लास्टिकचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही. त्याची फक्त झीज होऊन लाखो सूक्ष्मकण (Nano-particals) तयार होतात. ही खूप दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे आज जे समुद्रामध्ये आणि अन्य ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पडलेले दिसते, त्याचे पुढील काहीशे वर्षांनी सूक्ष्मकण तयार होतील, जे पर्यावरणाला, विशेषत: सागरी परिसंस्थेला अत्यंत घातक ठरतील. प्लास्टिकचे सूक्ष्मकण एकमेकांवर घासले जाऊन त्यांच्यात विद्युत-चुंबकीय ऊर्जा तयार होते. असे ऊर्जाभारीत सूक्ष्मकण पाण्यातील एकपेशीय वनस्पतींना (Phytoplankton) आकर्षित करतात, ज्यामुळे या वनस्पती मरतात. या एकपेशीय जलीय वनस्पतींचा पर्यावरण संतुलनात खूप मोठा वाटा आहे, ज्याबद्दल आपल्याला अजून पुरेसं गांभीर्य नाही. साधारणत: १९७५ पासून आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवले जात आहे की, 'झाडे तोडू नका, झाडे लावा,' इ... परंतु, हे फक्त जमिनीवरच्या हिरवळीबाबत झाले. जमिनीवरच्या वनस्पतींचा ऑक्सिजननिर्मितीतला वाटा ५० टक्केच आहे. उरलेला ५० टक्के ऑक्सिजन पाण्यातल्या एकपेशीय वनस्पती (Phytoplankton) निर्माण करतात. दुर्दैवाने, आपले याकडे फारसे लक्ष जात नाही. या एकपेशीय वनस्पती हा अन्नसाखळीचा पाया आहे. प्लास्टिकमुळे या अन्नसाखळीच्या पायालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी पाण्यावर प्लास्टिकचा थर तयार झाल्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही व त्यामुळे पाण्यातल्या वनस्पती मरतात. तसेच प्लास्टिकचे तयार झालेले सूक्ष्मकण या वनस्पतींना मारून टाकतात. प्लास्टिकचे करायचे काय, हा प्रश्न पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी प्लास्टिक जाळून टाकले जाते. गेल्या वर्षी दिल्लीत वायू प्रदूषणाचा कहर झाल्याने शाळा काही दिवस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यावेळी असे आढळले होते की, हवेत असणाऱ्या एकूण प्रदूषक कणांपैकी १० टक्के कण हे प्लास्टिक जाळल्यामुळे निर्माण झालेले होते.

 

'सागरमित्र' हा उपक्रम नेमका काय आहे?

 

'सागरमित्र' हा विद्यार्थ्यांकरवी प्लास्टिक संकलन करण्याचा आणि विद्यार्थ्यांचे सागराशी एक भावनिक नाते जोडण्याचा उपक्रम आहे. आपापल्या घरातले प्लास्टिक मुले शाळेतल्या संकलन केंद्रात जमा करतात आणि प्लास्टिक पुनर्चक्रीकरण करणाऱ्या कंपन्या ते घेऊन जातात. घरात जशी रद्दी एकत्र करून ठेवतो, तसेच प्लास्टिक एकत्र करून ठेवायचे आणि ते शाळेत घेऊन यायचे. 'सागरमित्र' ही कुठली सरकारला समांतर व्यवस्था नाही, तर मुलांमध्ये सागराशी मैत्रीचे संस्कार रुजवण्यासाठी उभी केलेली एक चळवळ आहे. 'सागरमित्र'च्या संस्कारामध्ये आम्ही चार बीजप्रश्न आणि त्यांची चार बीज उत्तरं मुलांच्या मनावर बिंबवतो -

 

. तुमचा देश कोणता?

उत्तर - समुद्र

. तुमचा जन्मदेश कोणता?

उत्तर - भारत (किंवा जो असेल तो)

. तुम्ही कोणत्या देशासाठी जबाबदार आहात?

उत्तर - त्या सर्व देशांसाठी जे माझा सागर प्रदूषित करतात.

. या परिवर्तनात सर्वात पहिला घटक कोणता बदलणार? आणि तो तुम्ही बदलू शकता का?

उत्तर - हा पहिला घटक म्हणजे माझे कुटुंब आहे, जे मी बदलू शकतो.

अशाप्रकारे या चार बीजप्रश्नांमधून आणि बीज उत्तरांमधून 'Think Globally Act Personally' हे तत्त्व आम्ही मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो.

 

या उपक्रमाचा जन्म कसा झाला?

 

या उपक्रमाचा जन्म २०१३ साली झाला. वास्तविक, मी प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येशी अगोदर फारसा जोडला गेलेला नव्हतो. इंद्रायणी नदीच्या काठी तुळापूर या ठिकाणी आमचा विश्वसंस्कृती आश्रम आहे, जिथे आम्ही अध्यात्मविषयात काही काम करतो. २००२ साली 'जलदिंडी' संस्थेच्या माध्यमातून पाणी प्रदूषणावर काम करणारे विश्वास येवले यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करताना आपल्या मुळा-मुठा, भीमा या नद्या किती प्रदूषित झाल्या आहेत, त्याचे प्रत्यक्ष आकलन होत गेले. या सगळ्याचा स्रोत नेमका कुठून आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी मी पुण्यात आलो. पुण्यात 'वसुंधरा स्वच्छता अभियान'चे काम करणारे अनिल गायकवाड यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षे वस्त्यांमध्ये जाऊन प्लास्टिकचा कचरा उचलण्याचेही प्रयोग केले. महानगरपालिकेबरोबर नालेसफाईची कामेही केली. मात्र, हे सर्व करत असताना घराघरांतून येणारा प्लास्टिकच्या कचऱ्याचा ओघ काही केल्या कमी होत नाही, हे लक्षात यायला लागले. हे सुरू असताना एड्स जनजागृतीबाबत काम करणाऱ्या सुझन राज यांच्याशी ओळख झाली. सुझन राज म्हणाल्या की, “प्रदूषण हा पृथ्वीला झालेला 'एड्स' आहे. त्याच्या निर्मूलनासाठी आपण काहीतरी भरीव काम केले पाहिजे.” आम्ही जेव्हा वाणोरी नाला साफ करत होतो तेव्हा अशी एक कल्पना डोक्यात आली की, लोक प्लास्टिक बाहेर फेकणारच नाहीत, अशी काही व्यवस्था आपल्याला करता आली तर? पण हे करणार कोण? या प्रश्नाची उकल करताना आमच्या डोळ्यासमोर विद्यार्थीवर्ग आला, जो रोज शाळेत एकत्र येतो. मग आपण शाळांमध्ये जर संकलन केंद्रे सुरू केली, तर विद्यार्थी आपापल्या घरचे प्लास्टिक शाळेत आणू शकतील आणि प्लास्टिक फेकून देण्याचे प्रमाण कमी होईल, अशी कल्पना सुचली. या कल्पनेतून पुढे 'सागरमित्र' उपक्रमाचा जन्म झाला.

 

हा उपक्रम सुरु झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या एकंदर वाटचालीविषयी काय सांगाल?

 

' The Academic Advisors' या संस्थेने २०११-१२ साली पुण्यातील एक शाळा आणि एका महाविद्यालायात ' Students Plastic Collection Centre' या नावाने हा उपक्रम सुरू केला. २०१३ साली मी उपक्रमाशी जोडला गेलो आणि उपक्रमाची पूर्ण जबाबदारी घेतली. त्याच वेळी त्याला 'सागरमित्र' हे नाव देण्यात आले. २०११-१२ साली हा उपक्रम सुरू केल्यापासून दुसऱ्याच वर्षी या उपक्रमाला १० शाळांमधील १० हजार विद्यार्थी जोडले गेले. १५० शाळांमधले सुमारे १ लाख, ३७ हजार विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. पुण्याव्यतिरिक्त जळगावमध्ये विशाल सोनकुल, तर कोट्टामध्ये सुझन राज हा उपक्रम चालवतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मोरोक्को आणि न्यूयॉर्कमध्येही हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमातून ओंकार गानू, विशाल सोनकुल असे अनेक ध्येयवेडे विद्यार्थी आम्हाला मिळाले, जे आता कार्यकर्ते म्हणून उभे राहिले आहेत.

 

लोकांनी प्लास्टिकचा वापर जास्तीत जास्त टाळणे, सरकारने प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे आणि पुनर्चक्रीकरणाची व्यवस्था जागोजागी निर्माण करणे यापैकी काय होणे जास्त महत्त्वाचे वाटते?

 

खरं तर, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. प्लास्टिकच्या वापराबाबत व्यापक लोकजागृती करण्याची गरज आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य नमूद केले पाहिजे. प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करण्याच्या अद्ययावत पद्धती विकसित होत आहेत. सरकारने पुनर्चक्रीकरण प्रकल्पांना आवश्यक ती मदत करायला हवी. आत्ता असलेल्या परिस्थितीत लक्षणीय बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा लोक जलस्रोताच्या संदर्भात आपली ओळख सांगायला सुरुवात करतील. म्हणजे केवळ 'मी पुण्यात राहतो' असे न सांगता 'मी कृष्णा नदीखोऱ्यात राहतो' असं सांगतील. अशा प्रकारची ' Water Identity' लोकांच्या मनात आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीत भिनली पाहिजेखनिज तेलातून पेट्रोल-डिझेल काढून घेतल्यावर उरलेल्या हायड्रोकार्बनपासून प्लास्टिक तयार होतं. अलीकडे अमेरिकेचे शेल ऑईलचे उत्पादन वाढले आहे. प्लास्टिक हेही खनिज तेलापासूनच बनवले जात असल्याने साहजिकच प्लास्टिकचे उत्पादनही अमेरिकेत तेवढ्या प्रमाणात वाढणार आहे. अमेरिका ते विकणार कुठे? साहजिकच आशियायी आणि आफ्रिकन देशांमध्ये. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा येत्या काळात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आपण या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो यावर आपल्या नद्या आणि समुद्राचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यात तांत्रिक उपाययोजना आणि प्रशासकीय निर्बंध यांचा वाटा फार फार तर २० टक्के राहील. 'माणसाच्या वर्तणुकीतला बदल' यावर ८० टक्के काम करण्याची गरज आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat