गोंयच्या संस्कारांचा ‘मनोहर’ आविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |



पर्रिकर महान होतेच. पण, गोमंतकीयांना ते कधी तेवढे महान वाटले काय? कदाचित नाही. कारण, त्यांच्या लेखी ते त्यांच्यातीलच एक होते. ‘आपला माणूस’ वाटत होते. त्यांच्यासारखे वागणारे पर्रिकर गोव्यात तेच एकटे होते असे नाही. असे अनेक पर्रिकर आजही गोव्यात आहेत आणि त्याचे एकमेव कारण त्यांच्यावर गोमंतकीय लोकजीवनाचे नकळत झालेले संस्कार.


२००६ मध्ये भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन जेव्हा मुंबईच्या लीलावती रुग्णालयातच एकदा मृत्यूला हुलकावणी देऊन अल्पकाळासाठी परत आले, तेव्हा मला ‘नचिकेत’ या पौराणिक पात्राचे स्मरण झाले होते. तसेच स्मरण मला मनोहर पर्रिकर अमेरिकेतून परत आले तेव्हाही झाले होते. प्रमोद महाजन काय किंवा मनोहर पर्रिकर काय, मला त्या त्या वेळी ‘नचिकेता’चे आधुनिक अवतारच वाटले होते. कठोपनिषदात नचिकेताची कथा आहे. ती अशी की, त्याच्या पित्याने त्याला यमराजाला दान दिले. पित्याची आज्ञा प्रमाण मानून तो यमराजाकडे गेला. तेथे पोहोचण्यासाठी त्याला अखंड भ्रमंती करावी लागली. पण, त्याचा निर्धार पक्का होता. यमाच्या दारावर पोहोचल्यानंतर तेथील रक्षकांनी त्याला रोखले व येण्याचे प्रयोजन विचारले. त्याने पित्याची आज्ञा त्यांना सांगितली. यमराज बाहेर गेल्याने त्यांची वाट पाहण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. तो पाहून दरबारात परतलेले यमराज प्रसन्न झाले व त्यांनी त्याला आत बोलावले. कशासाठी आलास, याची विचारपूस केली. त्याने पित्याच्या आज्ञेची माहिती त्यांना दिली. त्याची पितृनिष्ठा पाहून प्रसन्न झालेल्या यमराजांनी त्याला तीन वर मागण्यास सांगितले. त्याचे दोन वर मंजूर केल्यानंतर यमराजाने तिसरा वर विचारला. त्याने आत्म्याचे गूढ सांगावे, असा वर मागितला. यमराज म्हणाले, “मलाही ते माहीत नाही.” त्याची बुद्धिमत्ता पाहून त्यांनीच त्याला ज्ञानप्राप्ती करण्यास सांगून परत पाठविले. कथा इथे संपते. एका वर्षापूर्वी जेव्हा पर्रिकरांची तब्येत ‘गोमेका’मध्ये तपासण्यात आली तेव्हा त्यांना कोणतातरी गंभीर आजार असावा, अशी डॉक्टरांना शंका आली. अधिक तपासणीसाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे आजाराचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पर्रिकरांना गोव्यात परतण्यास मनाई केली. पण, प्रकृती चिंताजनक असतानाही आपण तयार केलेले राज्याचे अंदाजपत्रक विधानसभेत जाऊन मांडण्याचा हट्ट त्यांनी धरला व डॉक्टरांनीही काही अटींवर त्यांना परवानगी दिली. त्यानंतर स्वास्थ्यासाठी मुंबई, न्यूयॉर्क, नवी दिल्ली, गोमेका अशी त्यांची भटकंती सुरूच होती. मृत्यूशी झुंजण्याचा निर्धारही पक्का होता. जणू काय या सर्व भटकंतीत पर्रिकर ‘नचिकेता’चीच भूमिका वठवित होते. पण, शेवटी नियतीने ‘नचिकेता’वर मात केली आणि पर्रिकर सर्वांसमोर गंतव्यस्थानी रवाना झाले.

 

पण, या एक वर्षाच्या काळात त्यांची अवस्था ‘नचिकेता’पेक्षा फार वेगळी नव्हती. त्यांच्या कथित ‘हितचिंतकां’नी त्यांच्या प्रकृतीबद्दल जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या वावड्या उठविल्या. श्रद्धांजली सभेचे आयोजन करणे तेवढे बाकी ठेवले होते. पण, पर्रिकर त्या सर्व वावड्यांना पुरून उरले. कारण, गोमंतकीयांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या जाण्याची वेळ आली, तर आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आणि लोकसेवेचा आपला निर्धार जोवर कायम आहे, तोवर कुठलीही शक्ती आपल्याला कुठेही नेऊ शकणार नाही, या भावनेने त्यांनी गंभीर आजाराशी संघर्ष करण्याचा निर्धार केला आणि त्यानुसार न्यूयॉर्क, मुंबई, दिल्ली वा गोमेकातील रुग्णशय्येवरूनही गोमंतभूमीशी, इथल्या लोकांशी, सहकाऱ्यांशी असलेला संबंध आणि संपर्क खंडित होऊ दिला नाही. आधुनिक संवादतंत्राच्या साहाय्याने ते आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करीतच राहिले. पण, शेवटी अमेरिकेतून संवाद साधणे आणि प्रत्यक्ष गोव्यात येऊन कार्यरत होणे यात फरक होताच. मात्र, गोव्यात येऊन त्यांनी तोही दूर केला. सत्कार्य करण्याचा माणसाचा निर्धार पक्का असेल, तर तो कितीही गंभीर अडचणींवर मात करू शकतो, हे ‘पौराणिक नचिकेता’प्रमाणे या ‘आधुनिक नचिकेता’ने दाखवून दिले. हा अनुभव प्रत्येक गोमंतकीयांसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पदच आहे. भारतीयांसाठी एवढ्यासाठी म्हणायचे की, देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या निर्धारपूर्ण कार्यशैलीचा ठसा देशवासीयांवर उमटविला होता आणि केवळ गोमंतकीयांच्या सेवेसाठीच त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपदही अगदी सहजपणे सोडले. या ठिकाणी असेच उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या उत्तरप्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. पर्रिकरांसारख्याच गंभीर आजाराने त्यांनाही ग्रासले होते. प्रकृती क्षीण झाली होती. डोक्यावरचे सर्व केस गळून पडले होते. पण, रामभाऊंनी आजाराशी लढण्याचा निर्धार ढळू दिला नाही. काळाला परतवून आलेले तेच राम नाईक आता उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. देशाचे पेट्रोलियम व रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा आजही गौरवपूर्ण उल्लेख होतो. अर्थात, अशा पद्धतीने काळाला परतवून लावणारे एकटे मनोहर पर्रिकर किंवा राम नाईकच नाहीत. आपल्या भोवतालीही असेच ‘नचिकेता’चा कित्ता गिरविणारे अनेक भारतीय नागरिक असतील. त्यांच्या जगण्याच्या निर्धाराला प्रणामच करायला हवा.

 

पर्रिकरांच्या निधनानंतर संपूर्ण गोव्यात, महाराष्ट्रात आणि देशातही प्रकट झालेली हळहळ त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी आहे. त्यांच्या निधनानंतर विविध वृत्तवाहिन्यांवर झालेल्या चर्चांमधून त्यांच्या वेगळेपणाची, साधेपणाची आणि पारदर्शकतेची भरपूर प्रशंसा झाली व ते या प्रशंसेस पात्र आहेत याबद्दल वाद नाही. पण, पर्रिकरांसारखी माणसे सहजासहजी घडत नाहीत. स्वाभाविकपणे मग त्यांना घडविणाऱ्यांकडे लक्ष जाते. मला वाटते त्यांना त्यांच्या मातापित्यांनी, परिवाराने तर घडविलेच पण, त्यांच्या जडणघडणीचे श्रेय गोमंतकीय लोकजीवन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार यांना द्यावे लागेल. कारण, या दोन संस्थांच्या संयुक्त संस्कारांतून पर्रिकरांसारखीच माणसे घडू शकतात. गोमंतकीय लोकजीवनाच्या संस्कारातून त्यांनी साधेपणा, प्रांजळपणा, अनौपचारिकता यासारखे गुण घेतले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रभक्ती, अनुशासन, त्यागभावना, लोकहितैशी वृत्ती यांचे धडे घेतले व अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे पालनही केले. पर्रिकर महान होतेच. पण, गोमंतकीयांना ते कधी तेवढे महान वाटले काय? कदाचित नाही. कारण, त्यांच्या लेखी ते त्यांच्यातीलच एक होते. ‘आपला माणूस’ वाटत होते. त्यांच्यासारखे वागणारे पर्रिकर गोव्यात तेच एकटे होते असे नाही. असे अनेक पर्रिकर आजही गोव्यात आहेत आणि त्याचे एकमेव कारण त्यांच्यावर गोमंतकीय लोकजीवनाचे नकळत झालेले संस्कार. गोव्याबाहेरच्या लोकांना असे वाटत असेल की, तेथे हिंदू आणि कॅथलिक यांच्यात तणाव आहे. मराठी व कोकणी या कथित वादाच्या बातम्या तर त्यांच्यापर्यंत सातत्याने पोहोचत असतात. पण, या कथित विवादांचा गोमंतकीय लोकजीवनावर यत्किंचितही परिणाम होत नाही. त्यांच्यात मतभेद जरूर असतील पण, मनभेद मात्र अजिबात नाहीत. हे मी माझ्या पाच वर्षांतील गोव्यामधील वास्तव्यात मला आलेल्या अनुभवांवरून म्हणू शकतो. त्या संस्कारांनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचा परिसस्पर्श झाला आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.

 

पर्रिकरांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेशच मुळी संघ स्वयंसेवकत्त्वातून झाला. म्हापसाचे संघचालक म्हणून ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आणि संघाची इच्छा म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ‘जे करायचे ते १०० टक्केच’ हा बाणा त्यांच्या अंगी बाणल्याने आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री म्हणून सर्व भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. आजारपणाच्या काळातील त्यांची भूमिका तर केवळ स्तिमित करणारी आहे. आपण मुख्यमंत्रिपदाला न्याय देऊ शकणार नाही, हे काय त्यांना कळत नव्हते? पण, पक्षाची आज्ञा झाली आणि ती शिरोधार्ह मानून त्यांनी तिचे पालन केले. कारण, ‘पर्रिकर मुख्यमंत्रिपदी राहणार असतील, तरच आम्ही भाजपसोबत राहू,’ असा मित्रपक्षांचा आग्रह होता. भारतीय जनता पक्ष तो मोडू शकत नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव भाजपला पर्रिकरांना पणाला लावावे लागले. पण, तेही पर्रिकरांनी आनंदाने स्वीकारले. त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर एकच महिन्यापूर्वी त्यांनी प्रकट केलेले धैर्य पाहा. खरे तर दिल्लीतील एम्समधून ते ज्या अवस्थेत परत आले ती पाहता ते काहीच दिवसांचे सोबती असल्याचे स्पष्ट जाणवत होते. पण, त्या स्थितीवर त्यांनी अदम्य साहसाने मात केली. त्या स्थितीतील पर्रिकर नाकात नळी लावलेल्या अवस्थेत मांडवीवरील तिसऱ्या पुलाची पाहणी करतील, उद्घाटनास उपस्थित राहतील वा विधानसभेत उभे राहून अर्थसंकल्प सादर करतील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण तेच पर्रिकर हे सर्व उपचार पार पाडून वर ‘हाऊ इज दी जोश’चा नारा लावतात तेव्हा त्यांच्या शौर्यासमोर, कर्तव्यनिष्ठेसमोर, गोमंतकीयांप्रतिच्या आस्थेसमोर नतमस्तक होण्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच राहत नाही. पर्रिकरांचे दुर्दैव असे की, अखेरच्या दिवसात त्यांना कर्करोगाच्या यातना जेवढ्या सहन कराव्या लागल्या त्यापेक्षा अधिक एकेकाळी स्वकीयांकडून मिळाल्या. पर्रिकरांच्या जीवनातील ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. त्या स्वकीयांच्या वेगळ्या प्राथमिकता असतील, पण जणू काय त्यासाठी पर्रिकरच सर्वस्वी जबाबदार आहेत, असे समजून या स्वकीयांनी त्यांना अक्षरश: धारेवर धरले. भाषा आंदोलनापूर्वी त्यांच्याशी प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचे संबंध एवढे बिघडतील असे कोणी सांगितले असते, तर त्यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. प्राचार्य वेलिंगकरांनी त्यांच्यावर अक्षरश: पुत्रवत प्रेम केले. पर्रिकरांच्या जडणघडणीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. पण, केवळ संघटनेचे हित आणि आदेश यांना प्राधान्य देऊन स्वकीयांकडून मिळणारे चाबकासारखे तडाखे पर्रिकरांनी मूकपणे सहन केले. प्राचार्य वेलिंगकरांबद्दल एकही अनुचित शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडला नाही. हीदेखील गोमंतकीय लोकजीवन आणि संघसंस्कार यांचीच किमया. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

 

- ल. त्र्यं. जोशी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@