राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  दरम्यान यावेळी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवीण छेडा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 




 

पवार म्हणाल्या, "आज भाजप प्रवेशामुळे मला मोठा परिवार मिळाला आहे. यामुळे मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री असून गेली कित्येक वर्षे दिंडोरीमध्ये काम करूनही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 
 

भारती पवार यांचा अल्पपरिचय

भारती पवारांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. धनंजय महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज होत्या. माजी मंत्री ए. टी.पवार यांच्या त्या सुनबाई आहेत. विशेष म्हणजे २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत दिली होती. डॉक्टर असल्याने एक सुशिक्षित चेहरा म्हणून उमेदवार भाजपला मिळाला आहे. दिंडोरी भागावर तडगा जनसंपर्क असल्याने त्यांचे राजकीय वजनही असल्याचे मानले जाते.

 

राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील चांगले नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अभिमानाने उभा असून देशात सामान्य माणसाच्या हिताच्या योजना राबविण्यात येत आहेत. मोदीच देश विकसित करू शकतात, अशी खात्री पटल्याने विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत.

 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@