लिखित साहित्यातील चिह्नसंकेत...
महा एमटीबी   16-Mar-2019

 

 
 
 
 
विजय तेंडुलकर
 
 
 

 
 

मराठी नाट्यसंहितेच्या प्रचलित लेखनशैलीला निश्चित वेगळे स्वरूप देणारे विजय तेंडुलकर हे मराठी रंगभूमीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणारे यशस्वी नाटककार. तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकांतून राजकीय, सामाजिक समस्येवर कधीही चर्चा केली नाही. माणसांच्या रोजच्या जीवन व्यवहारातील वास्तव, स्त्री आणि पुरुषांचे मनोव्यापार-व्यवहार, नाटकातील पात्रांनी रंगवलेल्या व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध, माणसांच्या स्वभावधर्मातील टोकाच्या प्रवृत्ती असे तत्कालीन मांडले न गेलेले अनोखे विषय त्यांनी त्यांच्या नाट्यसंहितांमधून मांडले. अदृश्य मुखवट्याआड लपलेला क्रोधिष्ट-हिंस्त्र-स्वार्थी माणूस तेंडुलकरांनी रंगमंचावर त्यांच्या सशक्त शब्दांच्या आणि प्रभावी संवादशैलीच्या माध्यमातून सादर केला. स्पष्ट, स्वच्छ वास्तववाद इतक्या प्रखरपणे तेंडुलकरांनी नाट्यसंहितेत मांडला की, पुढच्या काळात तो नाटकाच्या आशय मांडणीचा महामार्ग बनला. मात्र, तरीही तेंडुलकरांनी नाटकाकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही आणि कोण काय म्हणेल याचाही विचार त्यांनी कधीच केला नाही.

 

खोट्या मूल्य संकल्पना, ढोंगी प्रवृत्ती, समाज प्रतिष्ठेच्या खोट्या धारणा, समाजासमोर धारण केलेले फसवे चेहरे यावर नाट्यसंहितेत भाष्य करतानाच या प्रतिभावान लेखकाने, चिह्न-रूपके-प्रतीके यांचा समर्थ वापर केला. ‘घाशीराम कोतवाल,’ ‘गिधाडे,’ ‘सखाराम बाईंडर,’ ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या प्रत्येक नाटकाचा विषय-आशय वेगळा, आकृतिबंध वेगळा होता. पात्रांचे व्यक्तिचित्रण करताना प्रत्येक नाटकातील त्यांचे समाजातील आर्थिकस्तर वेगळे होते असे लक्षात येते. भिन्न भावना-धारणा-प्रवृत्ती, तितकीच भिन्न जीवनशैली आणि अनुभव, त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे नातेसंबंध आणि संघर्षही वेगळे. तेंडुलकरांनी वापरलेले चिह्नसंकेत, पात्रांच्या आशय समृद्ध संवादातून, नातेसंबंधातून, त्यातून निर्माण होणाऱ्या बाह्य समस्या आणि बाह्य संघर्षातून आपण अनुभवल्या. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील एक पात्र लीला बेणारेचे दीर्घ स्वगत फार प्रभावी झाले, या माध्यमातूनच खलनायकाच्या मनातील विचार आणि त्याचे डावपेच या बरोबरच नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचला. निव्वळ म्हणूनच तेंडुलकरांच्या नाटकांचे अभिनित आविष्कार प्रेक्षकांना नवे अनुभव देतात. नाट्यसंहितेत वापरलेली अशी तुलना, अन्योक्ती अथवा साम्यस्थळे आणि विरोधाभास सूचित करणारे सूक्ष्म चिह्नसंकेत, वाचण्या-समजण्यासाठी प्रेक्षकाला, तेंडुलकरांनी साक्षर बनवले, असे निश्चित म्हणता येईल.

 

महेश एलकुंचवार

 
 
 

 
 

विजय तेंडुलकरांच्या नाटकांतून प्रेरणा मिळाली, असे म्हणणाऱ्या महेश एलकुंचवार यांनी स्वत:ची स्वतंत्र नाट्यलेखनशैली निर्माण केली व यशस्वी केली. तेंडुलकरांच्या नाटकातून, दोन पात्रे किंवा परिस्थितीतील बाह्य संघर्ष आपल्याला अनुभवता आला. एलकुंचवारांच्या साहित्यामध्ये मात्र प्रेक्षकाला त्यापेक्षा पूर्ण वेगळा अनुभव मिळतो. माणसाच्या मनातील आंतरिक संघर्ष, अपेक्षा, विफलता, निराशा असे मनोव्यापार-व्यवहार, अदृश्य व्यंग आणि प्रवृत्ती असे आकार-विकार त्यांनी स्वच्छ आणि स्पष्टपणे त्यांच्या नाटकांतून मांडले. बाह्यसंघर्ष निर्माण होण्याआधीचा, पात्र रंगवत असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील निरर्थकता, असाहाय्यता, ढोंगी-दांभिक वृत्ती, फसव्या समजुती आणि गृहितकांमधून सुटका होत नसतानाही त्यातून बाहेर पडण्याची धडपड असा व्यक्तींचा आंतरिक संघर्ष रंगवताना एलकुंचवारांनी चिह्न-रूपके-प्रतीके यांचा सहज वापर संपन्न केला. आशयाला सतत पुढे नेताना पात्रांचा आंतरिक भावनिक-वैचारिक संघर्ष, त्यांचे आत्मभान, तणाव, यश-अपयश, मृत्यूचे भय अथवा आकर्षण हे सर्व मांडताना संवादातील अन्योक्ती, उपहास, विरोधाभास अशा मराठी भाषा व्याकरणातील उपमा-भासांचा त्यांनी प्रभावी वापर केला. एलकुंचवार यांची लेखनशैली दिग्दर्शकांना आव्हानात्मक वाटली. अभिनय क्षमतेचा कस लावणारी ठरली. प्रेक्षक या नात्याने एक अनुभव इथे सांगणे आवश्यक आहे. एलकुंचवारांच्या प्रत्येक नाटकात अभिनय करणारे अनुभवसंपन्न होते आणि आहेत. मात्र, वाक्यांना मिळणारी दाद मिळणाऱ्या टाळ्या या एलकुंचवारांच्या संवादाला असतात, हे निश्चित.

 

गिरीश कर्नाड

 
 

 
 

गिरीश कर्नाड यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर टिप्पणी करणारी नाटके त्यांनी सुरुवातीला लिहिली. अशी वास्तव परिस्थितीची मांडणी करताना त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासातील काही वास्तव घटना, पुराणकथा आणि आख्यायिकांचा तुलनात्मक वापर केला. त्या काळात प्रचलित नसलेली, थोडीशी अगम्य आणि गूढ नाट्यलेखनाची नवी शैली आत्मसात केली. या शैलीला नंतरच्या काळात यशाचे प्रमाण म्हणून मान्यता मिळाली. पाश्चात्य शैलीचा प्रभाव असलेल्या कर्नाडांच्या नाट्यलेखनशैलीचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या नाटकातील पात्रांचे व्यक्तिचित्रण तत्कालीन प्रचलित मांडणीपेक्षा वेगळे होते. घटनांची क्रमवार रचना नाट्यमय होती.

 

‘तुघलक’ नाटकातील नायकाचे व्यक्तिचित्रण फार वेगळे आहे. या राजाने आपले वडील आणि भाऊ यांचा घात करून राज्य बळकावले आहे. कर्नाडांनी एकाचवेळी त्याला मूर्ख ठरवले आणि हुशारही ठरवले. दूरदृष्टी असलेला हा राजा क्रूर आहे. या व्यक्तिचित्रणाला प्रभावी बनवताना संहितेच्या आकृतीबंधात त्यांनी लोककला आणि लोकसंगीताचा वापर केला. संवादात विडंबन आणि विनोदाचा संयमित वापर करून, तत्कालीन नेहरू सरकारच्या धर्माधिष्ठित राजकारण आणि भ्रष्ट राज्यकारभारावर उपहासाने प्रखर टीका केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्माच्या नावाने समाजाची झालेली विभागणी, रक्तपात, हिंसाचार, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि सरकारची चुकीची धोरणे या सर्व परिस्थितीचा आलेख मांडताना त्यांनी इतिहासातील ‘तुघलका’च्या राजधानी बदलण्याच्या मूर्ख निर्णयाचे रूपक वापरून त्यातील साधर्म्याची समर्पक तुलना प्रेक्षकांसमोर ठेवली. ‘तुघलका’चा राजधानी बदलण्याच्या इतिहासातील दाखला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची सत्तापालट यातील गंभीर साम्यस्थळे असा चिह्न-रूपके-प्रतीकांचा चाणाक्ष वापर ही या नाट्यसंहितेची मर्मस्थळे आहेत.

 

सतीश आळेकर

 
 

 
 

माणसाचा मृत्यू आणि त्या मागोमाग धर्म परंपरेने होणारे अंत्यविधी आणि पिंडदान हे खरेतर फार गंभीर विषय. अशा करुण प्रसंगाला वा विषयाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून आळेकरांनी एक ‘हास्य-शोकात्मिका’ अशी नाट्यसंहिता लिहिली. नाटककार म्हणून आळेकरांचे हे पहिलेच नाटक. करुणा आणि विनोद अशा टोकाच्या दोन भावना, मृत्यू या परंपरेमध्ये गुरफटलेल्या गंभीर आणि अवघड प्रसंगांचे नाटक लिहिताना वापरणे असा आळेकरांचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. नायकाच्या मृत्यूनंतर पुढे अंत्यसंस्काराच्या तेराव्या दिवसापर्यंत रंगणारे हे नाटक, प्रचलित रूढ संकेतांना आव्हान देणारे ठरले. विषय-आशय, संवाद, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत अशा प्रचलित रंगमंचीय संकल्पनांना, या संहितेने आणि दिग्दर्शक-निर्मात्याने बाजूला सारले आणि प्रायोगिक रंगकर्मींसमोर नवा मानदंड निर्माण केला.

 

कालबाह्य रुढी-परंपरा किती फोल आहेत, कालानुरूप त्या बदलणे का आणि किती आवश्यक आहे, याचे विडंबन करतानाच, विज्ञानाच्या अभ्यासाने मृत्यूपश्चात माणसाचे काय होते त्यातील उपहास-विरोधाभास, विनोद निर्माण करत यातील संवादातून, हास्यकल्लोळातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संहिता करते. एखाद्या प्रसंगातील मृत व्यक्तीचा वावर सूचित करताना, लेखक अन्योक्तीचा वापर (उपमा-रूपकांच्या वापराने तुलना करून अप्रत्यक्ष उल्लेख) संवादांत करून धक्कातंत्राने प्रेक्षकांना निश्चित अंतर्मुख करतो.

 

पंचतंत्र/इसापनीङठ/हितोपदेश/जातक कथा

 
 

 
 

मानवी लिखित साहित्याच्या इतिहासात, सर्वात प्रथम बोधकथा-नीतिकथा लिहिण्याचा मान निर्विवादपणे पंडित विष्णू शर्मा यांचा. इसवी सन दुसऱ्या अथवा तिसऱ्या शतकांत, महिलारोप्य नगरीचा राजा अमरशक्ती याच्या विनंतीनुसार, पंडित विष्णू शर्मा यांनी ‘पंचतंत्र’ या अजरामर साहित्याची निर्मिती केली. मूळ संस्कृत भाषेतील या ग्रंथाच्या निर्मितीचा मूळ उद्देश राजाच्या तीन राजकुमारांना केलेला उपदेश-प्रबोधन असा आहे. जगातील सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरं झालेल्या साहित्यामध्ये याचा क्रमांक फार वरचा आहे. साधारण पाचव्या-सहाव्या शतकांत पंचतंत्राचे अरबी भाषेतील ‘पेहलवी संहिता’ या शीर्षकाने भाषांतर परिचित झाले. पुढील काही शतकांत याचा प्रचार पुढे ग्रीक, लॅटिन, इटालियन, स्पॅनिश अशा भाषांमध्ये झाला. मूळ पंचतंत्रातील याच गोष्टी जगभरात फिरून ‘इसापनीती’ या नावाने पुन्हा भारतात प्रचलित झाल्याइन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज, ठाणे या संस्थेच्या एका परिसंवादात २७ डिसेंबर, २००८ रोजी डॉ. विजय बेडेकर यांनी, ‘HISTORY OF MIGRATION OF PANCHTANTRA AND WHAT IT CAN TEACH US’ हा अभ्यासपूर्ण प्रबंध सदर केला. यात प्राचीन भारतीय ‘पंचतंत्र’ याच्या इतिहासाच्या अद्भुत वास्तवावर त्यांनी अभ्यासपूर्ण टिप्पणी केली. त्यांच्या अभ्यासानुसार, गेल्या १५०० वर्षांत पंचतंत्राची साधारण ६० जागतिक भाषांमध्ये २०० भाषांतरे केली गेली. इसापनीती, अरेबियन नाईट्स, सिंदबादच्या सफरी यांसह, युरोप आणि अमेरिकेतील ५० टक्के ‘Nursery hrymes’ म्हणजे बालगीते आणि 'Ballads’ म्हणजे लोककथा - लोकगाथा यांचा मूळ स्त्रोत ‘पंचतंत्र’ आणि ‘जातके’ आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat