होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१२
महा एमटीबी   25-Mar-2019अत्याधुनिक उपकरणे हल्ली जशी वरदान आहेत तशीच ती शापदेखील आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक यांच्या अतिवापरामुळे अतिप्रमाणात टीव्ही पाहण्यामुळे निद्रानाश होऊ शकतो.


होमियोपॅथीक तपासणी करत असताना रुग्णाची सर्वसाधारण लक्षणेही (general symptoms)नीट समजून घेतली जातात. इतर सर्व माहिती घेताना रुग्णाच्या निद्रेविषयी माहिती घेणे उपयुक्त असते. कारण, निद्रेमुळे माणूस ताजातवाना होतो. निद्रेमुळे माणसाची ऊर्जा व शक्ती चांगली हाते. परंतु, असे दिसून येते की, काही लोकांना या निद्रेविषयी बऱ्याच तक्रारी असतात. त्यामुळे निद्राविषयक विविध लक्षणांची माहिती घेणे हे फार महत्त्वाचे ठरते.

 

यामध्ये १) काही लक्षणे व तक्रारी या रात्री किंवा झोपेमध्ये वाढतात. त्यामुळे त्याचा झोपेवर थेट परिणाम होतो. उदा. एखाद्या रुग्णाचा दमा रात्री झोपल्यानंतर चाळवतो, बिछान्यावर आडवे झाल्यावरच एखाद्या रुग्णाला खोकला चालू होतो किंवा झोपल्यामुळे काही लक्षणे वाढतात किंवा कमी होतात हे पाहिले जाते.

 

) झोपेची काही विशिष्ट पद्धत आहे का किंवा स्थिती आहे का, हे विचारले जाते. काही लोक पाठीवर झोपतात, तर काहींना पालथे, पोटावर झोपल्यामुळेच नीट झोप येते.

 

) तसेच झोपण्याची वेळ व उठण्याची वेळ

 

) झोपेचा प्रकार म्हणजेच गाढ झोप लागणे, झोपेमधील चुुळबुळ व अस्वस्थ झोप, झोपेत अडथळा येणे किंवा छोटीशी डुलकी लागणे व नंतर झोपच न येणे इत्यादी प्रकार.

 

) काही लोकांना सतत मूत्रविसर्जनासाठी उठावे लागते. त्यामुळेही झोपेवर परिणाम होतो. अशा काही लक्षणांमुळे रुग्णाला झालेल्या आजाराचीही माहिती मिळते.

 

) याचबरोबर काही रुग्ण झोपेत बोलतात, चालतात, शिवाय काहींमध्ये दात चावणे, लाल गळत राहाणे, भरपूर घाम येणे अशी लक्षणे झोपेमध्ये दिसून येतात. काही लोक झोपत नाहीत. पण, सतत जांभई देत राहतात. अशी काही लक्षणे रुग्णांमध्ये दिसली, तर ती लगेच नोंद करून ठेवली जातात.

 

) हल्लीच्या काळामध्ये निद्रानाश (sleeplessness) ही एक मोठी व्याधी अनेक लोकांना जडली आहे. दिवसभर कितीही मेहनत केली किंवा श्रम करून थकलेले असले तरी, काही लोकांना नीट झोप लागत नाही किंवा अजिबातच झोप येत नाही. निद्रानाश होण्यामागील कारणांचा शोध हा होमियोपॅथीक तपासणीमध्ये घेतला जातो.

 

अत्याधुनिक उपकरणे हल्ली जशी वरदान आहेत तशीच ती शापदेखील आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक यांच्या अतिवापरामुळे अतिप्रमाणात टीव्ही पाहण्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. त्याचबरोबर सर्वात मोठे कारण म्हणजे, माणसालाअसलेल्या चिंता, काळजी, ताणतणाव, भावनिक समस्या, इ. कारणांमुळे झोप लागत नाही. होमियोपॅथीमध्ये या सर्व समस्यांचे मूळ जाणून घेऊन मग त्यांच्यावर इलाज केला जातो. झोपेमध्ये पडणारी स्वप्नेफ हीसुद्धा माणसाच्या मनाचा व मानसिक स्थितीचा (sub-conscious mind) अभ्यास करण्यासाठी फार महत्त्वाची असतात. बऱ्याच वेळा माणूस प्रत्यक्षात जे करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, त्याचे स्वप्न त्याला दिसते किंवा काही स्वप्ने ही प्रतीकात्मक (symbolic) असतात पण, त्या स्वप्नामागची मानसिक स्थिती किंवा त्यामागची रुग्णाची संवदेना जाणून घेणे उपयोगाचे असते. कारण, तीच त्याची मुख्य संवदेना (feeling) असते. माणसाच्या अंतर्मनाचा अभ्यास करण्यासाठी या स्वप्नांचा फार उपयोग होतो. म्हणूनच होमियोपॅथीक तपासणीच्या वेळी जेव्हा चिकित्सक स्वप्नांबद्दल विचारतात तेव्हा काही लोकांना हा प्रश्न विसंगत वाटतो. परंतु, तसे नसते. म्हणूनच रुग्णांनी याबद्दल संपूर्ण माहिती चिकित्सकांना द्यावी. पुढील भागात याच सर्वसाधारण लक्षणांविषयी आपण जाणून घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat