चिनूक - बस नाम ही काफी है!
महा एमटीबी   29-Mar-2019 

भारतीय वायुसेना फक्त लढाईत आणि सीमेवरच नव्हे, तर पूर-भूकंप अशा आपत्कालीन स्थितीतही कार्यरत असते. अशा मिशनमध्ये अचूक पद्धतीने लोकांना वाचवताना किंवा जीवनावश्यक सामग्री पोहोचवताना चिनूकचा वापर केला जाऊ शकतो.

 

भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या चौक्या हिमालयातील शिखरांपासून ईशान्येतील जंगलांपर्यंत, राजस्थानातील वाळवंटांपर्यंत पसरलेल्या आहेत. अशा ठिकाणी हत्यारे, दारुगोळा, अन्न-औषधे सगळं काही पुरवणे हे मोठं आव्हान असतं. वायुसेनेचे हेलिकॉप्टर पायलट हे आव्हान समर्थपणे पेलत असतात आणि यापूर्वी ‘मि-२६ हेलो’सारखे प्रचंड हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेने वापरले आहे. कमी फेऱ्यांमध्ये अधिक सामान घेऊन जाणे, कोणत्याही हवामानात उड्डाण करू शकणे आणि हिमालयीन पोस्टना रसद पुरवत असताना त्या उंचीवर समर्थपणे सामानाची ने-आण करणे सुलभ व्हावे यासाठी भारतीय वायुसेनेला भीमाची ताकद मिळाली आहे. ‘CH-४७ एफ चिनूक’ या ‘बोईंग’ने निर्माण केलेल्या हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरची खरेदी दीड बिलियन डॉलर्सच्या कराराद्वारे भारताने केली आहे आणि ज्या बाबतीत आजवर रशियन सामग्रीचा बोलबाला होता तिथं अमेरिकेने प्रवेश केला आहे. अर्थात, टाटा अँडव्हान्स सिस्टीमच्या माध्यमातून भारतीय खासगी उत्पादन क्षेत्रही यात सामील आहे.


 
 

या हेलिकॉप्टरचे प्रथम उड्डाण १९६२ साली झाले आणि व्हिएतनाम युद्धात याचा वापरही झाला. पण हे दोन रोटर आणि दोन इंजिनचे हेलिकॉप्टर आता खूप अपग्रेड झालेले आहे. खुद्द अमेरिकन वायुसेना ते २०६० पर्यंत वापरत राहण्याची शक्यता आहे. जगभरात १९ देशांमध्ये सुमारे ९०० चिनूक वापरली जातात, ज्यापैकी अर्धी विविध अमेरिकन संरक्षण दले वापरतात. युके, जपान, कोरियासारखे देश हे हेलिकॉप्टर वापरत आहेत. भारतीय वायुसेनेकडे ४ चिनूक आली असून, २०२० पर्यंत १५ चिनूक डिलिव्हर होणे अपेक्षित आहे. ९.५ टन सामग्री घेऊन ३०० किमी प्रतितास वेगाने हे हेलिकॉप्टर प्रवास करू शकते. विविध हवामान किंवा मिशन परिस्थितीत हे सक्षमपणे काम करू शकते. चिनूक सामानाबरोबरच ४५-५० सैनिक घेऊन जाऊ शकते आणि अतिशय गुंतागुंतीच्या ‘फ्लाईट पॅटर्न’ना ‘डिजिटल अँडव्हान्स फ्लाईट कंट्रोल सिस्टीम’चा वापर करून साध्य करू शकते. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये चिनूक वापरलेल्या पायलट्सने पायलट्सनी या प्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भारताने हल्लीच घेतलेली ‘एम-७७७ लाईट हॉवित्झर’ तोफ चिनूकद्वारे सीमावर्ती भागात चपळाईने पोहोचवली जाऊ शकते आणि तोफखाना विविध ठिकाणी तैनात करताना याचा उपयोग होऊ शकतो. जवळपास १० टन सामान अंडर स्लन्ग पद्धतीने म्हणजे लटकवून नेले जाऊ शकते.

 

 
 

भारतीय वायुसेना फक्त लढाईत आणि सीमेवरच नव्हे, तर पूर-भूकंप अशा आपत्कालीन स्थितीतही कार्यरत असते. अशा मिशनमध्ये अचूक पद्धतीने लोकांना वाचवताना किंवा जीवनावश्यक सामग्री पोहोचवताना चिनूकचा वापर केला जाऊ शकतो. अतिशय छोट्या भागावर हॉव्हर करत राहताना चिनूकचा वैमानिक एक-एक फुटाच्या नेमकेपणाने जागा निर्धारित करू शकतो. त्यामुळे छोटी शिखरे, बिल्डिंगची गच्ची अशा ठिकाणी मदत देण्यासाठी चिनूक परिणामकारक ठरेल. मोठ्या मालवाहू विमानांच्या श्रेणीत भारतीय वायुसेना ‘सी १७ ग्लोबमास्टर’ आणि ‘सी १३० हर्क्युलिस’ ही अमेरिकन विमाने वापरत आहेच आणि चिनूक बरोबरच आता भारतीय वायुसेनेला उत्सुकता आहे, आणखी आक्रमक हेलिकॉप्टरची.

 
- चिन्मय भावे 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat