सॅम अंकलची नापाक वकिली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |


 


मोदी सरकारने हिंमत दाखवून दहशतवाद्यांनाएकाच्या बदल्यात दहाने उत्तर देण्याचा विडा उचलला तर काँग्रेसी बुळ्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या! पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेल, तेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविक, दहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूत, उद्ध्वस्त करता आले असते.

बर्बाद गुलिस्ताँ करने को,

बस एक ही उल्लू काफ़ी था-

हर शाख़ पे उल्लू बैठा है,

अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा!

 

या शब्दांत शौक बहराइची नावाच्या शायराने फार पूर्वीच काँग्रेसचे वर्णन करून ठेवल्याचे दिसते. प्रसिद्धीचा झोत कायम आपल्याच चेहऱ्यावर राहावा म्हणून कुठल्याही थराला जाऊन चमकोगिरी करणाऱ्या महाभागांची काँग्रेसमध्ये अजिबात कमतरता नाही. म्हणूनच मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरूर अशा एकापेक्षा एक सरस चोंबड्यांच्या तोंडातून इथे अखंड मुक्ताफळे उधळली जातात. पक्षाला अडचणीत आणणाऱ्या वा वादग्रस्त विधानांना ‘वैयक्तिक...वैयक्तिक’चा मुलामा देऊन काँग्रेसश्रेष्ठी त्यापासून दूर पळतातही, हे खरेच. पण ते तेवढ्यापुरतेच असते, कारण नंतर मात्र अशा फुटक्या मण्यांना पक्षात पुन्हा पावन करून घेतले जातेच. ‘नीच’कार मणिशंकर अय्यर या नमुन्यावरून तर त्याची खात्रीच पटते. आताही गांधी घराण्याचे इमानदार चाकर आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जगाच्या वेशीवर टांगली. “भारताने बालाकोटमध्ये खरेच एअर स्ट्राईक केला का? आपण खरेच ३०० दहशतवादी मारले का?,” अशा शब्दांत भारतीय वायुसेनेवर अविश्वास दाखवत पित्रोदा यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हवाल्यानेभारताने केलेल्या कारवाईत कोणीही ठार झाले नाही,” असे म्हणत हल्ल्याचे पुरावे मागितले. सॅम पित्रोदा एवढ्यावरच थांबले नाहीत तर, “भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकीचा होता. मूठभर दहशतवाद्यांच्या कर्माचा दोष सगळ्याच पाकिस्तान्यांच्या माथी मारणे योग्य नाही,” असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले. नंतर मात्र पित्रोदा यांनी आपल्या विधानांबाबत सारवासारव केली व काँग्रेसनेही ‘हे’ पित्रोदा यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले. हे अर्थातच काँग्रेसच्या कार्यशैलीला साजेसेच. कारण, कुठल्यातरी ‘वफादार’ टुच्च्याने बडबड करायची आणि तोंड पोळायला लागले की, त्यातून माघार घ्यायची, हेच धोरण काँग्रेसने नेहमी अवलंबले. आताही तसेच झाले.

 

वास्तविक, पुलवामातील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकभोवती संशयाची भुते नाचविण्याचे काम काँग्रेससह विरोधकांनी इमानेइतबारे केले. पाकिस्ताननेही भारताने बालाकोटमध्ये कोणतीही कारवाई केली नाही, असे म्हणत एअर स्ट्राईक झाल्याचे झिडकारलेच होते. खरे म्हणजे इथूनच काँग्रेस आणि पाकिस्तानची जीभ एकाच दिशेने चराचरा चालत असल्याचे लक्षात येत होते. आज सॅम पित्रोदा यांच्यासारख्या निष्ठावंताच्या विधानाने त्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. पित्रोदा यांच्या विधानानंतर काँग्रेस वा पक्षश्रेष्ठी कितीही ‘वैयक्तिक’चा आव आणत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारण, पित्रोदा यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितलेच होते. (दरम्यान, एसएआर इमेजेस, सैन्यदलांची पत्रकार परिषद व मौलाना मसूद अझहरच्या भावाच्या कबुलीजबाबातूनही एअर स्ट्राईकची सिद्धता झाली आहे.) केवळ राहुलच नव्हे, तर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही शब्दच्छल करत तोच कित्ता गिरवला होता. त्यामुळे सॅम पित्रोदा यांचे विधान ‘वैयक्तिक’ श्रेणीत मोडत नाही, तर ते एक षड्यंत्र ठरते. भारतीय सैन्यदलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे, देशवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे, केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे, पाकिस्तानच्या जबानीशी जबान मिळवण्याचे, हे कारस्थान काँग्रेस नेते वारंवार का करत असावेत? राजकारण म्हटले की, एखाद्या विचारसरणीला, पक्षाला, राजनेत्याला विरोध हा होणारच, पण हे करताना देशाचा वा सैन्यदलांचा विरोध करण्याचे कारण काय? सत्तेत नसताना अशाप्रकारे वागत असेल तर काँग्रेसने सत्तेवर असताना वारंवार होणाऱ्या जिहादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देश दहशतवाद्यांना आंदण दिला होता का? मणिशंकर अय्यर यांनी केंद्रातील विद्यमान भाजप सरकारविरोधात मागितलेल्या पाकिस्तानी मदतीशी याचा काही संबंध आहे का? असे प्रश्नही निर्माण होतात, ज्याची उत्तरे नक्कीच मिळायला हवीत.

 

वस्तुतः देशातील संगणक क्रांतीत सॅम पित्रोदा यांचा मोठा सहभाग होता. देशात पसरलेल्या माहिती-तंत्रज्ञानाच्या अवाढव्य व्यापात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह पित्रोदा यांचीही महत्त्वाची भूमिका होती. पण म्हणतात ना, घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. तशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे. म्हणूनच एका बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ‘पप्पूगिरी’ देशात चर्चेचा विषय झालेला असतानाच दुसऱ्या बाजूला सॅम पित्रोदा यांच्यासारख्यांची ‘हुच्चगिरी’ ही अनुभवायला येते. दुसरीकडे भारताने एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यायला नको होता, पाकिस्तानला धडा शिकवायला नको होता, अशा बेछूटपणातून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात दहशतवाद्यांशी केलेल्या प्रेमळ व्यवहाराचीही खात्री पटते. म्हणूनच देशात काश्मीरपासून मुंबई, दिल्लीपर्यंत फिदायीन हल्ले होत होते, तेव्हाही पित्रोदा वगैरे बुद्धीमांद्यांच्या सल्ल्याने पाऊल उचलणारे शेपूट घालून बसत होते. ‘कडी निंदा’शिवाय एक शब्दही या लोकांच्या तोंडातून फुटत नव्हता अन् आता मोदी सरकारने हिंमत दाखवून दहशतवाद्यांना ‘एकाच्या बदल्यात दहा’ने उत्तर देण्याचा विडा उचलला तर काँग्रेसी बुळ्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या! पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेल, तेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविक, दहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूत, उद्ध्वस्त करता आले असते. पण, केंद्रात सत्तेत असूनही काँग्रेसने कधीही तशी पावले उचलण्याचे धाडस केले नाही. उलट चर्चा, चर्चा आणि चर्चांचाच धोशा लावत पाकिस्तानला आणि मतांच्या भीकेपायी मुसलमानांना गोंजारण्याचेच काम केले. परिणामी, काँग्रेसच्या शेळपटपणामुळे आज पाकव्याप्त काश्मीर व काश्मीर खोऱ्यातील दोन-तीन जिल्ह्यांत का होईना, दहशतवादाचा शेकडो तोंडांचा सैतान निर्माण झाल्याचे दिसते. दहशतवादाविरोधातील काँग्रेसी बोटचेपेपणामुळेच हजारो सैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. तरीही काँग्रेसी विचारजंत, ‘कशाला प्रतिहल्ला केला?,’ असे विचारतात. यावरूनच ही मंडळी देशातल्या सर्वच सोयीसुविधांचा उपभोग घेऊनही भारताची नव्हे तर पाकिस्तानचीच वकिली करत असल्याचे दिसते. ‘जिस थाली में खाया, उसी में छेद किया,’ यालाच म्हणतात ना?

 

सोबतच सॅम पित्रोदा, “मोदी सरकार मजबूत असल्याचे म्हटले जात असले तरी लोकशाहीच्या भल्यासाठी मजबूत सरकार असणे गरजेचे नाही. हिटलरसह जगातले सगळेच हुकूमशहा मजबूत होते आणि चीनचे अध्यक्षही मजबूतच आहेत,” असेही म्हणाले. सॅम पित्रोदा यांच्या या विधानांवरून, इंदिरा गांधी वा राजीव गांधी यांच्या मजबूत सरकारबाबतही पित्रोदा यांचे हेच मत आहे का/होते का?, हा प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. मात्र, पद, प्रतिष्ठेच्या अर्थपूर्ण लाचारीपायी गांधी घराण्यापुढे लाळघोटेपणा करणारे पित्रोदा यावर काही बोलणार नाहीतच. पण, पित्रोदा वगैरेसारख्यांच्या मातीखाऊ वक्तव्यांमुळे काँग्रेसची पुरती वाट लागेल, हे नक्की अन् हे एवढ्यावरच थांबणार नाही, उलट जसजसा लोकसभा निवडणुकीचा माहोल तापत जाईल, तसतसे एकेक काँग्रेसी सोंगं बाहेर निघून वेडेवाकडे चाळे करतच राहतील अन् गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उजाड झालेल्या काँग्रेसी बागेला बर्बाद केल्याशिवाय ही मंडळी शांत बसणारही नाहीच! अर्थात त्यानेही लोकेच्छाच पूर्ण होईल म्हणा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@