परराष्ट्रसंबंधांबाबत साक्षरतेच्या पलीकडे...
महा एमटीबी   16-Mar-2019

 

 
 
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’सह दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संपादन करुन ‘भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे’ हे अनय जोगळेकर यांचे पुस्तक ‘परम मित्र पब्लिकेशन्स’तर्फे शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाला लाभलेली खा. विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रस्तावना देत आहोत.
 

देशातील राज्यकर्त्यांमध्ये अनेकदा बदल होऊनसुद्धा आणि विविध पक्षांच्या सत्तेत येण्या-जाण्यानंतरदेखील भारताची परराष्ट्रनीती सामान्यतः बदलली नाही असे एक सरधोपट विधान अनेकदा केले जाते. वरवर पाहता त्याचा आशय वास्तवाला धरूनच आहे. पण, त्याचबरोबर हेही तितकेच खरे आहे की, बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे संदर्भ आणि राज्यकर्त्या सरकारांचे प्राधान्यक्रम यांचे स्वाभाविक आणि समजण्याजोगे परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणावर होणे अपरिहार्य होते. हे परिणाम बरेचसे सूक्ष्म होते. पण, अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ते बरेचसे स्पष्टपणे पुढे ही आले आणि नंतर मुत्सद्दीगिरीची समिक्षा करणाऱ्यांनी त्याची दखलही घेतलीपण, प्रासंगिक वृत्तपत्रीय लेखनातून अशी दखल घेतली जाऊनही त्याची सर्वंकश जाण जनमानसात नेहमीच निर्माण होताना दिसत नाही. या मागचे एक कारण वृत्तपत्रांच्या पूर्वग्रह-प्रभावित संपादकीय भूमिका हे जसे आहे, तसेच एकूणच परराष्ट्र व्यवहारांबाबतची आपल्याकडून भासमान साक्षरता हेही आहे. पाकिस्तानच्या प्रेरणेने झालेले दहशतवादी हल्ले असोत अथवा ईशान्य सीमेसंदर्भात चीनकडून होणारी आगळीक असो, परराष्ट्र व्यवहार, कूटनीती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि तत्सम विषयांवर बोलायला आपण नेहमीच आपल्याला ‘सुपात्र’ मानत आलेलो आहोत. त्यामुळे कूटनीतीतील बारकावे समजून घ्यावेत, परराष्ट्र संबंधांच्या आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक मिती समजून घ्याव्यात आणि समग्रतेने जाण विकसित करावी याबद्दलचा उत्साह आपल्याकडे अभावानेच आढळतो.

 

या अज्ञानाबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी परराष्ट्र व्यवहाराबद्दलची सखोल आणि सधन साक्षरता विकसित करणे हाच एकमेव मार्ग असतो. हा मार्ग चोखाळताना कूटनीतीसारखा गंभीर विषयही समजण्यासाठी सुलभ, सोपा आणि तरीही माहितीत नव्हे, तर जाणकारीत भर घालणारा; करून मांडावा लागतो. अनय जोगळेकरांच्या पुस्तकाने नेमके हेच उत्तमपणे साधले आहे. परराष्ट्र व्यवहारांमधील गुंतागुंत, सोप्या आणि समजावून सांगण्याच्या शैलीत उलगडून दाखविणारे मराठी पुस्तक ही काळाची गरज होतीच. ही गरज भागविल्याबद्दल तरुण आणि उत्साही लेखक अनय जोगळेकरांचे मनापासून अभिनंदन! वर्तमान संदर्भात अशा पुस्तकाचे मोल मोठे ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, परराष्ट्र व्यवहारांविषयीच्या धोरणात होत असलेले सूक्ष्म आणि दीर्घलक्ष्यी बदल. पहिल्या सत्तापरिवर्तनानंतर मोरारजी देसाई यांच्या काळात अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र व्यवहारमंत्री असताना त्यांनी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे दायान यांना चर्चेसाठी बोलावून एका अर्थाने भारत-इस्रायल संबंधांची मुहूर्तमेढ रोवली हे वास्तवच आहे. नंतर खुद्द अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अलिप्ततावादाची कालविसंगतता जाणून अधिक व्यवहार्य मार्ग पत्करला. दबावांपुढे न झुकता पोखरणला दुसरी अणुचाचणी मोठ्या कौशल्याने घडवून आणली आणि पाकिस्तानबरोबरचे संबंध सुरळीत करण्यासाठी पावले उचलतानाच पाकिस्तानच्या अरेरावीला न जुमानण्याचा खंबीरपणाही दाखविला.

 

नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचीही अनेक वैशिष्ट्ये आहेत. पाकिस्तानच्या संदर्भात तिथल्या नेतृत्वाशी आधी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आधी प्रामाणिक आणि नाविन्यपूर्ण मार्ग चोखाळल्यानंतर उचित वेळ येताच ‘सर्जिकल स्ट्राईक्स’चा मार्गही अवलंबिला गेला. बांगलादेशाबरोबर प्रदीर्घ काळ वादात अडकून पडलेलेले भूमी हस्तांतरणाचे प्रश्न सोडवितानाच घुसखोरी रोखण्यासाठीची खंबीर पावलेही कठोरपणे उचलली गेली. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत जिथे एकदाही एकाही भारतीय मंत्र्यांची राजनयिक भेट कधी झालीच नव्हती, त्या सर्व देशांना मंत्र्यांनी भेटी दिल्या. इस्रायल आणि पॅलेस्टाईन, तुर्कस्तान आणि इराण, रशिया आणि अमेरिका, चीन आणि जपान अशा त्यांचे त्यांचे उभयपक्षी संबंध तणावाखाली असणाऱ्या देशांशी समांतरपणे आणि भारत-हित-केंद्री संबंध आणखी वृद्धिंगत करण्यात भारताने उल्लेखनीय यश मिळवले आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या संदर्भात तेलउत्पादक देशांना भारताच्या बलाढ्य मार्केटची आकर्षकता पटवून देऊन ग्राहक हितैशी भूमिका घेण्यास भाग पाडणारी कूटनीती हेही मोदी सरकारच्या यशकथेचे एक महत्त्वाचे प्रकरण होय. पराराष्ट्र संबंधांच्या विषयात समान सांस्कृतिक पार्श्वभूमीला दिलेले महत्त्व जसे वैशिष्ट्यपूर्ण, तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्याच अधिवेशनात काही मानवतावादी वा पर्यावरणविषयक मुद्द्यांवर सर्व राष्ट्रांनी एका मंचावर येण्याची गरज अधोरेखित करणारी ‘जी-ऑल’ ही अभिनव संकल्पना मांडणारे पंतप्रधानांचे भाषणही विशेष उल्लेखनीय म्हणायला हवे.

 

पण, पंतप्रधानांच्या प्रतिभेची खरी चुणुक त्यांनी ‘विकासाचे राजनयन’ (development diplomacy) ज्या पद्धतीने अंमलात आणले, त्यात दिसून येते. पॅरिसमध्ये वातावरणीय बदलांच्या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमधील कोंडी फोडण्यात भारतीय मुत्सद्दीगिरीचा मोठा वाटा होता. शिवाय, भारताने तमाम विकसनशील राष्ट्रांचा आवाज बुलंद करून विकसित राष्ट्रांच्या बेजबाबदारपणामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीची भरपाई विकसनशील राष्ट्रांवर अनावश्यक आणि अन्याय्य निर्बंध लादून करता येणार नाही हेही खंबीरपणे सांगितले आणि स्वदेशहिताचा बळी न देता सामंजस्याने कोंडी फोडली. जवळपास हेच सूत्र केंद्रिभूत ठेवून भारताने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय सौर संघटनेची स्थापना घडवून आणली आणि तिचे केंद्रीय कार्यालयही भारतात स्थापन केले. गेल्या अनेक दशकांत भारताने विकासाच्या राजनयनाच्या आधारे आंतरराष्ट्रीय मंचावर इतकी वैश्विक महत्त्वाची उल्लेखनीय भूमिका बजावली नसावीभारतीय विदेशनीतीला एक नवी गती आणि अधिक सुस्पष्ट दिशा मिळवून देण्याच्या या प्रयत्नांना जे यश मिळाले आहे, त्यात पंतप्रधानांनी अनेक नेत्यांशी व्यक्तिगत मनुष्यसंबंधांचे जे रसायन निर्माण केले आहे त्याचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय राजकारणात ज्या प्रमाणे मोदींच्या उद्दिष्टांबद्दल संदेहाला वाव नाही, जवळजवळ त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपल्या प्रांजळ ठामपणाने त्यांनी बहुतांची अंतरे राखली आहेत. अनय जोगळेकरांच्या या प्रासंगिक लेखांमधून हे सर्व विशिष्ट संदर्भांसह उलगडले आहे. त्यामुळेच हा लेखसंग्रह परराष्ट्रसंबंधांविषयीच्या आकलनाला साक्षरतेच्या पलीकडे घेऊन जातो, सहजपणे!

 - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

(लेखक भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत.)

 
 

पुस्तकाच्या उपलब्तेविषयी...

खालील पुस्तकांच्या दुकानात भारतीय परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे हे पुस्तक उपलब्ध असेल.

मॅजेस्टिक - ठाणे, शिवाजी मंदिर, आयडिअल इथे उपलब्ध

बुकगंगा - डेक्कन जिमखाना कॉर्नर, पाटील एंटरप्रायझेस - अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा - सणस प्लाझा बाजीराव रोड, पुणे तसेच नाशिक, परभणी, नांदेड, सोलापूर, नागपूर या ठिकाणी सोमवार दि. १८ मार्चनंतर चार-पाच दिवसांत पुस्तकाच्या प्रती उपलब्ध होतील.

अधिक माहितीसाठी संपर्क - अनय जोगळेकर - ९७६९४७४६४५

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat