सावधान; सी व्हिजिल ॲप आपल्यावर नजर ठेऊन आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी ॲपवर, २९४ तक्रारींवर कार्यवाही


मुंबई : निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲपने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने हे ॲप लॉन्च केले होते. हे ॲप सध्या प्रभावी सिद्ध होत असून नागरिक याचा योग्यरीतीने वापर करत आहेत. आतापर्यंत या ॲपवरून तब्बल ७१७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील यातील २९४ तक्रारीत तथ्य आढळले असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या आहेत.

 

ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर ३८७ तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. दाखल झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी ह्या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. तर संपत्ती विद्रुपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारीत वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५ तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी या ॲपवर नोंदवण्यात आल्या आहेत.

 

कसे वापरायचे 'सी व्हिजिल ॲप'?

 

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सी व्हिजिल मोबाईल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@