महिलांचा ग्राहक हक्क!
महा एमटीबी   15-Mar-2019ग्राहक चळवळीमधील महिलांचा कामाचा अनुभव, ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात असणारी समज आणि शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्याचा एकत्रित विचार करून ग्राहक मंचात एका महिला सदस्याची नेमणूक होत होती.

 

नवीन ग्राहक संरक्षण विधेयकातून महिला सदस्यांचा सहभाग काढून टाकण्यात आला आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचनाही देण्यात आलेली नाही. परंतु, महिलांचा ग्राहक हक्क अबाधित आहे. कारण बाजारपेठेशी ‘ग्राहक’ या नात्याने महिलांचा सर्वात जवळचा संबंध आहे. त्यामुळे गृहिणी हीच गुण ‘ग्राहक’ असू शकते, असे ग्राहक संघटनांचे मत आहे. कारण, कुटुंबातील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू गृहिणी आहे, असेच म्हणावे लागेल. तेव्हा, आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त या विषयाचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरते. जीवनावश्यक वस्तूंचे वाढणारे दर, महाग होणारे शिक्षण, खाजगी कोचिंग क्लासेसमधून वारेमाप उकळले जाणारे शुल्क, उत्पादनांच्या दर्जाबद्दलच्या समस्या, या सर्वांची झळ महिला ग्राहकांना अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे महिलांचा ‘ग्राहक’ म्हणून बाजाराशी असणारा संबंध जवळचाच नव्हे, तर डोळसही असतो.

 

‘ग्राहकतीर्थ’ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या मते, “गृहस्थाश्रम हा राष्ट्रीय जीवनाचा आधार आहे. गृहिणी हा केंद्रबिंदू आहे. हा गृहस्थाश्रम पुन्हा एकदा सुव्यवस्थित प्रस्थापित करणे, ही राष्ट्रीय गरज आहे.” ‘ऐश्वर्यसंपन्न भारत’ हे ग्राहक चळवळीच्या लक्ष्यपूर्तीसाठी ग्राहक पंचायतीमध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग मानला जातो. मागील तीन दशकांमध्ये ज्या वेगाने बाजारपेठा बदलत गेल्या, त्याच वेगाने ‘ग्राहक’ ही संज्ञाही विस्तारत, विकसित होत गेली. ग्राहकांचे प्रश्न जसे बदलले, त्याच झपाट्याने समस्यांचं स्वरूपही बदलत गेलं. ऐंशीच्या दशकात खराब साडी दिली, इथपासून इस्त्रीवाल्याने कपडे जाळले, इथपर्यंत अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे येत. आज या तक्रारी ऑनलाईन शॉपिंगमध्ये झालेल्या फसवणुकीविरोधात दाद मागण्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

 

ग्राहकांचे हक्क, अधिकारांसदर्भात निर्माण होणारे प्रश्नही आता बदलले आहेत. त्यामुळे ग्राहक मंचात त्रिसदस्य समितीत एका पदावर महिलांची नियुक्ती करण्यात येत होती. ग्राहक चळवळीमधील महिलांचा कामाचा अनुभव, ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात असणारी समज आणि शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्याचा एकत्रित विचार करून ग्राहक मंचात एका महिला सदस्याची नेमणूक होत होती. केंद्र सरकारने महिला सदस्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. यापूर्वी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक मंचासह ग्राहक आयोगामध्ये अनेक महिलांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आज देशभरात सुमारे पाचशे पदांवर महिला सदस्य सक्रिय आहेत. ग्राहक व उत्पादक यांची बाजू ऐकून न्याय देण्याचे महत्त्वाचे काम महिला सदस्यांनी अनेकवेळा केले आहे. त्यामुळे या समितीत महिला असण्याची गरज आहे. गुंतवणूकदार हा ग्राहक असतो, यासाठी दिलेल्या लढ्यामुळे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना फसवणुकीविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे खुले झाले.

 

जाहिरातीमध्ये स्त्रियांचं बीभत्स चित्रण, विमानतळावर छापील किमतीपेक्षा अधिक दराने शीतपेयं, पाणी यांची विक्री, या विरोधात ग्राहक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य महिलांनी नेटाने आवाज उठवला. दूधभेसळ, तूरडाळीची कृत्रिम टंचाई, महागाई, सौंदर्यप्रसाधनांच्या विरोधात मागितलेली दाद व त्यांना मिळालेला न्याय, यामुळे ग्राहकांच्या अधिकारांच्या कक्षा अधिक रुंदावल्या. ‘ग्राहक’ म्हणून सबलीकरण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच वेळी महिलांचा प्रत्यक्ष ग्राहक तक्रार निवारण तसेच ग्राहक न्यायालयातील प्रत्यक्ष सहभागही अधिक सक्षम व्हायला हवा. तरच ग्राहकसाक्षर दृष्टी असलेल्या महिला सदस्यांचा सहभाग या समितीमध्ये कायम राहील. त्याच वेळी अशाप्रकारे गृहीत धरणे चालणार नाही, असा स्पष्ट संदेश जाईल.

 

- श्यामकांत पात्रीकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat