आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
महा एमटीबी   02-Mar-2019

 

 
 
 
जुन्या पिढीतील नामवंत मराठी साहित्यिक ह. ना. आपटे यांची दि. ३ मार्च रोजी १०० वी पुण्यतिथी असून, त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्त विशेष लेख प्रकाशित करत आहोत...
 

मराठी साहित्यातील ‘कादंबरी’ या प्रकारात अनेक साहित्यिकांनी आपला विशेष असा ठसा उमटवला. सर्व प्रथम बाबा पद्मजी यांनी ‘यमुना पर्यटन’ ही मराठी कादंबरी लिहून ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार सर्वश्रुत केला. पण मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप देणारे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणजे हरी नारायण आपटे. ते हरिभाऊ आपटे या नावानेही प्रसिद्ध होते. दि. ८ मार्च, १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या एका लहान खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शाळेत व गिरगाव बँक रोडवरील बिशप हायस्कूल येथे इंग्रजी तिसरीपर्यंत झाले. सन १८७८ मध्ये आपटे कुटुंबीय विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत आले व तेथील शेवडे बोळातील जानवेकर यांच्या वाड्यात कायमचे वास्तव्य केले. पुणे येथील सरकारी पुना हायस्कूल या शाळेत आपटे यांनी प्रवेश घेतला. त्यावेळेस त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, जीन्सिवले व म. मो. कुंटे यांसारखे गुरुवर्य लाभले. सन १८८० मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, ह. कृ. दामले या त्याकाळच्या नामवंत मंडळींनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल या मराठी शाळेची स्थापना केली. त्यामुळे या सर्वांच्या प्रेरणेमुळे आपटे यांनी पुना सरकारी हायस्कूल सोडून नव्याने स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी सहावीत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेच्या सुरुवातीच्या वेळी जे ११ उपस्थित होते, त्या विद्यार्थ्यांपैकी आपटेही एक होते. या शाळेने त्यांना इंग्रजी व संस्कृत वाङ्मयाचे जे लेणे दिले, त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. सन १८८२ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वांप्रमाणेच आपटे यांना धक्का बसला व यातून त्यांनी अनेक मराठी वृत्तात रचलेले काव्य ‘शिष्याजनविलाप’ हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. पण प्रसिद्धी पराङ्मुख असलेल्या आपटे यांनी त्या पुस्तकावर आपले नाव छापले नव्हते. त्या काळी या पुस्तकाच्या एक हजार प्रती सुमारे दोन दिवसांत संपल्या.

 
सन १८८३ मध्ये आपटे मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व त्यानंतर त्यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण त्यांचा गणित हा विषय कच्चा असल्याने त्यांना परीक्षेत अपयश आले व त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पुन्हा तेथेही अपयश आल्याने त्यांनी सन १८८६ मध्ये शिक्षणाला पूर्णविराम दिला. त्या वेळेस फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य व साप्ताहिक ‘केसरी’चे संपादक गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकावरून रचलेल्या ‘विकारविलसित’ या नाटकावरील सुमारे ७२ पानांची सडेतोड व विस्तृत टीका आपटे यांनी लिहून ती ‘निबंध चंद्रिके’त प्रसिद्ध केली. तसेच त्याकाळी कालिदास व भवभूती यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी ‘केसरी’मधून चाललेल्या वादात आपटे यांनी कालिदासाची बाजू मांडणारे एक मार्मिक पत्र लिहिले. त्यामुळे आगरकर यांच्यासह इतर जाणकारांकडून त्या लेखाची प्रशंसा झाली व मराठी साहित्यात एका नव्या लेखकाची भर पडली. याच काळात का. र. मित्र यांच्या मनोरंजन मासिकात व ‘निबंधचंद्रिका’ यातून त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. सन १८८६ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी आपटे यांची ‘मधली स्थिती’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. ही कादंबरी रेनॉल्डच्या ‘मिस्ट्री ऑफ ओल्ड लंडन’ या कादंबरीवर आधारित आहे. त्या काळी पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘पुणे वैभव’ या साप्ताहिकाची मासिक पुरवणी म्हणून त्यांची ही कादंबरी प्रसिद्ध होत असे. सन १८८८ मध्ये कुलकर्णी आणि मंडळी या प्रकाशन संस्थेने ‘मधली स्थिती’ ही कादंबरी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली व एक तरुण कादंबरीकार म्हणून आपटे उदयाला आले. सन १८९० पासून त्यांनी ‘करमणूक’ या साप्ताहिकातून पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. या साप्ताहिकाच्या प्रथम अंकापासून त्यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होऊ लागली. तत्कालीन साहित्याचा विचार करता आपटे यांची ही कादंबरी आधुनिक विचारसरणीने युक्त असून, अनेक अनिष्ट वाङ्मयीन विषयातून मराठी कादंबरीला मुक्त करणारे ते पहिले साहित्यिक असल्याने, मराठी साहित्यातील वेगळी वाट चोखळणारा कादंबरीकार म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. त्यामुळे ‘पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीने हरिभाऊ मात्र सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिले.
 
 
कादंबरीप्रमाणे त्यांनी आधुनिक मराठी कथेचा पाया घालून, कल्पनारम्य वातावरणात रमलेल्या कथेला आपल्या रोजच्या जीवनातील वास्तव शोधण्यास शिकवले. त्यांच्या सर्व कथांची वैशिष्ट्ये म्हणजे, साधी घरगुती भाषा, वास्तव चित्रण, उत्कृष्ट स्वभावलेखन, चटकदार निवेदन हे होय. त्यांच्या कथा ‘स्फुट गोष्टी : भाग १ ते ४’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. हरिभाऊंना फ्रेंच व बंगाली भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी ‘चाणाक्षपणाचा कळस’ हा फ्रेंच रहस्यकथेवर आधारित कथासंग्रह लिहिला. याप्रमाणे ‘भासकवींच्या नाट्यकथा’ व ‘घटकाभर करमणूक’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. तसेच व्हिक्टर ह्युगो, मोलिअर शेक्सपिअर, काँन्ग्रीव या पाश्चिमात्य नाटककारांच्या नाटकांची त्यांनी मराठीत रूपांतर करून ‘तीन नाटके व तीन प्रहसने’ हे पुस्तक सन १९१० मध्ये प्रसिद्ध केले. तसेच ‘संत सखुबाई’ (१९११ ) व ‘सती पिंगला’ ही दोन स्वतंत्र संगीत नाटकेही प्रसिद्ध केली. ही संगीत नाटके त्याकाळी प्रवर्तक संगीत मंडळींनी सादर केली व तेव्हापासून हरिभाऊ कादंबरीकाराप्रमाणे नाटककार झाले. ही नाटके त्याकाळी खूप गाजली. सन १९१३ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला साहित्याचे नोबेल मिळाले व रवींद्रनाथांचे चरित्र आणि गीतांजलीचा काव्यविवेचनासह केलेला गद्यानुवाद आपटे यांनी सन १९१७ मध्ये पुस्तकरूपात प्रसिद्ध करून हरिभाऊ महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींच्या गळ्यातील जणू नोबेल झाले. त्यांचा मराठी वाङ्मयाचा अभ्यास फार मोठा होता.
 
 
त्यांच्या मराठी वाङ्मयाचा अभ्यास (१९०३ ), विदग्ध वाङ्मय (१९११ ) व ‘Marathi Its Sources And Development’ या ग्रंथांवरून त्यांच्या लेखनशैलीची आणि परिपूर्ण अभ्यासाची कल्पना येते. त्यांच्या विविधांगी साहित्यसंपदेने नटलेले साहित्य म्हणजे, ‘करमणूकीतील करमणूक,’ ‘करमणुकीची निबंधमाला,’ ‘करमणूतील स्वभावचित्रे’ व त्यांनी गो. वि. कानेटकर व काशिबाई कानेटकर यांना लिहिलेली पत्रे ही ‘हरिभाऊंची पत्रे’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘म्हैसूरचा वाघ’ ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी असून ती इंग्रजी लेखक मेडोज टेलर यांच्या ‘टिपू सुलतान’ या कादंबरीवर आधारित आहे. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘मधली स्थिती,’ ‘पण लक्षात कोण घेतो ?,’ ‘जग हे असेच आहे,’ ‘यशवंतराव खरे,’ ‘मी,’ ‘गणपतराव,’ ‘कर्मयोग,’ ‘आजच,’ ‘मायेचा बाजार,’ ‘भयंकरदिव्या’ या सामाजिक; तर ‘म्हैसूरचा वाघ,’ ‘गड आला पण सिंह गेला,’ ‘चंद्रगुप्त,’ ‘रुपनगरची राजकन्या,’ ‘विजयनगरचा विनाशकाल,’ ‘सूर्योदय,’ ‘केवळ स्वराज्यासाठी,’ ‘सूर्यग्रहण,’ ‘मध्यान्ह,’ ‘उष:काल,’ ‘वज्रघात’ या ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर चित्रपती व्ही. शांताराम यांनी सन १९३७ मध्ये ‘कुंकू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या कादंबरीतील ‘निर्मला’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शांता आपटे यांनी चित्रपटात साकारली आहे. हरिभाऊंचे विचार पुरोगामी असून, त्यांचा पिंड ध्येयवादी सुधारकाचा होता. मनोरंजनाबरोबर समाजाला सुबोध करण्याची दृष्टी सतत नजरेसमोर ठेवून त्यांची लीलया लेखणी साहित्यविश्वात संचारली. ‘काळ तर फार मोठा कठीण आला आहे,’ ही त्यांची कथा त्यांनी ‘Ramji - A- Tragedy of Indian Faming’ या शीर्षकाखाली अनुवादित केली होती. त्यांच्या काही कादंबऱ्यांत, लेखनात तत्कालीन पाल्हाळीक भाषाशैलीचा दोष जाणवतो, पण तरीही तत्कालीन मध्यमवर्गीय जीवनाचे रंगवलेले विविधरंगी रूप वाचकांच्या मनास भावते. सन १९१२ मध्ये अकोला येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. ते पदवीधर नसतानाही मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे फेलो म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. विद्यापीठांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांनी साहित्यलेखनासह सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालय’ या शाळेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाट होता. तसेच ‘के. इ. एम.रुग्णालय’ही त्यांच्या संकल्पनेतून साकारले.
 
 
सन १९०० ते १९१९ या काळात ते पुणे म्युन्सिपाल्टीचे सभासद होते. हरिभाऊंना कौटुंबिक सुख म्हणावे तसे लाभले नाही. अगदी बालपणी ते मातृसुखाला पारखे झाले. जुन्या वळणाच्या विचारांमुळे त्यांना पितृसुखही लाभले नाही. ऐन तारुण्यात त्यांची पत्नी व तीन मुले आकस्मित वारली. दुसऱ्या विवाहानंतर उशिरा झालेली त्यांची कन्या ऐन तारुण्यात एकाएकी वारली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारखे त्यांचे परमप्रिय स्नेही गेले. या सर्वांच्या वियोगाने त्यांचे मन खिन्न झाले, पण त्यांच्या प्रेमळ स्वभावात, सौजन्यात, आदरातिथ्य वृत्तीत कधीही बदल झाला नाही. सन १९१८ च्या सुमारास त्यांच्या एका डोळ्यास पक्षघाताचा विकार झाला. त्यातून ते बरे होताच पुन्हा त्यांना जलोदराचा विकार झाला व त्यांचे दुखणे विकोपाला गेले. दि. ३ मार्च, १९१९ चा तो दिवस! हरीभाऊ दुपारी १ वाजता मुंबईहून पुण्याला आनंदाश्रम, २२, बुधवार पेठ या आपल्या निवास्थानी आले व याच दिवशी सायंकाळी ७ वाजता साहित्यविश्वातील दरबारातून वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी कायमचा निरोप घेतला. अवघ्या ५ दिवसांनी ८ मार्चला त्यांचा ५५ वा वाढदिवस त्यांच्या समकालीन साहित्यिकांनी साजरा करण्याचे ठरवले होते. पण दुर्दैव!त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्यासारखा आधुनिक विचारसरणीचा लेखक पुन्हा होणे नाही. या मराठी कादंबरीच्या आधुनिक जनकास स्मृतिशताब्दीनिमित्त त्रिवार वंदन!
 

- अमेय गुप्ते

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat