...आणि त्यांचेही ‘क्षितिज’ विस्तारले!
महा एमटीबी   20-Mar-2019
‘स्व’ शब्द किती महत्त्वाचा आहे ना! या शब्दावर तर खूप गोष्टी अवलंबून असतात. पण ज्यांना याची ओळख नसते, त्यांना आपण ‘विशेष मुले’ म्हणून ओळखतो. अशा मुलांसाठी आता शासनस्तरावरही विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, तरी त्यांना ‘स्व’ शब्दाची ओळख करून देण्याचे काम काही संस्था करीत आहेत. अशाच एका डोंबिवलीतील ‘क्षितिज’ या सामाजिक संस्थेचा परिचय करून देणारा हा लेख...


डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथे
’क्षितिज’ ही संस्था कार्यरत असून, विद्यार्थ्यांना दैनंदिन तसेच, व्यावसायिक जीवन घडविण्यासाठी मार्गक्रमित करीत आहे. या संस्थेची कल्पना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर अनिता दळवी यांची. स्वतःला सामाजिक कार्याची आवड असल्याने दळवी या डोंबिवलीतील एका कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षिका म्हणून कामाला होत्या. याच दरम्यान रस्त्यातील एका मतिमंद मुलीला त्यांनी पाहिले. त्या मुलीकडे सर्वांच्या रोखलेल्या नजरा व तिला सांभाळण्यासाठी तिच्या आईची सुरू असलेली धडपड पाहून त्यांच्याशी बोलण्याचे त्यांनी धाडस केले आणि या संभाषणात अनेक मुद्दे त्यांच्या समोर आले. या ‘विशेष’ मुलांना स्वत:ची ओळख करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९९५ला पश्चिमेतील वझे हॉलमध्ये भाड्याने जागा घेऊन शाळा सुरू केली. एका महिलेने सुरू केलेली शाळा काही महिलाच चालवतात. त्यांच्या या समाजकार्यासाठी लक्ष्मी रंगनाथन व गौरी गोवेकर या त्यांच्या दोन मैत्रिणी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या व या संस्थेचे काम सुरू झाले. १९९७ साली शाळेसाठीची इमारत खरेदी करण्यात आली. पडीक इमारत खरेदी करून दुरुस्त करून त्याठिकाणी काम सुरू झाले. यातही दळवी यांची मैत्रीण व्यंकट माला धावून आली. १९९५ साली पाच मुलांसह सुरुवात झालेल्या शाळेचे २०१० मध्ये यावर्षी ९४ इतके संख्याबळ वाढले. सद्यस्थितीला शाळेत आठ वर्ग चालतात. दहा मुलांचा एक वर्ग अशी यांची रचना आहे. त्यामुळे या संस्थेने ‘झेप शून्यातून क्षितिजा’कडे असा कानमंत्र दिला. सुरुवातीला संस्थेच्या संचालक मंडळात अध्यक्षा अनिता दळवी, सचिव लक्ष्मी रंगनाथन, उपाध्यक्ष आशा टकले, विश्वस्त मंजिरी गुप्ते, विश्वस्त गौरी गोवेकर, व्यंकट माला, शकुंतला कुलकर्णी व सल्लागार अनंत कुलकर्णी काम पाहत होते.

 

 

प्राथमिक किंवा पूर्व-व्यावसायिक वर्ग या शाळेच्या माध्यमातून घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे मूल्यांकन केले जाते आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी काही उच्च लक्ष्यं निश्चित केली जातात. विद्यार्थ्यांना लक्ष्य प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेली २४ वर्षे ही शाळा १०० मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या, कुटुंबीयांचा आधार बनली आहे. पुढील वर्षी ही शाळा २५व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सुरुवातीला दोन तासांसाठी कार्यरत असणारी ही शाळा आता इतर शाळाप्रमाणे पूर्णवेळ कार्यरत आहेत. या मुलांच्या बुद्ध्यांकानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. त्यांचे चार वर्गात विभाजन केले आहेे. सौम्य गट, मध्यम गट, तीव्र गट आणि अतितीव्र गट अशी विभागणी त्यांच्या वयानुसार नव्हे, तर विकाराच्या तीव्रतेनुसार होते आणि त्याच अनुषंगाने शिक्षण पद्धतीने क्रम ठरवावा लागतो. या सर्वांसाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय सल्लामसलतीची आवश्यकता असते१८ वर्षे व त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांना फुले तयार करणे, मेणबत्त्या बनविणे, शिवण काम करणे, ग्रीटिंग कार्डस, चित्रकला, गायन इ.साठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते व व्यवसायाकडे वळविले जाते. या शाळेतील अनेक विद्यार्थी दुसर्‍यांवर अवलंबून न राहता आज स्वत:च्या पायांवर उभे आहेत. विकलांग मुलांना ही या शाळेत शिकवले जाते. या शाळेतील दोन विद्यार्थीही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

 

आमचे विद्यार्थी आमच्या अतिरिक्त शालेय व क्रीडा उपक्रमात सहभागी होतात. त्यांनी आमच्या शाळेत गौरव प्राप्त केला आहे. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरांवर विविध चित्रकला, नृत्य आणि गायन स्पर्धेत सहभागी होतात. आत्मविश्वास येण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहेतशाळेत प्रवेश घेण्यापूर्वी, मुलांचे बुद्धिमत्ता मूल्यांकन केले जाते. नंतर त्याला त्यांच्या वयाच्या आणि बुद्ध्यांकानुसार श्रेणीत ठेवले जाते. मुलांमध्ये आवश्यक क्रियाकलाप मुलांच्या आवश्यकतेनुसार घेतले जातात. त्यांचा अभ्यासक्रम मुख्यत्त्वे ग्रॉस आणि दंड मोटर कौशल्य, संवाद कौशल्य, स्वत:ची मदत कौशल्य, संज्ञानात्मक कौशल्ये आणि मानसिक कौशल्य विकसित करण्यावर जोर देतो. ‘योग’ हाही शालेय उपक्रमाचा एक भाग आहे. अपंग दिन, गतिमंद दिन, अंध दिन नुसते साजरे करून त्यांच्या समस्या सुटणार आहेत का? करुणा व्यक्त करून काही प्रश्न सुटणार का? अशा प्रश्नांवरही विचार होणे गरजेचे आहे. या मुलांच्या कलागुणांना वाव मिळणे, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीलाही मुले मेणबत्ती, कागदी फुले, गुच्छ, अगरबत्ती, लिक्विड सोप, फिनाईल, इमिटेशन ज्वेलरी, राख्या, पर्स, किचन अ‍ॅप्रन, बेबिसेट अशा वस्तूंचे प्रदर्शन भरवितात. समाज कल्याणमार्फत ३० मुलांना अनुदान देण्यात आले आहेत. यामार्फत नऊ शिक्षकांना मानधन दिले जाते. उर्वरित शिक्षकांना संस्थेच्यावतीने मानधन दिले जाते. सद्यस्थितीला शाळेत सहा विशेष शिक्षक, दोन कला शिक्षक, एक मानसोपचारतज्ज्ञ, एक सायकॉलोजिस्ट, एक शिपाई, दोन केअरटेकर, एक सफाई कामगार कार्यरत आहे. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सोय असून, यासाठी चालक व सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 

शाळेतील मतिमंद मुलांना नवीन सुविधा देण्याचा संकल्प ‘क्षितिज’ने केला आहे. नवीन अद्ययावत इमारत, बहुविकलांग व स्वमग्न मुलांसाठी नवीन स्वतंत्र वर्ग, १८ वर्षांवरील मुलांसाठी कार्यशाळा व वसतिगृह सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थापक दळवी यांना या संस्थेला सदृढ करायचे आहे. पण त्यांचे म्हणणे आहे, “सक्षम करण्याचा अर्थ असा नाही की, या शाळेत १०० ते २०० मुले असावीत. याचा अर्थ असा की, या शाळेत येणार्या पालकांना व विद्यार्थ्यांना उदास होऊन परतावे लागता नये,” असे त्यांचे मत आहे. सद्यस्थितीला अध्यक्षा अनिता दळवी, उपाध्यक्ष माधुरी म्हामूनकर, खजिनदार लक्ष्मी रंगनाथन, विश्वस्त आरती चंद्रात्रे, सल्लागार आरती मोकल, माला व्यंकट, किशोर मानकामे व स्वीकृत सदस्य प्राची गडकरी आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat