समाजाचा ‘आधार’
महा एमटीबी   20-Mar-2019
 


आजचे बालक हे उद्याचे भावी नागरिक. म्हणजे आपल्या समाजरूपी वटवृक्षाची खर्‍या अर्थाने मूळंच. मूळं जितकी सक्षम तितकी जास्त त्या वृक्षाची उंची. अशाच रोपट्यांना आणि वटवृक्षांना खतपाणी द्यायचे कार्य ‘आधार युथ फाऊंडेशन’ संस्था गेली सहा वर्षे करते आहे.दि. २८ मार्च, २०१३ रोजी सिद्धेश दळवी या तरुणाने समाजातील दुर्बल घटकांना आपल्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा आणि त्यांच्या चेहर्‍यावर हसू पसरवण्याचा उद्देश मनात पक्का करून संस्थेची स्थापना केली. एकंदरीत संस्थेचे कार्य मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात चालू असते.


संस्थेची काही ठळक कार्ये
 
· आदिवासी पाड्यांवर शाळांना शैक्षणिक मदत करणे.
 
· विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे.
 
· अनाथाश्रम, बालिकाश्रम आणि वृद्धाश्रमांना भेटी देऊन तेथे विविध सण साजरे करणे.
 
· ‘डोनेट, शेअर अ‍ॅण्ड स्माईल’ या उपक्रमांतर्गत पाड्यावरील एखादी शाळा एका वर्षासाठी दत्तक घेतली जाते आणि तेथील शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, शाळा डिजिटलायिझ करणे, वैद्यकीय शिबीर, विविध क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणे.
 
· आर्थिकदृष्ट्या मागास पण हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे.

      · विशेष मुलांच्या शाळेत मनोरंजन खेळ करून त्यांच्या जीवनात आनंद पसरवणे.

 

आदिवासी पाड्यांवर काम करत असताना अनेक मोठमोठ्या समस्या समोर येतात. पण, काही समस्यांना आर्थिक पाठबळ आवश्यक असते. या मोठ्या प्रकल्पांसाठी संस्थेकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे संस्थेला अजून मदतीच्या हातांची आवश्यकता आहे. तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे तांडेलवाडी हे रायगड जिल्ह्यातील महाड येथील अगदी डोंगराच्या टोकावर वसलेले गाव.

  

तेथे पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी वह्यांच्या वाटपाचा कार्यक्रम होता. तेव्हा तेथे आम्हाला कळले की, गावातील एका मुलीला दहावीला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. आठ किमी दूर असलेल्या महाविद्यालयात ती मुलगी रोज चालत जात असे. घरातील सर्व कामे करून ती मुलगी अभ्यास करत असे.अशा प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेल्या मुलीचे आम्हाला खरंच कौतुक वाटले आणि मग त्या मुलीला संस्थेने पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले. पुढील काळात पाड्यावरील शाळांना अधिकाधिक सुसज्ज करणे तसेच, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, विविध कंपन्यांना त्यांच्या उडठ फंडातून पाड्यावर उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणे, अधिकाधिक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि शाळांना भेटी देऊन तेथे उपक्रम राबविणे असे संस्थेचे ध्यास आहेत आणि त्याच अनुषंगाने संस्थेची वाटचाल चालू आहे.

आपले मनोगत सांगताना संस्थापक सिद्धेश यांनी खूप चांगला विचार सांगितला, ”प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जीवनातील थोडा वेळ हा सामाजिक कार्यासाठी द्यायलाच हवा. आपण अनेकदा आर्थिक मदत करतच असतो पण, त्याचसोबत आपला वेळदेखील या समाज कार्यासाठी दिला, तर अनेक सामाजिक प्रश्न आपण थोड्याफार प्रमाणात का होईना, नक्कीच सोडवू शकतो. अखेरीस मी माझा ठरलेला प्रश्न न विसरता त्यांना विचारला, “हे सगळं करताना ‘हॅप्पीवाली फिलिंग’ येते का?”

यावर त्यांनी सांगितलं, “जेव्हा विविध लोकांना आपण मदत करत असतो तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य आपण केलेल्या कष्टाचा चीज करते आणि त्या चेहर्‍यावरचे समाधान हे सर्वात मोठी ‘हॅप्पीवाली फिलिंग’ असते. दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर येणार्‍या समाधानात आपले सुख शोधणार्‍या या संस्थेला आमचा मनाचा मुजरा आणि समाजकार्याच्या वटवृक्षाला खतपाणी देणार्‍या हातांना अजून मदतीचे हात जोडावेत इतकीच सदिच्छा...!

 
- विजय माने  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat