एक होतं ग्रंथालय...
महा एमटीबी   27-Mar-2019१२० वर्षे जुनी असलेली व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार,नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरूण भारत’ने घेतलेला हा मागोवा..

मराठी वाड़्मय आणि संदर्भग्रंथांची पंढरी मानल्या गेलेल्या, इतकेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानल्या गेलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयया एकेकाळच्या वैभवशाली संस्थेची आजची अवस्था पाहून अनेक साहित्य-कलाप्रेमी हळहळ व्यक्त करतात. संस्थेची आजची अवस्था पाहिली तर ज्या उद्दिष्टाने संस्था स्थापन झाली, त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काही होण्याऐवजी राजकारणाचा अड्डा म्हणून संस्थेचा वापर होत असल्याची भावना संस्थेचे हितचिंतक व्यक्त करतात. संस्थेचे उपक्रम, सांस्कृतिक आदानप्रदान इ. पेक्षा संस्थेतील गैरव्यवहारांचे, भ्रष्टाचारांचे, पदाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचे आरोपच वृत्तपत्रातून अग्रक्रमाने झळकताना दिसतात. शिवाय, कर्मचाऱ्यांचे वेतनाचे असंख्य प्रश्न, जीर्ण इमारतींचे प्रश्न यामुळे या भकासपणात आणखी भर पडताना दिसते.

 

मुकुंद बाळकृष्ण गुर्जर, नरहर महादेव जोशी, श्रीधर बाळाजी मोडक, अनंत नीळकंठ पिठकर, विनायक बळवंत जोशी, नारायण कृष्णा गद्रे, शंकर हरी शेजवलकर, नारायण महादेव बाक्रे, विठ्ठल वासुदेव टिल्लू, गणेश लक्ष्मण पागे, अंबादास गोपाल पुणतांबेकर या संस्थेच्या संस्थापकांच्या दूरदृष्टीमुळे साहित्याचं एक वैभव आपल्याला उपलब्ध झालं. केवळ ३०० पुस्तकांसह ठाकुरद्वार येथे १८९८ मध्ये संस्था स्थापन झाली. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांच्या देणगीतून ही इमारत उभी राहिली. लोकमान्य टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे आदींनी संस्थेच्या विकासात, विस्तारात आपलं योगदान दिलं. संस्थेची गेल्या चाळीसेक वर्षांची वाटचाल जवळून पाहणाऱ्या एका साहित्यप्रेमी अभ्यासकाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थेच्या सुरूवातीच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेंद्र गावस्कर, मनोरमा फडके, वा. वि. भट, माधव गडकरी, विद्याधर गोखले, नरेंद्र पाटील आदी दिग्गजांनी संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

 

या साऱ्याचा परिणाम म्हणून संस्था आणि संस्थेच्या संलग्न शाखांच्या माध्यमांतून संस्थेचे कार्य बहरले. महानगरपालिकेनेही विश्वासाने आपली वाचनालये संस्थेला चालवायला दिली. नायगावसारख्या मोक्याच्या जागी एक भव्य वास्तू उभी राहिली. व्याख्यानमाला, नाट्य-वक्तृत्व-निबंध स्पर्धा सुरू झाल्या. महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेल्या या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला अचानक काहीसे ग्रहण लागले आणि त्यानंतर या वैभवाला उतरती कळा लागत असल्याचे चित्र निर्माण झालं. ही उतरती कळा का आणि कशी लागली असावी?

 

वादांचे परिणाम संस्थाकार्यावर

संस्थेचे पदाधिकारी, त्यांच्याशी संबंधित वेगवेगळे वाद, आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचार-गैरव्यवहाराची प्रकरणं, कर्मचाऱ्यांचे व वास्तूंचे प्रश्न यामुळे संस्थेच्या दैनंदिन कार्यावरही बरा-वाईट परिणाम होतोच. हेमंत व्याख्यानमाला, फिरत्या वाचनालयाचा प्रयोग, गुंजीकर व्याख्यानमाला, आंतर भारतीय केंद्र, कला मंडळ, रवींद्र भारती शाखा, महाराष्ट्र प्रबोधन विभाग असे संस्थेचे अनेक चांगले उपक्रम आज चक्क बंद अवस्थेत आहेत. सेनापती बापट व्याख्यानमालेसारख्या काही उपक्रमांचा अपवाद वगळता संस्थेचे बहुतेक उपक्रम हे एकतर बंद अवस्थेत आहेत, नाहीतर आचके देत आहेत.

 

साहित्यकारण महत्वाचे की अर्थकारण?

संस्थेतील साहित्यविषयक बाबींपेक्षा संस्थेच्या अर्थकारणाचीच चर्चा अधिक होताना दिसते. संस्थेच्या मोक्याच्या जागी असलेल्या मालमत्ता, त्यातही नायगावसारख्या अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या जागेमुळे असेल कदाचित. परंतु, या सर्वात संस्थेच्या काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांनाही साहित्यकारणापेक्षा अर्थकारण महत्वाचे वाटू लागले असल्याचा आरोप ग्रंथालय बचाव समितीतील एका सूत्राने केला. शारदा टॉकीजचे प्रकरण, रद्दी प्रकरण, संस्थेच्या इमारत बांधणी, दुरूस्ती, त्यांचा खर्च आदींच्याच चर्चा अधिक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

असे का घडते?

वास्तविक, ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या संस्थेच्या विश्वस्त. शरद पवार हे १९९२ पासून सलगपणे संस्थेचे अध्यक्ष आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले, सलग दहा वर्षे केंद्रीय मंत्रिपद भूषवले. सलग पंधरा वर्षे पवारांचा पक्ष राज्यात सत्तेत होता. असे अध्यक्ष आणि विश्वस्त संस्थेला लाभूनही संस्थेची अशी दुरवस्था का व्हावी? स्वतः शरद पवार यांनी संस्थेला २८ वर्षांत एकदाच भेट दिली, असेही ग्रंथालय बचाव कृती समितीतील सूत्रांनी सांगितले.

 

उत्तरे देण्यास टाळाटाळ

संस्थेची उद्दिष्टे आणि संस्थेची प्रत्यक्ष अवस्था याबाबत संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न दै. ‘मुंबई तरूण भारत’ने केला. यावेळी संस्थेचे कार्यवाह हेमंत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘प्रमुख कार्यवाहांशी संपर्क करा’ असे उत्तर दिले. प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी संस्थेचे वर उल्लेखलेले उपक्रम बंद असल्याची कबुली दिली. मात्र, हे का व कसे, याबाबत स्पष्ट माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat