‘हा’ मराठी दिग्दर्शक करणार ‘कोण होणार करोडपती?’ चे सूत्रसंचालन
महा एमटीबी   02-Mar-2019

 

 
 
मुंबई : “देवियों और सज्जनो”, "कम्प्युटरजी लॉक किया जाए" असे म्हणत बॉलिवुडच्या महानायकाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाला बहार आणली. ‘कौन बनेगा करोडपती?’चे सूत्रसंचालन करावे तर ते अमिताभ बच्चन यांनीच अशी एक छबी प्रेक्षकांच्या मनात तयार झाली होती. त्यानंतर हिंदीतील या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या काही पर्वांचे सूत्रसंचालन अभिनेता शाहरुख खानने केले होते. परंतु प्रेक्षकांनी अमिताभ यांनाच पसंती दिली. ‘कौन बनेगा करोडपती?’ च्या ‘कोण होणार करोडपती?’ या मराठी पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही उत्सुकता जास्त ताणून धरता सोनी मराठी चॅनेलने यावरील पडदा दूर केला आहे. महाराष्ट्राचे सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
 
 
 
 

सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रामचे मराठीतील हे तिसरे पर्व आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता स्वप्नील जोशीने यशस्वीरित्या सांभाळली. आता नागराज मंजुळे तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचाल करणार आहेत. नागराज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून या कार्यक्रमाच्या प्रोमोचा व्हिडिओ शेअर केला. आजवर मराठी रसिक प्रेक्षकांनी नागराज मुजुळे यांना दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पाहिले आहे. कोण होणार करोडपती?’ च्या निमित्ताने नागराज मुंजुळे एका नव्या रुपात प्रेक्षकांना दिसतील. ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमाची जनसामान्यांमध्ये असलेली क्रेझ आणि नागराज मंजुळे यांचे सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रमाचे यंदाचे पर्व रंजक ठरणार यात शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat