रुदनाची नि:शब्द भाषा
महा एमटीबी   26-Mar-2019
रूदन जसे दुसऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करतेच, तसे जी व्यक्ती रडत असते तिलाही रडल्यानंतर बरे वाटते. जे लोक अतीव अडचणीच्या काळात रडतात, त्यांना आपले मन मोकळे करता येते. किंबहुना, रडल्यानंतर आपले मन हलके झाले असे त्यांना आवर्जून वाटते. अर्थात, रडू आवरणाच्या व्यक्तींची भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी असते असेही म्हणता येत नाही. पण, मनापासून रडणाऱ्या व्यक्तींना रडण्याची प्रक्रिया हृदयाजवळची वाटते. काही लोकांना रडल्यानंतर आपले मनोबल वाढले असे वाटते. काहींना आपला मूड जास्त सकारात्मक झाला आहे असेही वाटते. रडण्यातून जेव्हा मनीची कथा आणि हृदयाची व्यथा व्यक्त होते, तेव्हा त्या रडण्याला एक दुर्बोध अर्थ असतो.


माणूस म्हणून आपण भावनिकदृष्ट्या तसे उत्कटच असतो. या उत्कट अनुभवातून आपण आपल्या भावनांचे प्रकटीकरण करत असतो. अर्थात, हे प्रकटीकरण सहज असते. जे नैसर्गिक भासते ते आपण व्यक्त करत आहोत, याची जाणीव व्यक्तीला बहुधा नसतेच. भावनांची अभिव्यक्ती ही जितकी जैविक आहे, तितकीच ती सामाजिक व सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे. आपण भावना का, कधी व कशा व्यक्त करायच्या याची नैसर्गिक शिकवण आपल्याला जवळ जवळ जन्मल्यापासूनच मिळत असते. लहान मूल आपल्या मनातला तणाव, लागलेली भूक वा गैरसोय व्यक्त करताना रडते. किंबहुना, त्यांचा रडण्यामुळेच त्याच्याकडे मोठ्या मंडळीचे लक्ष जाते व त्याला भूक लागली असेल का किंवा त्याला काही दुखत-खुपत असेल का याविषयी गंभीर चर्चा वा मनन मोठी मंडळी करतात. अर्थात, या बालपणीच्या रूदनाची निरागस प्रक्रिया प्रौढ मंडळींमध्येसुद्धा दिसून येते. प्रौढांमध्ये रूदन एकंदरीत प्रगल्भ दिसायला हवे. पण, ते बाळबोधही असू शकते. अनेक परिस्थितीमध्ये केवळ रूदनामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल कुटुंबीय वा मित्रमंडळीमध्ये नैतिक व भावनिक आधार निर्माण झालेला दिसून येतो. कदाचित ही मंडळी रडली नसती, तर इतरांना त्यांच्याबद्दल कणव व मदतीची भावना निर्माण झाली नसती. खरे तर काही लोकांमध्ये रडण्याची क्रिया ही त्यांची विपरित परिस्थितीमध्ये कळत-नकळत मदत वा सहानुभूती मिळविण्यासाठी केलेल्या डावपेचाचा एक भाग असू शकतो. कित्येक वेळा वादविवाद चालू असताना किंवा किचकट प्रसंग घडत असताना काही व्यक्तींच्या अचानक रडण्याच्या कृतीमुळे वादविवाद लवकर मिटतात किंवा समस्येचे उत्तर शोधण्यासाठी इतर लोक आवर्जून प्रयत्न करतात. कारण, त्यांच्या रडण्याच्या कृतीने दुसऱ्या व्यक्तीच्या मनात आपण या व्यक्तीला का रडवितो आहोत, याबद्दल अपराधीपणाची भावना तरी निर्माण होते वा अनुकंपा तरी निर्माण होते.

 

ती इतकी ओक्साबोक्शी रडत होती ना की माझ्या मनात खूप राग होता पण, मी काही बोललोच नाही.’ “तिला रडताना पाहिले आणि माझे हृदय द्रवले.” “तिचे रडणे पाहिले आणि मी पुरता हादरून गेलो.” आपण अशा रडण्याबद्दलच्या प्रतिक्रिया सामान्यपणे ऐकत असतो. अर्थात, स्त्रियांच्या रडण्याबद्दलच्या या प्रतिक्रिया असल्या तरी, पुरुषांनाही रडू येते हे सत्य आहे. पण, स्त्रियांचे रडणे समाजाने भावूकपणे स्वीकारले आहे. स्त्रीला वेदना शब्दात व्यक्त करता येत नाही, हे सामजिक निरीक्षण आहे. पण, तिची भावूकता तिच्या अश्रूतून व्यक्त होते. हे सर्वमान्य रडू हे प्राथमिकत: माणसाच्या दु:खाचा आणि व्यथेचा एक भरवशाचा संकेत आहे. हा संकेत शब्दाविना जरी असला तरी, त्यात मदतीचा हात मिळवा म्हणून होणारी इतरांची धडपड त्यात अभिप्रेत आहे. कित्येक वेळा रूदनाच्या प्रसंगामुळे अपरिचित माणसाच्या मनातसुद्धा एकप्रकारचा मानवी दुवा जुळून येतो, कळवळा निर्माण होतो. दुसऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी अनोळखी मनसुद्धा तयार होते. कित्येक मदतीचे हात पुढे येताना दिसतात. कुठे भूकंप झाला किंवा पुराचे उधाण आले की तिथल्या त्रस्त माणसांचे अश्रू पाहत माणुसकीचा, मदतीचा ओघ तिथे वाहताना दिसू लागतो.

 

रूदन जसे दुसऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करतेच, तसे जी व्यक्ती रडत असते तिलाही रडल्यानंतर बरे वाटते. जे लोक अतीव अडचणीच्या काळात रडतात, त्यांना आपले मन मोकळे करता येते. किंबहुना, रडल्यानंतर आपले मन हलके झाले असे त्यांना आवर्जून वाटते. अर्थात, रडू आवरणाच्या व्यक्तींची भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी असते असेही म्हणता येत नाही. पण, मनापासून रडणाऱ्या व्यक्तींना रडण्याची प्रक्रिया हृदयाजवळची वाटते. काही लोकांना रडल्यानंतर आपले मनोबल वाढले असे वाटते. काहींना आपला मूड जास्त सकारात्मक झाला आहे असेही वाटते. रडण्यातून जेव्हा मनीची कथा आणि हृदयाची व्यथा व्यक्त होते, तेव्हा त्या रडण्याला एक दुर्बोध अर्थ असतो. त्यात एक प्रामाणिक तथ्य असते. त्या रडण्याच्या सत्त्यात मानवी दर्द व्यक्त करण्याची ताकद असते. ते गंभीर रूदन इतरांच्या हृदयाला स्पर्श करत असते. मनाच्या स्वच्छ पटलावर उमटलेले रूदन खरे तर निसर्गाच्या सुंदर अस्तित्वाचा अंश आहे. या रूदनातून कित्येक नाती जन्मली, कित्येक नाती नव्याने उमगली आणि उमलली. कित्येक नाती वाचली आणि टिकली. रूदन कधीकधी व्यथित करणारे असेलही, पण, तरीही त्यातून व्यक्त होणारी मानवी भाषा मात्र ज्याला समजली, तर त्या माणसाला माणसातला खरा माणूस समजला. अर्थात, रूदन सत्य आणि प्रामाणिक मात्र असायला हवे...

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat