संधीसाधू महाभेसळ आघाडीसाठी लोहियांचे ‘अनुयायी’ बेचैन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्लॉगद्वारे विरोधकांवर निशाणा

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी दिवंगत समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीदिनी ब्लॉग लिहून श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तसेच गोवा मुक्ती आंदोलनातील लोहियांच्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. सोबतच आजच्याच दिवशी भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती, त्याची आठवण करत मोदींनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पंतप्रधानांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून काँग्रेससह समाजवादी दलांवरही निशाणा साधला. जे लोक आज डॉ. लोहियांच्या सिद्धांताचा छळ करत आहेत, तेच लोक उद्या जनतेचाही छळ करतील, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

 

डॉ. लोहिया की याद में...शीर्षकाने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मोदींनी लिहिले की, जे लोक डॉ. लोहियांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा दावा करतात, तेच त्यांचा अपमान का करत आहेत? शिवाय डॉ. लोहिया संसदेच्या सभागृहात वा बाहेरही बोलत असले तरी काँग्रेसध्ये भिती निर्माण होत असे, असेही मोदी म्हणाले. डॉ. लोहिया यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देत आहे, असे सांगत मोदींनी लिहिले की, लोहियांनी कृषिक्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी तथा अन्नदात्यांच्या सशक्तीकरणासंदर्भाने खूप काही लिहिले आहे. लोहियांच्या याच विचारांच्या अनुरुप रालोआ सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, कृषी सिंचन योजना, मृदा कार्ड आणि अन्य योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करत आहे, असेही मोदींनी आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले.

 

डॉ. राम मनोहर लोहियांवर लिहिलेल्या ब्लॉगमधून काँग्रेसवर टीकास्त्र सोडत मोदी म्हणाले की, देशासाठी काँग्रेस किती घातक झाली आहे, हे डॉ. लोहियांनी ओळखले होते. म्हणूनच १९६२ साली त्यांनी ठामपणे सांगितले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात कृषी असो वा उद्योग वा सैन्य कोणत्याही क्षेत्रात काहीही सुधारणा झाल्या नाहीत. दुसरीकडे, विरोधकातील अन्य पक्षांबाबत मोदींनी लिहिले की, आज काँग्रेसबरोबर तथाकथित लोहियावादी पक्ष संधीसाधू महाभेसळ आघाडी करण्यासाठी बेचैन आहेत. ही विडंबना हास्यास्पद आणि निंदनीय आहे. सोबतच मोदींनी असेही म्हटले की, डॉ. लोहिया वंशवादी-घराणेशाहीचा पुरस्कार करणार्‍या राजकारणाला लोकशाहीसाठी घातक समजत असत. पण आजची या पक्षांची अवस्था पाहून ते नक्कीच हैराण झाले असते, कारण त्यांच्या अनुयायांसाठी देशहितापेक्षाही आपल्या कुटुंबियांचेच हित सर्वोपरी झाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@